Thursday, November 21, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडशरण साहित्य अध्यासनासाठी लोकसहभागातून तीन कोटींचा नीधी उभारण्याचा लिंगायत समाज संस्था आणि...

शरण साहित्य अध्यासनासाठी लोकसहभागातून तीन कोटींचा नीधी उभारण्याचा लिंगायत समाज संस्था आणि बसव केंद्र कोल्हापूर यांचा निर्धार..!

कोल्हापूर : व्यक्ती व समाज कल्याणाचा सुंदर समन्वय साधणारे; स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुता या मूल्यांचा पुरस्कार करणारे तसेच विवेकवादी जीवनमूल्यांचा निर्भीडपणे उद्घोष करणारे ‘वचन साहित्य’ म्हणजे शरण साहित्य होय! बाराव्या शतकामध्ये युगप्रवर्तक महात्मा बसवण्णा आणि ७७० शरण-शरणींनी समाजक्रांती केली होती; त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाद्वारे समग्र परिवर्तनकारी मूल्य असणारे साहित्य निर्मिती केली गेली, यालाच शरण साहित्य म्हणतात. शरण साहित्यातून मांडलेले विचार हे भगवान महावीर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांशी नाते सांगणारे आहेत; तसेच महाराष्ट्रातील वारकरी भक्ती चळवळ आणि महानुभाव पंथ यांच्याशी अनुबंध जोडणारे आहेत. हा वैचारिक वारसा आधुनिक काळात अनेक समाजसुधारक आणि सत्यशोधकांनी पुढे चालवला आहे.

भारतीय राज्यघटनेतील लोकशाही मूल्ये, संसदीय कार्यपद्धतीची संकल्पना, स्त्री-पुरुष समानता, वैज्ञानीक दृष्टिकोन, विवेक आदी मूल्ये शरण साहित्यात दिसून येतात. यामुळेच शरण साहित्य आजही कालसुसंगत, प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे. म्हणूनच अशा अमूल्य वारशाचे अध्ययन, अध्यापन, संशोधन व प्रबोधनाद्वारे जतन, संगोपन आणि रक्षण होणे अत्यावश्यक आहे. या अनुषंगाने शिवजी विद्यापीठाच्या दि. १० मार्च २०२३ रोजी झालेल्या अधिसभेमध्ये अधिसभा सदस्य श्री. अभिषेक राजेंद्र मिठारी यांनी मांडलेल्या ठरावानुसार ‘शरण साहित्य अध्यासन’ शिवाजी विद्यापीठामध्ये स्थापन करण्याचे एकमताने मंजूर झाले आहे. तद्नंतर विद्यापीठाच्या सर्व अधिकारमंडळामध्ये सदरचा प्रस्ताव एकमताने मंजूर झाला आहे.



• शरण साहित्य अध्यासनच्या माध्यमातून होणारे कार्य:

१. शरण साहित्याचे अध्ययन, अध्यापन आणि संशोधन केले जाईल.
२. कन्नड, इंग्रजी आदी भाषांमध्ये विपुल प्रमाणात असणारे वचन साहित्य, शरण साहित्य मराठीमध्ये भाषांतरित केले जाईल.
३. बसवण्णा आणि इतर शरणांचे जीवन-चरित्र-संदेश अभ्यासून त्यांचे नवीन पिढीला महत्त्व पटवून देण्यासाठी व्याख्याने, चर्चासत्रे, परिषदा, संमेलने, शिबिरे आयोजित केली जातील.
४. शरण साहित्याचे, वचन साहित्याचे अद्ययावत ग्रंथालय उभारले जाईल.
५. शरण साहित्यविषयक ग्रंथ, स्मरणिका, नियतकालिके प्रकाशित केले जातील.
६. ऐतिहासिक शरण वारसा स्थळांचा अभ्यास करून त्याचे जतन, संवर्धन करण्यासाठी उपक्रम राबवले जातील.
७. शरण साहित्यावर आधारित गीत, संगीत, नाट्य, चित्रपट आशा विविध कलामाध्यमांचा अभ्यास आणि निर्मिती करून प्रबोधन, प्रसार केला जाईल.
८. बसवण्णा आणि शरणांनी मांडलेल्या लिंगायत तत्त्वज्ञान आणि संस्कृतीचा अभ्यास व संशोधन होईल.
९. लोकशाहीचे प्रारूप असणाऱ्या अनुभव मंटप संकल्पनेचा, संरचेनाचा अभ्यास, प्रसार केला जाईल.
१०. शरण साहित्यावर आधारित डिप्लोमा कोर्सेस, सर्टिफिकेट कोर्सेस, डिग्री कोर्सेस इत्यादी शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू केले जातील.
११. शरण साहित्यावरील संशोधन व उच्चशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊ केली जाईल.
१२. शरण साहित्यावर आधारित ऑनलाईन कोर्सेस, MOOC कोर्सेस सुरू केले जातील.

शरण साहित्य अध्यासनाचे उपरोक्त निर्धारित कामकाज लवकर व नियमित सुरू होण्यासाठी मोठ्या आर्थिक तरतुदीची गरज आहे. अध्यासनासाठी महाराष्ट्र शासनाकडून भरगोस निधीची मागणी प्रस्तावित आहेच, याकरिता विद्यापीठाकडून शासनाकडे प्रस्ताव देखील पाठविण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाडून सदरचा निधी विद्यापीठाला लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी शासन दरबारी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. सोबतच शरण साहित्य अध्यासनासाठी लोक वर्गणीतून अंदाजे ‘तीन कोटी रुपये’ रक्कम जमा करणे आवश्यक आहे.

या संदर्भात लिंगायत समाज संस्था कोल्हापूर यांच्या मार्फत शिवाजी विद्यापीठाचे कार्यक्षेत्र असणाऱ्या तिन्ही जिल्ह्यांतील प्रतिनिधींची एक प्राथमिक बैठक बोलवण्यात आली होती. ही बैठक रविवार दि. १ ऑक्टोबर २०२३ रोजी श्री वीरशैव को-ऑप बँक येथे पार पडली. या पहिल्याच बैठकीत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत अध्यासनाकरिता पंधरा (१५) लाखांचा निधी लिंगायत समाज संस्थेकडे जमा झाला आहे. आम. राजेंद्र पाटील यड्रावकर, गणपतदादा पाटील, बसवराज आजरी, चंद्रशेखर डोली, डॉ. विश्वनाथ मगदूम, गजानन सुलतानपुरे, मिलिंद साखरपे, सूर्यकांत पाटील बुदिहाळकर, सुनील स्वामी, राजशेखर तंबाके, सरलाताई पाटील, विलास आंबोळे, सुभाष महाजन आदींनी आपला निधी बैठकीवेळी संस्थेकडे दिला आहे.

‘शरण साहित्य अध्यासन’ उभारणीसाठी समाजातील प्रत्येक घटकाचे यथाशक्ती योगदान सुद्धा कोटी मोलाचे असल्याने लोकवर्गणीकरिता जाहीर आवाहन करण्यात येत आहे. ही लोकवर्गणी जमा करण्यासाठी समाज संस्थेने केलेल्या मागणीनुसार विद्यापीठाने शरण साहित्य अध्यासनासाठी स्वतंत्र बँक अकाउंट व QR कोड उपलब्ध करून दिला आहे. या महत् कार्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा मोलाचा सहभाग लाभावा यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा या तिन्ही जिल्ह्यांत लोकवर्गणी संकलनाची चळवळ निर्माण केली जाणार आहे. यामध्ये सर्वांनी यथाशक्ती व कृतिशील सहभाग घ्यावा असे जाहीर आवाहन कोल्हापूर लिंगायत समाज संस्थेतर्फे करण्यात येत आहे.

लोकवर्गणी जमा करण्यासाठी खालील व्यक्तींशी संपर्क साधावा.


सरलाताई पाटील – 9823158582

राजशेखर तंबाके – 9422414077

यश आंबोळे – 8459633367

संबंधित लेख

लोकप्रिय