Friday, December 6, 2024
Homeविशेष लेखरविवार विशेषरविवार विशेष : जेष्ठ कवी सतीश काळसेकर

रविवार विशेष : जेष्ठ कवी सतीश काळसेकर

१२ मार्च १९९३ रोजी मुंबई बॉम्बस्फोटांच्या मालिकेने हादरली. त्यापैकी एक बॉम्बस्फोट शेअर मार्केटच्या इमारतीतील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत झाला. सतीश काळसेकर इथेच काम करायचा. 

नेमक्या त्याच दिवशी मनोहर ओकचं निधन झालं. बँकेत जाण्याऐवजी सतीश मन्याच्या मयतीला गेला. सतीशचा जीव वाचवण्यासाठी मन्या गेला, असं दुर्गा भागवत त्यावेळी म्हणाल्याचं स्मरतं. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काळसे हे त्याचं मूळ गाव. म्हणून आडनाव काळसेकर. तो वेंगुर्ल्याचा. शिकायला मुंबईत आला. कॉलेजात असताना सतीश कविता लिहू लागला. इंद्रियोपनिषद् हा त्याचा पहिला कविता संग्रह ७० च्या दशकात प्रकाशित झाला. त्यानंतर साक्षात, विलंबित. लेनिनवरील कवितांचे अनुवाद आणि संपादन त्याने केलं. वाचणार्‍याची रोजनिशी, पायपीट हे त्याच्या गद्य लेखनाचे संग्रहही प्रकाशित आहेत. मी भयंकराच्या दारात उभा आहे — नामदेव ढसाळ यांची कविता, संपादन– सतीश काळसेकर, प्रज्ञा दया पवार. आयदानः सांस्कृतिक ठेवा, संपादन–सिसिलिया कार्व्हालो, सतीश काळसेकर, निवडक अबकडइ (अरुण शेवतेसह) ही त्याची संपादित पुस्तकं. वाचणार्‍याची रोजनिशी हे सदर आपले वाङमय वृत्त आणि साधना साप्ताहिकात प्रसिद्ध होत असे. त्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. 

साठोत्तरी कवी अशी सतीशची ओळख. सतीशची कविता प्रामुख्याने महानगरी संवेदना टिपणारी. लोकभाषेतली. कविता लिहीण्यापेक्षा सतीश तन-मन-धनाने गुंतला होता, ग्रंथसंग्रह, वाचन, पायपीट, साहित्य व समाजसेवेत. त्याचा लोकसंग्रह अचाट होता. पिशवीत सतत कोणतं ना कोणतं पुस्तक असायचं. 

सतीश, भुजंग मेश्राम आणि मी असे तिघे एकदा भोपाळला भेटलो. शरच्चंद्र मुक्तिबोध यांच्या साहित्यावरील चर्चासत्रासाठी. चंद्रकांत पाटील,  भा.ल. भोळे, हिंदी कवी चंद्रकांत देवताले, राजेश जोशी अशा अनेक हस्ती होत्या. आम्ही तिघे मुंबईला परतणार होतो पण रिझर्वेशन केलेलं नव्हतं. संध्याकाळी एका ट्रेनमधल्या अनरिझर्व्हड डब्यातल्या गर्दीत आम्ही तिघांनी एकमेकांना झोकून दिलं. बर्थवर कुठेतरी बूड टेकवायला जागा मिळाली. ट्रेन सुरु झाली. कोलाहल थोडा कमी झाला. भुजंगने गजानन माधव मुक्तिबोधांच्या कविता वाचायला सुरुवात केली. ट्रेन हलत होती. हातापायांनी बुडाला आधार देत आम्ही त्या कविता ऐकत होतो. मग भुजंगने चपटी काढली. मी म्हटलं, एवढ्या गर्दीत कशी पिणार, वरून खाली पडायचो न झिंगता. सतीश प्रेमाने म्हणाला खरं आहे, पण आता त्याने दारू आणलीच आहे तर त्याचा हिरेमोड नको करूस. भुजंग खुलला. एकेक घोट घेत आम्ही कविता ऐकत होतो. भुजंगच्या पिशवीत बहुधा चपट्याच होत्या. एक संपली की दुसरी. कोण केव्हा आणि कुठे झोपी गेला हेच कळलं नाही. सकाळी मी दादर स्टेशनला उतरलो आणि दोघे भेटले. 

मार्खेजची गोष्ट हे पुस्तक सतीशने माझ्याकडून लिहून घेतलं. या पुस्तकाच्या संबंधाने त्याने माझ्यावर एक-दोन ओळी वाचणार्‍याच्या रोजनिशीतही लिहील्या होत्या. सतीशचा अंतर्बाह्य प्रेमळपणा कुणालाही साद घालणारा होता. साहित्यिक, लेखक यांना घेऊन तो हिमालयात पायपीट करायला जायचा. या नोंदी त्याच्या लिखाणात आहेत. अशोक शहाणेचं एकमेव पुस्तक ज्यामध्ये अशोकचा गाजलेला लेख-मराठी साहित्यावर क्ष-किरण, समाविष्ट आहे, ते पुस्तक सतीशच्या आग्रहामुळेच प्रकाशित झालं. अशोक मला म्हणाला- मी प्रकाशक असतो तर अजिबात छापलं नसतं ते पुस्तक.

सतीश सतत भ्रमंती करायचा. नवीन लेखक, कवी यांच्या संपर्कात असायचा. बँकेतून निवृत्त झाल्यावर तो लोकवाङमय गृहाच्या कामात लक्ष घालायचा. पण तिथूनही त्याने निवृत्ती घेतली आणि पेणला स्थिरावला. आज पहाटे तिथेच त्याने अखेरचा श्वास घेतला. गणेश विसपुतेने ही बातमी फेसबुकवर लिहीली.

सतीशला मनापासून आदरांजली.

– सुनील तांबे

संबंधित लेख

लोकप्रिय