Monday, May 20, 2024
Homeविशेष लेखविशेष लेख : मोबाईल अतिरिक्त वापराचे दुष्परिणाम

विशेष लेख : मोबाईल अतिरिक्त वापराचे दुष्परिणाम

सध्य स्थितीमध्ये मोबाईल ही काळाची गरज बनली आहे. मोबाईल मुळे अनेक गोष्टी सहज उपलब्ध होऊ लागल्या आहेत. याच्या एका क्लिकने विदेशापासून स्वदेशापर्यंतची सर्व माहिती उपलब्ध होते. यामध्ये शिक्षणापासून जागतिक घडामोडी यांचा आढावा घेणे सहज शक्य झाले आहे. व्हिडिओ कॉल मुळे साता समुद्रापार असणाऱ्यांशी समोरासमोर संवाद साधता येतो. मात्र एका बाजूला वरदान ठरणारा हा मोबाईल याची दुसरी बाजू पाहता दुष्परिणामाचे पारडे जड असल्याचे दिसून येते.

ठराविक वेळेला आणि ठराविक कारणासाठी मोबाईलचा उपयोग केल्यास तो वरदानच ठरेल. मात्र काही घडामोडी पाहता त्याचे दुष्परिणाम अधिक जाणवतात. यामध्ये मोबाइल मुळे घरातल्या घरात कुटुंबीयांचे संवाद कमी झाल्याचे दिसते. नाते, संबंध जिव्हाळा, प्रेम यांचा अभाव दिसतो. मतभेद मनभेद वाढले जात आहेत.

मोबाईल फ्रेंड्स ची संख्या वाढते, मात्र प्रत्यक्षात कमी लोकांचा सहवास पहावयास मिळतो. ऑनलाइन परचेसिंगमुळे हवे ते खाद्य पदार्थ किंवा अत्यावश्यक वस्तू फोनवरून थेट घरी उपलब्ध होतात. त्यामुळे व्यायामाचा अभाव चालण्याचा अभाव परिणामी शारीरिक व्याधी शिवाय मानसिक व्याधीत वाढ होत आहे. तर काही वेळा यात फसवणुकही केली जाते. लहान मुले गेम खेळण्यात व्यस्त दिसतात, याचा परिणाम डोळ्यावर तसाच शरीरावर होऊन शारीरिक व मानसिक व्याधी वाढू लागल्या आहेत.

गृहिणींवरही याचा परिणाम झालेला आढळतो, जास्तीत जास्त मोबाईल वर वेळ जात असल्यामुळे जेवण करताना नूडल्स, पास्ता अशा पदार्थांचा वापर केला जातो, किंवा बाहेरून पदार्थ ऑर्डर केले जातात, परिणामी पौष्टिक व सकस आहाराचा अभाव पहावयास मिळतो. तर कधी कधी लहान मुलांच्या हातात मोबाईल दिल्याने गृहिणी कामांमध्ये व्यस्त होतात, परिणामी मुलांच्या हातून मोबाईल पडल्याने मोबाईलचे काही तुकडे घेऊन दुर्घटना झाल्याच्या घटनाही समोर येतात.

तर काही कुटुंबात मोबाईल वरून वादविवाद होऊन संशय वृत्ती ,घटस्फोट ,खून गुन्हेगारी याच्यामध्ये वाढ झालेली पाहावयास मिळते. तर काही ठिकाणी रिक्षाचालक व इतर वाहन चालक रिकाम्या वेळेत मोबाईलवर जास्त व्यस्त पहावयास मिळतात. परिणामी मेहनत करण्याची वृत्ती कमी झाल्याचे दिसते. तसेच काही तरुण पिढी भरधाव दुचाकी, चार चाकी चालवत असता मोबाईलचा वापर केल्याने अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. फेसबुक, इंस्टाग्राम ,व्हाट्सअप चॅटिंग यांच्या वरून झालेली मैत्री यामध्ये अनेक फसवणुकीचे किस्से पाहावयास मिळतात, यामुळे सायबर क्राईम वाढू लागले आहेत.

शाळेतून मुलांना घरी नेताना पालक वर्ग मोबाईल वर व्यस्त असलेले दिसतात, परिणामी मुले रस्त्यावर मागच्या मागे पडतात किंवा अडखळतात. दुखापत होणे, अशा घटनांच्या संख्या वाढीस लागल्या आहेत. तर मोबाईल वरून झालेल्या मैत्रीमुळे अनेकांनी सुशिक्षित महिला, घटस्फोटीत, विधवा महिला यांना बिझनेस मॅन असल्याचे अमिष दाखवून लाखोंचा गंडा घातल्याची उदाहरणे पाहावयास मिळतात. तर काही कुटुंबीयांमध्ये ऑनलाईन गेम खेळण्याने लाखोंची फसवणूक होऊन नैराश्य आल्याच्या घटना वाढीस लागला आहेत. याचा दुष्परिणाम म्हणून अनेक लोक गायब होत चालले आहेत.

वाचन कमी झाले आहे, त्यामुळे बुद्धिमत्ता वाढीचा तसेच व्यक्तिगत प्रगल्भता याचाही अभाव दिसून येत आहे. परिणामी यांत्रिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या योग्य वापराने वरदान ठरलेला मोबाईल एका दुरुपयोगाने शाप ठरत आहे.

– मंदा संजय बनसोडे, पत्रकार
– पिंपरी चिंचवड

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय