Monday, May 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडसीताताई केंद्रे यांचा 'सीता' संघर्ष : बालमजुरी ते सामाजिक कार्यकर्त्या, एक स्वयंप्रेरणेचा...

सीताताई केंद्रे यांचा ‘सीता’ संघर्ष : बालमजुरी ते सामाजिक कार्यकर्त्या, एक स्वयंप्रेरणेचा प्रवास

पुणे : मूळच्या बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथील सीता केंद्रे या आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहर महिला आघाडी अध्यक्षा आहेत. चिखली जाधववाडी येथे त्यांचे एकूण २० महिला बचतगट व संघर्ष मित्रमंडळ ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक महिला सक्षमीकरण आपत्कालीन मदत, स्वछ भारत अभियान ईई विविध उपक्रम राबवले आहेत. विशेषतः विधवा, एकल, परितत्या महिलांच्या त्या आधारस्तंभ आहेत.

दुष्काळामुळे गाव सोडावे लागले

१९७२ च्या दुष्काळात वडिलांनी गाव सोडले त्यावेळी त्या ५ वर्षाच्या होत्या. लहान वयातच उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी भंगार गोळा करायला सुरुवात केली. आई, वडील, भाऊ सगळे शहरात मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होते. कुटुंबातील तिसरी मुलगी म्हणून वडिलांना नकोशी होती, त्यामुळे त्यांना इच्छा असूनही पुरेसे शिक्षण घेता आले नाही, खायचे वांदे असताना तू कशाला शाळेचा हट्ट धरते असे वडील म्हणायचे. त्या १९८० काळात टेल्को कंपनीत शापूरजी पालनजी यांच्या कंपनीत आई अनुसूया व वडिल दत्तू मुंढे, भाऊ व मी असे आम्ही बांधकामावर मजुरीला सुरुवात केली, शापुरजी पालनजी कंपनीच्या आवारात पत्रा शेडमध्ये वडिलांबरोबर त्या रहात होत्या.त्या काळात मजुरी खूप कमी होती. चार रुपये एव्हडीच मजुरी त्या काळात मिळायची, कंपनीत कचरा कुंडीत टाकलेल्या शिळ्या पुऱ्या धुऊन वाळवून खायची वेळ त्यांच्यावर येत होती.शापुरजी पालनजीच्या पत्राशेड मध्ये सीता केंद्रे राहू लागल्या.सर्वसामान्य मुलीपेक्षा उंच असल्यामुळे त्यांना टाटा कंपनीत मजुरी मिळाली.

शहरात टेल्को कंपनीतच लोकांना कामे मिळायची.त्या तिथे काम करत असताना त्यांना कष्टाचे महत्व कळले.त्या पत्राशेडमध्येच वयाच्या १४ व्या वर्षीच वडिलांनी लग्न लावून दिले. नंतर हे कुटुंब मोरवाडी, लाला टोपीनगर येथील झोपडपट्टी मध्ये राहू लागलो. सलग तीन वर्षे मजुरी करूनही भागत नव्हते, त्यांना वयाच्या १५ वर्षी मुलगा झाला. त्यानंतर नवऱ्याने मला सोडून दिले. मोलमजुरी तून काही मिळत नव्हते, म्हणून भोसरी एमआयडीसीत जे ब्लॉक मध्ये सिमेंट टाईल्स कंपनीत सिमेंट मिक्सिंगसाठी मजूरी करायला सुरुवात केली, साच्यामध्ये माल भरून टाईल्स बनवायला सुरवात केली. अति कष्टाची पुरुषांची असलेली ही कामे एक महिला करू लागले. त्यामुळे चांगले पैसे मिळू लागले. या कामाचे कौतुक होऊ लागले.



भोसरी एमआयडीसीत कॅन्टीन सुरू करा असा सल्ला मला अनेकजणांनी दिला. अखेर हे ही कष्टाचे काम नको म्हणून भोसरी एमआयडीसीत एक छोटीशी टपरी सुरू करून कामगारांसाठी चहा, पोहे सुरू केले, बेकरी ऍटम ठेवून सायकलवर चहा नाश्त्याची ऑर्डर घ्यायला सुरुवात केली. रात्रपाळीतही त्यांनी कॅन्टीन सुरू ठेवले होते.पिंपरीतून सायकल वरून कॅन्टीनसाठी लागणाऱ्या वस्तू त्या स्वतःहून जाऊन आणत होत्या. या कॅन्टीनमुळे चार पैसे मिळू लागले.१९८५ ते १९९६ पर्यंत खूप कष्ट केले. १९९९ मध्ये चिखली जाधववाडी येथे दोन गुंठे जागा घेऊन दोन खोल्या स्वतःसाठी बांधल्या. २००३ मध्ये अजून दोन गुंठे जागा घेऊन काही खोल्या बांधून भाड्याने दिल्या. बिल्डरच्या सहकार्याने जागा मिळवून तुळजा भवानी व गणपती मंदिर स्वखर्चाने बांधले आहे. सर्व धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम सामाजिक मेळावे घेऊन समाजसेवा निरंतर सुरू आहे. आयुष्यात बदल घडवणारा कॅन्टीन व्यवसाय आजही भोसरी मध्ये सुरू आहे, तिथे त्या रोज जाऊन चहा स्नॅक्स सेवा देतात.

