जुन्नर (प्रतिनिधी) :- अंजनावळे गावात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावचे सरपंच वसंत लांडे यांच्या हस्ते वृक्षरोपण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
अखिल भारतीय किसान सभेच्या विशेष प्रयत्नाने आणि पुणे जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने जुन्नर तालुक्यातील आंबे-पिंपरवाडी, उसरण-खडकुंबे, या गावांमध्ये या अगोदरच कामे चालू झालेली आहेत. अंजनावळे गावात कामे चालू करण्यात किसान सभेचे सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या विश्वनाथ निगळे, नारायण वायाळ, लक्ष्मन जोशी, गणपत घोडे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे देशभर लॉकडाऊनची स्थती आहे. गावातील मजूर-कामगार यापूर्वी कामासाठी दररोज ३० ते ४० किलोमीटरचा प्रवास करून बागायती शेतीवर काम करण्यासाठी जात होते. आता वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद असल्यामुळे या मजूर-कामगारांना कामासाठी बाहेर गावी जात येत नव्हते. अशा परिस्थितीत कामगारांच्या हाताला कोणत्याही प्रकारचे काम उपलब्ध नव्हते. यामुळे गावातील कामगारांना कामाची गरज अधिक होती.
अखिल भारतीय किसान सभेने ग्रामपंचायत आणि पंचायत समिती प्रशासनाकडे मनरेगाची कामे चालू करण्यासाठीची सातत्याने मागणी केलेली होती. अखेर या मागणीला यश आल्याने संघटनेने अंजनावळे गावचे सरपंच वसंत लांडे, ग्रामसेवक राजश्री वाळकोळी, ग्रामरोजगार सेवक उत्तम लांडे, डेटा एंट्री ऑपरेटर पंढरीनाथ सरोगदे आणि प्रशासनाचे आभार मानले आहेत.
भविष्यात मजूरांनी कामासाठी बाहेरगावी स्थलांतरीत न होता. कामाची गरज असेल तेव्हा आपल्या ग्रामपंचायतीकडे कामाची लेखी अथवा तोंडी मागणी करावी, असे अवाहन किसान सभा संघटनेच्या वतीने मजूर कामगारांना करण्यात येत आहे. मागणी केल्यापासून १५ दिवसांच्या आत स्वतःच्या गावातच रोजगार उपलब्ध करून देणे ग्रामपंचायतीला बंधनकारक आहे, असे किसान सभेने म्हटले आहे.