प्रगतीशील लेखक चळवळीचे आधारवड, ज्येष्ठ कवी, निसर्गप्रेमी, मराठी साहित्यासाठी हयातभर शब्दांचा जागर करणारा दिलदार माणूस, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते, मार्क्सवादी विचारांची वैचारिक बैठक असलेला, बँकिंग क्षेत्रातील कामगार चळवळीचा पाईक, कॉम्रेड सतीश काळसेकर यांचे आज शनिवारी पहाटे रायगड जिल्ह्यातील पेण येथे निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. गिर्यारोहक, साठोत्तरी कवितेचा धागा, सतत हसतमुख व आनंदी आणि मित्रांच्या गोतावळ्यात रममाण राहणारा सतीश काळसेकर हा अवलिया आज अनंताच्या प्रवासाला पांथस्थ झाला.
नव्वदच्या दशकात मुंबईत पाय ठेवल्यानंतर फोर्ट परिसरातील बँक ऑफ बडोदा मुख्य शाखेतील अधिकारी जवाहर नागोरी, माधव साठे, संजीव साने, मिलिंद खानोलकर अशा मित्रांची ओळख झाली. जवाहर नागोरी यांच्यामुळेच माझा सतीश काळसेकर यांच्याशी प्रथम परिचय झाला. फोर्ट भागातील पिपल्स बुक हाऊसमध्ये काळसेकर यांच्याशी नंतर भेटी व्हायला लागल्या. निसर्गाचे प्रचंड वेड, ईशान्य भारतातील राज्ये, हिमालयाच्या पर्वतरांगा, दक्षिणेतील राज्यात भटकंती, गिर्यारोहणाची आवड, विविध प्रदेशात गेल्यानंतर तेथील स्थानिक खाद्यपदार्थांची चव चाखणारा चोखंदळ खवय्या अशी काळसेकर यांच्या व्यक्तीमत्वाची बहुआयामी रुपे होती.
तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला या निसर्गसंपन्न गावात जन्मलेले काळसेकर हे रसिक मनाचे उमदे व्यक्तीमत्व होते. त्यांचे मूळ गाव मालवण नजीकचे काळसे. या गावाच्या नावामुळेच ते बहुधा काळसेकर झाले असावेत. टिपिकल रांगड्या, तिरकस कोकणी माणूस नव्हे तर काटेरी फणसाच्या गऱ्यासारखा हा गोड माणूस होता. कोकण आणि मुंबईत शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही काळ त्यांनी मासिक ज्ञानदूत व टाइम्समध्ये नोकरी केली. यानंतर त्यांना बँक ऑफ बडोदा, मुंबईत नोकरी लागली. १९६५ ते २००१ सेवानिवृत्तीपर्यंत ते बँक ऑफ बडोदा येथे कार्यरत होते.
मुंबईसारख्या महानगरीय धावत्या जीवनात वेगवेगळ्या प्रसंगात येणारे उत्कट भावनात्मक अनुभव हा सतीश काळसेकर यांच्या कवितेचा गाभा आहे. त्यांच्या कवितेतील माणूस हा महानगरातील कनिष्ठ मध्यमवर्गातून आलेला चाकरमानी आहे. तो स्वतःची तीव्र संवेदनशीलता जपत कवितेतून व्यक्त होत राहतो. सर्वसामान्य माणसाच्या रोजच्या जगण्यातील संघर्ष, अनिश्चितता, सुख – दुःखे, सोशिकपणा हे त्यांच्या कवितेचे विषय आहेत. यातली त्यांची जीवनदृष्टी निखळ मानवतावादी आहे.
‘वाचणाऱ्याची रोजनिशी’ हे पुस्तक त्यांच्या लेखांचा संग्रह आहे. आपले वाङ्मय वृत्त व साधना या नियतकालिकांमधून वेळोवेळी प्रसिद्ध झालेले हे सदर लेखन आहे. ग्रंथप्रेमी, ग्रंथ वाचन चळवळीतील पुरस्कर्ता असलेले काळसेकर यांच्यामधील सजग वाचक या लेखनात जाणवत राहतो. ‘वाचणाऱ्याची रोजनिशी’ या पुस्तकासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला आहे. पायपीट या पुस्तकात व्यक्तिगत, आनंदाच्या सहलीच्या स्वरूपाच्या, भारतातील विविध ठिकाणी पायी केलेल्या भ्रमंतीचे अनुभव आहेत.
‘कविता:लेनिनसाठी’ हे लेनिनवरील २० देशातील कवींनी लिहिलेल्या कवितांचे मराठी अनुवाद, संपादनाचे पुस्तक आहे. ऑक्टोबर क्रांतीला साठ वर्ष होत असल्यनिमित्त त्या क्रांतीला अभिवादन करण्यासाठी हे संकलन प्रकाशित करण्यात आले होते. नव्या वसाहतीत हा हिंदीतील प्रसिद्ध कवी अरुण कमल यांच्या ‘नये इलाके में’ या कवितासंग्रहाचा मराठी अनुवाद आहे.
सतीश काळसेकर यांच्या मराठी साहित्य वाङ्मयीन कारकिर्दीची सुरुवात काव्य लेखनाने झाली. सुरुवातीला कॉलेजच्या नियतकालिकातून, वर्तमानपत्रातून त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर विविध वाङ्मयीन नियतकालिकांतून त्यांच्या कविता प्रसिद्ध होत होत्या. १९७१ मध्ये त्यांचा पहिला कवितासंग्रह ‘इंद्रियोपनिषद्’ प्रकाशित झाला. या कविता संग्रहापासूनच कवी म्हणून त्यांची ओळख अधोरेखित झाली.
सतीश काळसेकर यांची साहित्य संपदा याप्रमाणे आहे. इंद्रियोपनिषद् (१९७१), साक्षात (१९८२), विलंबित (१९९७) कवितासंग्रह. कविता:लेनिनसाठी (१९७७), नव्या वसाहतीत (२०११) हे अनुवाद प्रकाशित झाले आहेत. वाचणाऱ्यांची रोजनिशी (२०१०), पायपीट (२०१५) हे त्यांचे गद्यलेखन आहे. ‘मी भयंकराच्या दारात उभा आहे’. कवी नामदेव साळूबाई ढसाळ यांची कविता, संपादन प्रज्ञा दया पवारसह, आयदान: सांस्कृतिक ठेवा (संपादन- सिसिलिया कार्व्हालोसह, २००७), निवडक अबकडइ (संपादन- अरुण शेवतेसह, २०१२) ही त्यांनी केलेली संपादने प्रकाशित आहेत.
सतीश काळसेकर यांच्या कवितांचा समावेश अनेक महत्त्वाच्या संकलनात झाला आहे. हिंदी, बंगाली, मल्याळम, इंग्रजी, पंजाबी यासह अन्य भारतीय भाषांत त्यांच्या कवितांचे अनुवाद झाले आहेत. त्यांनी देशी-विदेशी भाषांतील अनेक महत्त्वाच्या कवींच्या कवितांचे मराठी अनुवाद केलेले आहेत. महाश्वेता देवी आणि रस्किन बाँण्ड यांच्या कथांचे मराठी अनुवाद केले आहेत.
प्रवास लेखन, सांस्कृतिक चळवळी, खाद्यजीवन या विषयांवर त्यांनी वेळोवेळी केलेले लेखन नियतकालिकांतून, वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झाले आहे. लघुनियतकालिकांच्या चळवळीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. नवसाहित्याची सुरुवात करणाऱ्या या चळवळीतील ते अग्रणी कार्यकर्ते होते. सतीश काळसेकर यांनी मागोवा, तात्पर्य, लोकवाङ्मय, फक्त, तापसी, चक्रवर्ती आणि आपले वाङ्मय वृत्त इत्यादी नियतकालिकांची संपादकीय जबाबदारी सांभाळलेली आहे. मराठी प्रकाशनाच्या क्षेत्रातील लोकवाङ्मय गृह, मुंबई या प्रकाशन संस्थेच्या संपादनाचे कार्य त्यांनी केले आहे. याशिवाय अभिनव प्रकाशन या प्रकाशन संस्थेतही त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.
त्यांनी साहित्य अकादमीच्या मराठी भाषा सल्लागार समितीचे सदस्यत्व (१९९८-२००२), महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका)च्या भारतीय पुरस्कार निवड समितीचे दहा वर्ष सभासदत्व (१९९४-२००३), आणि २००८पर्यंत निवड समितीचे निमंत्रक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्यत्व (डिसेंबर २००५ ते डिसेंबर २०११) या जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत.
सतीश काळसेकर मार्क्सवादी विचारसरणीच्या चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते आहेत. डाव्या विचारसरणीच्या ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनचे ते सदस्य होते. भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे उभारण्यात आलेल्या वेगवेगळ्या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला आहे. समांतर लेखक संघात ते कार्यशील होते. अखिल भारतीय प्रगतिशील लेखक संघाचे ते महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीचे अध्यक्ष होते. त्यांना सोव्हिएत लँड नेहरू पारितोषिक (१९७७), लालजी पेंडसे पुरस्कार (१९९७), बहिणाबाई पुरस्कारः कवी (१९९८), कविवर्य कुसुमाग्रज पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद (१९९८), महाराष्ट्र शासन पुरस्कार (१९९९), कैफी आझमी पुरस्कार (२००६), महाराष्ट्र शासनाचा कृष्णराव भालेकर पुरस्कार (२०१०-२०११), सार्वजनिक वाचनालय, बेळगाव या संस्थेतर्फे दिला जाणारा आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार (२०१३ ), साहित्य अकादमी पुरस्कार (२०१३), महाराष्ट्र फाऊंडेशन ग्रंथ पुरस्कार (२०१८) इत्यादी सन्मान पुरस्कार लाभले आहेत.
मी वाचवतोय कविता
हाकेतून हद्दपार होतेय आई
हंबरायच्या थांबल्यायत गोठ्यातल्या गाई
हरवत चाललाय किराणा आणि भुसार
सुपर मार्केटच्या झगमगाटात झरझर
लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा
निघून चाललाय गावगाड्यासोबत मुकाट
कल्हईची झिलई विस्तवासोबत निघून गेली
मागच्या धगीवर रटरटणारी आमटी
राखेसहित दुरावत गेली गॅसच्या शेगडीवर
बोलाचालीतून निघून चाललीय माझ्या आईची बोली
सुटीत आता खेळत नाहीत मुलं
विटीदांडू आणि लगोऱ्या
थांबून गेलाय त्यांचा दंगा,
आट्यापाट्या आणि पिंगा
परकऱ्या मुली खेळत नाहीत आता
आधीचे मातीतले खेळ
पोरं आता दंग असतात दूरदर्शनच्या चॅनेलवर
बघत क्रिकेटची मॅच
आणि उलगडत क्राइम-थ्रिलर
लिहिते हात आता राहिले नाहीत लिहिते
शब्द बापुडे केवळ वारा
तसे विरून जातायत
मी वाचवतोय माझी कविता
आणि माझी आई
आणि माझी बोली
आणि माझी भूमी
कवितेसोबत
कविवर्य सतीश काळसेकर यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
(ताजा कलम. या लेखासाठी संक्षिप्त मराठी वाडमय कोशातील माहिती आणि काही नियतकालिकांतील लेख यांचा साभार संदर्भ घेतलेला आहे.)
– समीर मणियार