संघर्ष मित्र मंडळ ट्रस्ट,बचतगटाच्या माध्यमातून समाजसेवा

१९९६ साली कॅन्टीन सुरू करून त्यांनी खूप काबाडकष्ट केले,आजही त्या कॅन्टीन चालवतात. श्रमिकांची वस्ती असलेल्या चिखली, जाधववाडी येथे दोन गुंठे जागा घेऊन सुरवातीला स्वतःसाठी दोन खोल्या बांधल्या नंतर दहा खोल्या बांधून भाड्याने दिल्या.मुलाचे लग्न केले. त्यांचा संसार उभा केला.मात्र नंतर मुलगा स्वतंत्र राहू लागला. गोरगरीब, विधवा, धुणीभांडी काम करणाऱ्या महिलांची प्रापंचिक ओढाताण होताना त्यांनी पहिली, आणि सुरवातीला महिला बचतगट निर्माण केले,बचत गटाच्या आर्थिक मदतीचा खूप फायदा येथील महिलांना मिळू लागला. सध्या त्यांचे २० बचतगट कार्यरत आहेत. पिंपरी चिंचवड मनपाच्या २४ व्या वर्धापनदिनी आयुक्त दिलीप बंड, महापौर मंगलाताई कदम यांनी व पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांचा सन्मान केला आहे.पती पत्नी घरगुती विवाद सामोपचाराने त्यांनी सोडवले आहेत.

त्यांच्या जीवनातील कठोर संघर्ष इतरांच्या वाट्याला येऊ नये,यासाठी त्यांनी संघर्ष मित्र मंडळ ट्रस्टची स्थापना करून विविध सामाजिक उपक्रम सुरू केले. ज्ञानज्योती प्राथमिक,माध्यमिक शाळेतील ३५ गरजू मुलां मुलींची एकूण ७० हजार रुपये फी त्यांनी भरली आहे. शहरात दरवर्षी इयता दहावी बारावी उत्तीर्ण मुलांना गणवेश, स्टेशनरी साहित्य त्या दान करतात. वितरण केले. २६ जानेवारी २०२३ प्रजासत्ताक दिनी पोलीस कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन सत्कार केला.



स्वछ भारत अभियान अंतर्गत परिसर स्वछता अभियान,जेष्ठ नागरिकांचा सत्कार सोहोळा, प्रजासत्ताक दिन, आंबेडकर जयंती, शिवजयंती, नवरात्र, दिवाळी निमित्त विविध कार्यक्रम त्यांनी राबवले आहेत. कोरोना काळात शेकडो महिलांना किराणा, भाजीपाला यासाठी सलग सहा महिने त्यांनी मदत केली आहे. निसर्ग चक्रीवादळ ग्रस्त चिपळूण,महाड तालुक्यातील गावात त्यांनी गरजू लोकांच्या दारात जाऊन जीवनावश्यक किटचे मोठ्या प्रमाणात वितरण केले होते, भोसरी एमआयडीसी मधील काच, पत्रा विकणाऱ्या महिलांना ब्लॅंकेट्स वाटप केले.

दरवर्षी महिला दिनानिमित्त महिला बचतगटांचा मेळावा घेऊन त्यांना संसारोपयोगी भेटवस्तू व परिसरातील विधवा,निराधार महिलांना किराणा किट वाटप करून त्यांचा सन्मान केला जातो.मार्च २०२३ मध्ये ४०० महिलांना भेटवस्तू व विधवा निराधार ६० महिलांना किराणा वाटप करून त्यांचा सन्मान केला.दरवर्षी किमान दोन गुणवंत गरीब विद्यार्थ्यांची शालेय फी पुस्तके वह्या देऊन मदत केली जाते. दोन गरीब कुटुंबातील विवाहातील खर्चाला त्यांनी हातभार लावला आहे.

लोक काय म्हणतील याचा विचार न करता अहोरात्र कष्ट केल्यास एखादी महिला स्वबळावर स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करू शकते, मला शिकता आले नाही, पण परिस्थिती बदलण्यासाठी मी उंबरठा ओलांडला. लोकांनी नावे ठेवली, नात्याची माणसे सोडून गेली पण जीवाला जीव देणारी, माझ्या सामाजिक कार्यात मला साथ देणारी माणस आज माझ्याकडे आहेत. त्यामुळे कुठल्याही बाईने खचून न जाता चार पैसे मिळवण्यासाठी कष्ट करावेत, मुलींना शिकवा, त्या दोन्ही घरांचे भाग्य उजळवतात,असे सीताताई केंद्रे यांचे स्पष्ट मत आहे.


गोर गरिबांचा पक्ष आम आदमी पक्षामध्ये सक्रिय


‘आप’चे नेते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सरकारी शाळा, दवाखाने, बस व्यवस्था, वीजबिल सवलती देऊन दिल्लीतील सामान्य जनतेला दिलासा दिला. कष्टकरी, अंगमेहनती लोकांना दुसरे काही नको. त्यामुळे आम आदमी पार्टीकडे त्या आकृष्ट झाल्या. त्यासाठी त्या पुणे येथे विजय कुंभार यांची भेट घेतली. मागील काही महिन्यात ‘आप’चे चेतन बेंद्रे, वैजनाथ शिरसाट यांच्या संपर्कात आल्यानंतर पार्टीच्या विविध राजकीय, सामाजिक आंदोलनातून त्यांनी शहरात काम करायला सुरुवात केली. त्यांचे कार्य पाहून आम आदमी पार्टीच्या महिला आघाडीच्या शहर अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. चिखली जाधववाडी येथील पाणी प्रश्न,गोरगरिबांच्या सरकारी घरकुल योजना ईई विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी पार्टीने तिकीट दिल्यास चिखली जाधववाडी वार्डात मनपा निवडणुक लढण्यासाठी त्यांनी तयारी केली आहे.

(शब्दांकन : क्रांतिवीर रत्नदीप)

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय