पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : महानगरपालिकेने वाकड रोड वरील झाडांची दिवसाढवळ्या कत्तल केली आहे, असा आरोप करत या विरोधात आज युवक कॉग्रेस वाकड येथे रस्त्यावर उतरुन निषेध आंदोलन करण्यात आले. ही कत्तल पिंपरी चिंचवड शहर कॉग्रेस सहन करणार नाही,असा इशारा पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष स्वप्निल बनसोडे यांनी दिला आहे. या आंदोलनानंतर महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले.
स्वप्निल बनसोडे यांनी सांगितले की, दत्तमंदिर रोड वाकड या अत्यंत महत्त्वाच्या रोड वरती 20 वर्षांपासून मोठ्या प्रमाणात जुने वृक्ष होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने विकास कामाच्या नावाखाली दिवसाढवळ्या या वृक्षांची मुळासकट कत्तल करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे.
तोडलेल्या वृक्षाच्या बदल्यात एक महिन्याच्या आत वृक्ष लावणे, असा शासकीय आदेश असतानाही मोठा काळ उलटून गेल्यावरही त्या ठिकाणी महानगरपालिकेने नवीन वृक्ष लागवड केलीली नाही. आम्ही या संदर्भात महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केला आहे, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. युवक काँग्रेस तर्फे वृक्षतोडीच्या विरोधात दत्त मंदिर रोड, वाकड येथे आंदोलन करण्यात आले आहे. असे स्वप्निल बनसोडे म्हणाले.
आंदोलनामध्ये युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. ‘झाडे लावा, झाडे जगवा’, ‘झाडे लावा, श्वास वाचवा’, ‘जतन करा वृक्षाचे रेख वाढवा आयुष्याचे’ अशी घोषणा देत पिंपरी चिंचवड पालिकेच्या उद्यान विभागातील अनागोंदी कारभाराच्या विरोधात तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.
या आंदोलनात वाकड युवक काँग्रेस शाखाप्रमुख अध्यक्ष विक्रम कुसाळकर, उपाध्यक्ष रोहन मढीकर, संतोष ओव्हाळ प्रकाश घोडके, अमोल देवकर, सागर हुंडे, अक्षय गायकवाड, उमेश पोकळे, प्रसाद शिरसाठे, सुमीत मंडल, निलेश अडागळे, रोहित भाट, सौरभ शिंदे, अभिजित आटोळे, करण सोनवणे, विजय माने, सूर्यकांत सरवदे इ. कार्यकर्ते व नागरीक आंदोलनात सहभागी झाले होते.