Friday, November 22, 2024
Homeजुन्नरग्राहक पंचायतच्या अथक परिश्रमातून ग्राहक संरक्षण कायदा अमंलात आला – बाळासाहेब औटी

ग्राहक पंचायतच्या अथक परिश्रमातून ग्राहक संरक्षण कायदा अमंलात आला – बाळासाहेब औटी

जुन्नर / आनंद कांबळे : ग्राहकांना त्यांच्या हक्काबद्दल आणि तक्रार निवारण करण्यासाठी उपलब्ध असलेल्या उपायांबद्दल प्रचार करणे आणि ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम अखिल भारतीय ग्राहक पंचायत गेली पन्नास वर्षे करत असून ग्राहक पंचायतच्या अथक परिश्रमातून ग्राहक संरक्षण कायदा अमंलात आला अशी माहिती अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे मध्य महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष बाळासाहेब औटी यांनी जुन्नर येथे राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात दिली.

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग जुन्नर तहसील कार्यालय व अखिल भारतीय ग्राहक पंचायत जुन्नर तालुका यांच्या विद्यमाने जुन्नर तहसील कार्यालय येथे ग्राहक प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बाळासाहेब औटी बोलत होते.

कार्यशाळेला नायब तहसीलदार शांताराम किरवे, नायब तहसीलदार श्रीमती सारिका रासकर, महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता शांताराम बांगर,, ग्राहक पंचायतीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोर, पर्यावरण समितीचे जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर उंडे, ग्रामपंचायत तालुका अध्यक्ष जगन्नाथ खोकराळे, ग्राहक पंचायत तालुका संघटक शैलेश कुलकर्णी, ग्राहक पंचायत महिला प्रतिनिधी मंदाताई उत्तर डे, पुरवठा निरीक्षक गोपाल ठाकरे, स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष सुनील गुंजाळ, संतोष नेहरकर, अविनाश चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते.

बाळासाहेब औटी पुढे म्हणाले की ग्राहक संरक्षण अधिनियमात ग्राहकांच्या हक्काचे व हितसंबंधाचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय राज्य व जिल्हा स्तरावर ग्राहक संरक्षण परिषद स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली असून माहिती मिळवण्याचा अधिकार, निवडीचा अधिकार, तक्रार निवारण करण्याचा यासह ग्राहकांच्या हितसंबंधाचे व त्यांच्या हक्काचे संरक्षण करणे हा या परिषदांचा मुख्य उद्देश आहे ग्राहक जागृतीसाठी ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी आणि ग्राहकांना कार्यक्षम व प्रभावी निवारण यंत्रणेपर्यंत पोहोचविण्याची खात्री करण्यासाठी ग्राहक संरक्षण परिषदा महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

नायब तहसीलदार शांताराम किरवे म्हणाले ग्राहक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी ग्राहक जागरणाची मोहीम व कार्यक्रम हाती घेण्याच्या आवश्यकता आहे दरवर्षी जुन्नर तालुक्यात ग्राहक जागरण सप्ताह राबविण्यात येतो. यामध्ये सर्व ग्राहकाशी निगडित शासकीय संस्था सहभाग नोंदवतात.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोर, ज्ञानेश्वर उंडे, मंदाताई उत्तरडे यांनी मार्गदर्शन केले, सूत्रसंचालन सुनील गुंजाळ यांनी केले तर आभार अविनाश चव्हाण यांनी मानले.

संबंधित लेख

लोकप्रिय