Friday, May 3, 2024
Homeआरोग्यपुणे : जुन्नर तालुक्यात आढळला म्युकोरमायकोसिसचा पहिला रुग्ण

पुणे : जुन्नर तालुक्यात आढळला म्युकोरमायकोसिसचा पहिला रुग्ण

नारायणगाव (जुन्नर) : तालुक्यात म्युकोरमायकोसिसचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. पुणे ग्रामीणमध्ये कोरोना नंतर होणाऱ्या आजाराचा हा पहिलाच रुग्ण सापडला असल्याचे सुत्रांकडून समजते.

जुन्नर तालुक्यातील धनगरवाडी गावातील एका ६५ वर्षीय महिलेला कोरोनातून बरे झाल्यानंतर ३ दिवसांनी बुरशीजन्य आजार म्यूकोर मायकोसिसचा संसर्गजन्य आजार झाल्याची घटना समोर आल आहे. नारायणगाव येथील डॉ. मनोहर डोळे मेडीकल फाउंडेशनच्या अथर्व नेत्रालय नारायणगाव येथे हि स्त्री डोळे तपासणीसाठी आले असता हि बाब निदर्शनास आली.

कोरोनानंतर ज्या व्यक्तींना मधूमेह आहे अशा व्यक्तींना या आजाराची लागण होते. यामध्ये नाकात व डोळ्यांमध्ये बुरशी तयार होऊन डोळ्यांना लाली येते. सुरूवातीच्या काळात यावर योग्यवेळी उपचार झालले तर हा रोग बरा होतो. परंतु या रोगाकडे दुर्लक्ष केल्यास या आजाराची गंभीरता वाढत जाऊन हि बुरशी मेंदू पर्यंत पोहोचते व रुग्णाची परिस्थिती गंभीर होते. त्यामुळे कोरोनानंतर डोळे व नाकासंबधी काही तक्रारी आढळल्यास ताबडतोब संबंधित डॉक्टरांना दाखवणे गरजेचे आहे, असे डॉ. मनोहर डोळे रूग्नालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. संदीप डोळे यांनी स्पष्ट केले.

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये साखरेची अनियंत्रित पातळी आणि स्टिरॉईडसह अन्य औषधांमुळे कमी झालेल्या रोगप्रतिकारकशक्तीमुळे म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचे प्रमाण दुसऱ्या लाटेत वाढले आहे. या आजारावरील औषधे महागडी असून, मागणी वाढल्याने औषधांचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

पहिल्या लाटेत कोरोनामुक्त झालेल्या काही रुग्णांना म्युकरमायकोसिसची बाधा झाल्याचे आढळले होते. यात काही रुग्णांना दृष्टीही गमवावी लागली. दुसऱ्या लाटेत या रुग्णांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे. त्यामुळे केवळ सरकारीच नव्हे तर खासगी कान, नाक, घसातज्ज्ञांकडे या रुग्णांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. ‘‘पहिल्या लाटेनंतर दोन महिन्यांतून एखाद्या रुग्णाला याची बाधा झाल्याचे पाहायला मिळत होते; परंतु आता तीन ते चार दिवसांतून एक रुग्ण येत आहे. संपूर्ण राज्यात या आजाराचे प्रमाण वाढले आहे,’’ असे कान- नाक- घसातज्ज्ञ डॉ. सोनाली पंडित यांनी सांगितले. केईएममध्ये याची बाधा झालेल्यांची रुग्णसंख्या गेल्या लाटेच्या तुलनेत दुपटीने वाढल्याचे कान- नाक- घसा विभागाचे प्रमुख डॉ. हेतल मारफतिया यांनी सांगितले. 

स्टिरॉइड्सच्या अतिरेकी वापराचे परिणाम 

‘पहिल्या लाटेच्या वेळी स्टिरॉइडचा वापर उशिरा सुरू झाला. त्यामुळे याचा वापर तुलनेने अधिक काळजीपूर्वक केला गेला; परंतु दुसऱ्या लाटेत करोना रुग्णांच्या उपचारामध्ये स्टिरॉइडचा अतिरेक आणि गैरवापर केल्यामुळे ही रुग्णसंख्या वाढली आहे. तसेच कमी झालेली रोगप्रतिकारकशक्ती ही बुरशीच्या वाढीसाठी पोषक ठरत असल्याने इतर औषधांच्या वापराचा अतिरेकही यास कारणीभूत आहे का याचा अभ्यास करणे गरजेचे आहे,’ असे मत कान-नाक- घसातज्ज्ञ डॉ. अशेष भूमकर यांनी व्यक्त केले.

म्युकरमायकोसिस म्हणजे काय?

‘म्युकरमायकोसिस’ हा बुरशीजन्य आजार आहे. या बुरशीचा हवेतून संसर्ग होते. रोगप्रतिकारकशक्ती चांगली असलेल्यांना यापासून धोका नाही; परंतु रोगप्रतिकारकशक्ती कमी झालेल्या रुग्णांना तीव्र धोका असतो. नाकावाटे ही बुरशी शरीरात प्रवेश करते. तेथून ती सायनसमध्ये वाढते. कर्करोगाच्या पेशींपेक्षाही जलद गतीने वाढणारी ही बुरशी डोळ्यांतील पेशी, मेंदूतही प्रवेशही करते. त्यामुळे इतर बुरशीजन्य आजारांपेक्षाही हा संसर्ग अधिक धोकादायक असून याची बाधा झालेल्यांमध्ये जवळपास ३० टक्के मृत्युदर आहे.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय