Friday, May 3, 2024
Homeविशेष लेखविशेष लेख : साडी आणि संस्कृतीने गुदमरवलेल्या श्वासांची गोष्ट - रोहिणी नवले

विशेष लेख : साडी आणि संस्कृतीने गुदमरवलेल्या श्वासांची गोष्ट – रोहिणी नवले

साडी विक पॉईंट असफते बायकांचा किती पण मॉर्डन असू दे ती पण तिच्याकडे साडी नाही, असं होणारचं नाही. साडीत स्रियांचं सौंदर्य खुलतं, त्या शालीन, सुसंस्कृत दिसतात. किंबहुना साडी, चोळी घालून  डोक्यावर पदर घेऊन, खाली नजर ठेवून तिने वर्षांनुवर्षे येथील कथित महान आणि सोज्ज्वळ संस्कृतीचे रक्षण केले आहे. अशी ती संस्कृतीची रक्षणकर्ती असूनही तिच्या वाट्याला सती पासून, केशोवपन, काळी टिकली, पांढर कपाळ, पांढरी साडी, हुंडाबळी, शिविगाळ, मारझोड असले प्रकार का आले कुणास ठाऊक? जपत तर होती ती साडी नेसून संस्कृती. पदर सरकला जरा, झाली यांची संस्कृती कलंकित आणि बुडाली सभ्यता लगेच. किती फालतू गोष्टी करतात संस्कृतिरक्षक ह.भ.प.महाराज देवाच्या दारात कीर्तनरुपी समाजप्रबोधन नामक गोष्टीतून बाईच्या पदरावर आणि खाली बसलेली हजारोंची मानसिकदृष्ट्या गुलाम जनता खुशाल खपवून घेते असला फालतूपणा. 

बाईच्या पदरावरून तिच्या चारित्र्याची चिक्कार फाडतोड खुलेआम केली जाते आणि आंधळी, मुकी, बधिर जनता खपवून घेते. पदराच्या डोक्यावरून, खांद्यापर्यंत येण्याने यांची संस्कृती पार रसातळाला जाते कशी काय माहीत. पदराच्या सरकण्याने जर इतकाच संस्कृती ऱ्हासाचा धोका आहे तर घालू द्या की तिला आरामदायी, सोपीसुटसुटीत कपडे. परंपरा तर तशा किती आहेत बघा म्हणजे फार जुन्या पण नाहीत अगदी अलीकडे पण पुरुष धोतर घालायचे, डोक्यावर फेटा गुंडाळायचे, मग आता पण तसं करा, ऐटदार दिसाल की तुम्ही पण अशा पेहरावात, शिवाय परंपरा आहे ती आपल्या संस्कृतीच्या वस्रप्रावरनांची. अशा पोशाखाने जपता येतील परंपरा. जमेल का? नाही जमणार हो ना पुरुषांनो तुम्हाला. कारण तुम्हाला धोतर कुठं नेसता येतं, फेटा कुठे बांधता येतो. पण तुमच्या आईला, बहिणीला, वहिनीला, बायकोला साडी नेसता यायला हवीच नाही का? त्यांना साडी नेसता येत नसेल, नेसायला नकार दिला तर पित्त खवळेल तुमचं. साडी नेसता येत नाही मग तू बाई कशी? बाईपणावर शंका घ्याल तिच्या, तिची प्रतवारी टाकाऊ, फालतू आणि अजून अशा हिणकस गटात करून टाकाल तात्काळ तिच्या इत्तर कोणत्याच गुणवगुणांची दखल न घेता. मग हाच नियम तुम्हाला का लागू नाही होतं? तुम्हाला पण येत नाही धोतर नेसता, फेटा बांधता पण तसं नसतं नाही का. तुम्हाला चालता नाही येत धोतर घालून, फेटा घालून काम करणं अशक्य आहे. कसं वाटेल ऑफिसमध्ये फेटा आणि धोतर. बाईक, फोरव्हीलर कशी चालवणार, लोकलमध्ये कस लटकणार, ही अशी गुंतागुंतीची अजगळ वस्त्र तुमची गती रोखतील, हो की नाही. मग बायका कशा करत असतील पुरुषांनो वर्षांनुवर्षे कामं. त्याच्या प्रगतीला, गतीला नसेल का या प्रकारच्या जुनाट वस्रांनी खिळ बसवली. दिवसरात्र कशा राबत असतील ही नऊ वार सहा वार कापडं अंगाला गुंडाळून, कधी कल्पना केली आहे का. तिचा जीव नसेल का गुदमरत, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ऋतूंमध्ये अशी जड कापडं खरंच सूट होत असतील का त्यांच्या शरीरयष्टीला आणि मुळात ती खरोखर वर्षभर दिवसरात्र वापरावीत इतकी सोयीची, अशी न शिवता अंगाला गुंडाळून ढोर कष्टाची कामं करावीत इतकी उपयुक्त आहेत का ही वस्त्र. की रेटत आलोय फक्त परंपरा आणि संस्कृतीच्या नावाखाली तिचा शारीरिक छळ या साडीच्या पेहरावाने पण आणि तो तसाच सुरूच ठेवणार आहोत अखंड. 

नउवारी साडी घालणाऱ्या बायका आता आजीच्या वयोगटात आहेत बहुतेक. त्या थकल्या आहेत आयुष्यभर मरमर राबून त्यांचा देह पार थकून गेला आहे पण तरीही त्यांना नउवारी नेसावीच लागणार, भार वाटला तरी. तिला या वयात सहजतेने वापरता येईल आणि वावरता येईल अशी कपडे परिधान करण्याची मुभा आपल्याकडे आजही नाही. तिच्या मनात साडीविषयी असं काही भरवलं जातं की साडी नेसल्याशिवाय जणू बाईला अस्तित्वचं नाही. हातपाय थरथर कापत असले स्वतःला साडी नेसता येणं शक्य नसेल, तरी ती नेसावीच, अस म्हणून तर तिला वाटतं असतं. साडीची तिच्यावर वर्षानुवर्षांची सक्ती असं तिचं व्यक्तित्व काबीज करून टाकते. अनेक भागांमध्ये नउवारी नेसणाऱ्या काही महिला चोळी घालतात. चोळी शिवायची पद्धत अनेक भागांत वेगवेगळी आहे. काही भागांत आजही चोळीला फक्त वरच्या बाजुला एक बटन असतं आणि खालच्या बाजूला गाठ मारावी लागते आजही. आजही असं एकच बटणं इतकी यांत्रिक प्रगती झालेली असताना कमाल आहे. अनेक प्रकारचे हुक, फॅन्सी बटन, काय काय निघालेलं असताना केवळ सामाजिक दडपणाने लादलेल्या परंपरां नावाच्या वेडामुळे या बायका जास्तीचे बटन लावत नाहीत. 

नउवारीच्या आणि काही जणींच्या सहावारीच्या पदाराची पण तीच गोष्ट. साधारण पाच रुपयांत डझनभर सेफ्टीपीन मिळतात पण नऊवारी घालणाऱ्या महिलांना त्यातला फक्त एक सेफ्टी पिन वापरायची सवलत नाही. नऊवारीच्या पदराला पिन केलेलं टिव्हीत मिरवणाऱ्या बायकांचं पाहिलं असेल. प्रत्यक्षात त्यांना तो वाऱ्यावर सैरभैर उडून कामांत व्यत्यय आणणारा पदर कंबरेला काचून गुंडाळावा लागतो. पायावर डोकं ठेवताना दातात धरावा लागतो. पदराला पिन केला तर आजही तिला हिनवलं जातं. केवळ तिचा वावर सोयीचा व्हावा म्हणून जर आजही एक साधा पिन पदराला लावता येणं शक्य नसेल तर काय उपयोग या वेगाने होणाऱ्या औद्योगिक प्रगतीचा आणि तुमच्या सगळ्यात महान संस्कृतीचा पण. किती दकलादू आणि उथळ आहेत हे बदल तुमचे मानवी मनाच्या जडघडणीशी घेणं देणं, माणुसपणाशी बंध नसलेले. बाईचा पदर नाही तर असे बदल तुम्हाला रसातळाला घेऊन जाणार आहेत. 

वरवरचे यासाठी की आपल्या सगळ्यांनाचं मोबाईलचे अप्लिकेशन लेटेस्ट हवेत अपडेट करून महिन्याच्या महिन्याला, नखापासून केसांपर्यंतच सगळं फॅन्सी हवं लेटेस्ट. कपड्यांचे, हेअरस्टाईलचे लेटेस्ट ट्रेंड फॉलो करतो आपण, नाही केले तर कस जुनाट वाटत ना सगळं. मग साडीच्या बाबतीत का नाही तसं. हेअरस्टाईलमध्ये काय उपयोगीता असते पण करतो फॉलो चेंज तो डोळे झाकून. ग्रामीण भागात पण यातील सगळं सहज उपलब्द होतं. पण स्रियांच्या कपड्यांच्या बाबतीत तिची सोय, उपयुक्तता यापेक्षा खुळचट, बुरसटलेल्या चालीरीती जुन्यांसह नवीन पिढीला पण आपल्याशा वाटतात. स्रियांच्या साडीच्या बाबतीत बदल नाही. फार फार तर फॅशनेबल साड्या नेसता येतील पण तिला साडी सोडून दुसरा पर्याय नाही कपड्यांचा. इच्छा असली तरी. मुळात असल्या आवडी निवडी करायच्या इच्छा बाईला जगता येणं शिकवलंच नाही जात कधी. त्या दाबून, चिरडून त्यावर आपल्याकडची बाई घडवली जाते साचेबंद. इतकी साचेबंद की आईच मुलीला शिकवते तिच्या इच्छा चिरडून टाकायला, ओढणी अंगावर घे, घरात बाप आहे, आहे भाऊ आहे असं सांगणारी साचेबंद विचारांची बाईच असते. सासू तेच करते जे तिने सोसलं, आई तेचं शिकवते जे तिला शिकवलं. साचेबंद बायकांच्या पिढया अशा पुरुषी विचारांच्या साच्यात स्वतःला बसवणं म्हणजेच जीवनसाफल्य मानतात बाईचं. तिथं कुठून येईल नकाराची ताकद. उठता बसता बाईला धाक दाखवणारे लहानमोठे पुरुष या बायकांच्या नकार न देण्याच्या कमतरतेमुळेच तर घरोघर पोसले आहेत.  

एक भला मोठा कापडाचा तुकडा घ्यायचा अंघोळ झाली रे झाली की करकचून अंगाला गुंडाळायचा आणि व्हायचं सज्ज गुरासारखं राबण्याला. साडी नेसण्याचा असा अट्टहास करणाऱ्यांनो तुमच्या घरात बाईला किमान ती साडी नीट अंगाभोवती गुंडाळता येईल अशी व्यवस्था सुद्धा नाही बऱ्याच घरी. साडी सुटू नये म्हणून ती करकचून कंबरेला फिट्ट केली जाते, कित्येक वर्षे असं करकचून बांधल्यामुळे जाड काळ्या वर्णाचा विळखा पडलेला आहे येथील बहुतांश महिलांच्या कंबरेला. बधिर झाली असावी तेवढी जागा. शरीराच्या उघड्या भागावर उन्हाने काळे वर्ण पडलेले असतात त्यांच्या जे आयुष्यभर तसेच राहातात. कष्टकरी महिलांना घट्ट ब्लाउज किंवा चोळीमुळे किती त्रास होतं असेल. 

उन्हाळ्यात अशी बोजड साडी आणि घट्ट ब्लाउज किती गैरसोयीचे ठरत असतील घामाने मेटाकुटीला येतं असेल ना त्यांचा पण जीव. तुम्ही खुशाल तेव्हा बनियन आणि बर्मुड्यावर हिंडता, ती कशी करत असेल विचार केलाय का. कशी अशा भयंकर उकाड्यात चुलीजवळ रांधत असेल. जत्रा हव्यात, ठसकेबाज लावणी हवी, ती लावणी नाचायला बाई हवी नऊवारी नेसून जाडजूड चाळ बांधून पायांत. ती खरोखरच पोटासाठी नाचते आणि तिचे रक्षणकर्ते म्हणवून घेणारे त्यावेळी शिट्या मारत असतात, पैसे उधळत असतात, अचकट,विचकट बोलत असतात पण सगळंच पारंपरिक आणि संस्कारित असतं कारण ते पुरुषी असतं. आमच्याकडे भात अवणीच्या वेळी गुडघाभर चिखल असतो, अंगावर सतत पाऊस कोसळत असतो. अशा परिस्थितीत कष्टकरी बायका साड्या घालून, डोक्यावर इरनी घेऊन भाताची आवणी करत असतात. एक दिव्य पार पाडत असतात त्या त्यावेळी. गुढघाभर चिखलात राबताना त्यांना साडी किती त्रासदायी ठरत असेल कल्पना करा. कंबरेला खोचून घ्यावी लागते त्यावर पदराचा घट्ट विळखा असतो किती वेदनादायी आहे सगळं. मर मर राबत आसताना किमान सोयीचे कपडे घालण्याची परवानगी सुद्धा तुमची भिकार मानसिकता बाईला देत नाही आणि तुम्ही महान संस्कृतीच्या आणि तुमच्या मर्दुमकीच्या कसल्या पोकळ बाता करता. स्वतः उघडे वाघडे गावभर फिरणारे तुम्ही बाईला पायघोळ गाऊनवर सुद्धा घराबाहेर पडण्याला नकार देता. तिला गाऊनवर ओढणी घ्यायला लावता. पदराच्या ढळण्याने तुमची नीतिमत्ता ढळत असेल तर तुमच्यापेक्षा नरभक्षक प्राणी बरे. निनाद ते तुमच्यासारखा महानतेचा डंका तरी पिटत नाहीत.

समतेची भाषा करणाऱ्या देशात समता किती आहे हे कोणी सांगायची गरज नाही. पण शाळेत गणवेशाने ती भावना वृद्धिंगत होते असं म्हणतात. ही समता पण लिंगभेदाने ग्रस्त असते मुलांना सुटसुटीत शर्ट पॅन्ट आणि मुलींना लांब पंजाबी ड्रेस आणि त्यावर दोन मीटरभर लांबीची ओढनी. कशा येतील मैदानी खेळात पुढे मुली, ड्रेस संभाळतील की मैदानात धावतील. डेज् चे दिवस महाविद्यालयात उत्सवाप्रमाणे साजरे होतात. मुलांसाठी सोयीस्कर टाय डे असतो आणि मुलींसाठी सारी डे, अख्खा दिवस साडी संभाळण्यात जातो. पण तरीही साडी नेसून त्याचं त्यांना शल्य वाटावं असं कधी होतं नाही शिकवण आणि जडणघडणचं तशी केलेली असते तिची.

खरं त्या पुन्हा पुन्हा रोज रोज अग्निपरीक्षा देत आहेत कधी पदर, कधी ओढणी, कधी साडी, कधी बांगडी, कधी टिकली, कधी अमुक, कधी तमुक. नुसत्या साध्य साध्या प्रीतकात्मक गोष्टींसाठी सुद्धा तिची धिंड काढली जाते, घराघरांत तिला धमकावलं जातं, मारझोड केली जाते, तिची पारावर बसून खिल्ली उडवली जाते, चावडीवर बसून तिच्या चारित्र्या चिंध्या केल्या जातात. संसदेतही तिला पुरुषांप्रमाणे पॅन्ट शर्ट घालायची मुभा नाही तिथंही ती ट्रोल होते तिला पेहरावरून लधाडलं जातं.

आपल्याकडे कप्पे आहेत सगळ्यां मूल्यांचे. नग्नतेचे आणि नैतितेचे पण. एकसारखं, समान सगळ्यांसाठी काहीच नाही, नग्नता पण आणि नैतिकता पण. तसं असतं तर कुंभमेळ्यातील नग्नता ही सुद्धा पूजनीय नसून अश्लीलच ठरली असती. साडी नेसणारी बाई जर सुसंस्कृत ठरत असली असती, तर तमाशात बाईला नैतिकतावान पुरुषांनी नाचवलं नसतं. तिची साडी फेडून तिला नासवलं नसतं.हजारो वर्षे झाली तरी आजही हे तिला रोखणं, टोकणं विकणं, मारणं, जाळनं, हिणवनं, नासवंनं सगळंच सुरू आहे जसच्या तसं. तर मग त्यात ओढणी, पदर आणि कपड्यांचा नाहीच दोष सडक्या मानसिकतेचा आहे आणि आपण साडीत श्वास विनाकारण गुदमरून घेतोय. मनासारखं जगता येणं खूप कठीण आहे लगेच सुरवात तर करू, आधी मोकळा श्वास तर घेऊ हवं तसं सोयीचं लेवू कोणत्याही, कोणाच्याही सक्तीशीवाय. आजपर्यंत त्यांनी समाजमन घडवलं त्यांच्या सोयीचं, आता आपण त्यात बदल करू सक्तीचा नव्हे समतेचा. पुरुषप्रधान नव्हे समता प्रधान सभ्यतेचा.

– रोहिणी नवले

– भंडारदरा अहमदनगर

[email protected]

(लेखिका सामाजिक प्रश्नाच्या अभ्यासक असून स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या राज्य कमिटी सदस्य आहेत.)

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय