Friday, May 17, 2024
Homeविशेष लेखविशेष लेख : विद्रोही बसवण्णा ! - यश आंबोळे

विशेष लेख : विद्रोही बसवण्णा ! – यश आंबोळे


बसवा भलेभले तुझं कारणे जन साक्षर झाले,

जिथे जावे तिथे नवविचार कानी आले,

आ हा हा ! पृथ्वीवर नवतेज अवतरले !

अशा शब्दांमध्ये गेली नऊशे वर्षे बसवण्णांची महती लोकगीतकार गात आले आहेत. बसवण्णांच्या जीवनलतेवरील विचारपुष्पाचा समतारुपी सुगंध आजही दरवळत आहे. त्या सुगंधाचा एखाद्या भ्रमरा प्रमाणे मागोवा घेत, त्याविचारपुष्पातील ज्ञानरुपी मकरंद शोषून आपण आपले समग्र परिवर्तन करू शकतो. याकरिता त्यांचे समाजक्रांतिकारक विचार समजून घेणे आणि त्याप्रमाणे आचरण करणे  क्रमप्राप्त ठरेल!

भारतामध्ये तथागत गोतम बुद्धांनंतर मानवजातीच्या उद्धारासाठी अत्यंत मोलाचे कार्य महात्मा बसवण्णांनी केले आहे. बसवपूर्व युगामध्ये अशी कोणती परिस्थिती होती की ज्यामुळे बसवण्णांना हे कार्य करावे लागले? त्या काळात देखील संपूर्ण समाजगाड्याचा कणा हा कष्टकरी समाज होता. परंतु मुठभर असणारे ऐतखाऊ लोक बहुसंख्येने असणाऱ्या या श्रमजीवी वर्गाचे शोषण करीत होते. गावामध्ये घाण निर्माण करणारा समाज हा अतिउच्च पातळीवर तर ती घाण काढणारा अर्थात गाव स्वच्छ करणारा समाज हा अतिनीच पातळीवर गणला जात होता. माणुसकीला काळीमा फासणारी समाजव्यवस्था त्याही काळी अस्तित्वात होती या सर्वांचे एक प्रमुख कारण असणाऱ्या भेदमूलक वैदिक व्यवस्थेविरोधात बसवण्णांनी जनआंदोलन सुरू केले. केवळ  तत्वज्ञान न सांगता समताधिष्ठित मानव कल्याणकारी राज्याची निर्मिती आपल्या सहकारी शरणांच्या सहाय्याने केली होती.

आपल्या भूतकाळामध्ये आणि वर्तमानातही आपणाला दोन व्यवस्थेमधील संघर्ष उघडपणे दिसतो. वर्णव्यवस्था, वेदप्रामाण्यवाद, पुरोहितशाही, जातीयता, अस्पृश्यता, पुरूषप्रधानता या अमानवीय रुढी-परंपरांची जोपासना करणारी शोषणाची व्यवस्था एकीकडे आहे. आणि समता, बंधुता, स्वातंत्र्य, न्याय, विवेक, अहिंसा या मानवीय मूल्यांची जोपासना करणारी समाज व्यवस्था दुसरीकडे आहे. याच मूल्यांची जोपासना करणारे जनआंदोलन बाराव्या शतकामध्ये बसवादी शरणांनी उभे केले होते. ते आंदोलन इतके शक्तिशाली होते, इतके विद्रोही होते की, आज एकविसाव्या शतकातही लिंगायत या स्वतंत्र धर्माच्या रूपाने ते आंदोलन टिकून असल्याचे आपण पाहतो. यालाच आपण बसवक्रांती, शरणक्रांती किंवा वचनक्रांती असे संबोधतो.

त्या काळातील शरणांनी केलेले बंड मोडून काढण्यासाठी सनातन्यांनी शरणांचे हत्याकांड घडवून आणले. वचन साहित्याची जाळपोळ करून त्याकरवे तत्कालीन समाजामध्ये सांस्कृतिक व धार्मिक दहशत निर्माण केली. तरीही, पुढे तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात संत नामदेवांनी, तर सोळाव्या शतकात जगद्गुरू तुकोबारायांनी महात्मा बसवण्णांच्या अनुभव मंटपातील समतेची दिंडी पंढरीच्या वाळवंटात आणली. 

ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळ ही अधिकारी । 

बाळे नारी नर आधी करून वेश्याही ।। 

अशी घोषणा करत संत तुकारामांनी प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध बंड केले. हाच प्रतिध्वनी पुढे,

ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राम्हणासी , 

धरावे पोटाशी बंधू परी ।।

या महात्मा फुलेंच्या अखंडातून उमटू लागला. अशाप्रकारे फुले, शाहू, आंबेडकरांनी बुद्ध, बसवण्णां तुकाराम यांच्या विचारांचा वारसा जपत महाराष्ट्रामध्ये समतेची मशाल तेवत ठेवली. परंतु बुद्ध, लोकायत, वारकरी, सत्यशोधक या समविचारी चळवळींच्या मानाने बसवण्णांची ही चळवळ थोडीशी दुर्लक्षित राहिली. त्याला अनेक कारणे आहेत पण त्यापैकी महत्वाचे कारण म्हणजे लिंगायतांचे सर्व साहित्य कन्नड भाषेमध्ये बंदिस्त होते. त्याच्या रक्षणासाठी लपवून ठेवलेले हे वचन साहित्य वचनपितामह डॉ. फ. गु. हळकट्टी व धीमंत सत्यशोधक डॉ. एम. एम. कलबुर्गी आदींच्या अथक परिश्रमातून आपणासमोर यायला आज सुमारे 21 वे शतक उजाडावे लागले. परिणामी बसवण्णांसारखा पुरोगामी चळवळीतील एका ध्रुवताऱ्या पासून आपण काहीसे अनभिज्ञ राहिलो आहोत.

वर्ण-जातिव्यवस्थाविरोधी विद्रोह : 

स्वजातीपासून सर्वच जाती नाकारून, ‘मानवता’ या एकमेव मूल्यावर आधारित समताधिष्ठित परिवर्तनाची सुरुवात  बसवण्णा स्वतःपासून करतात. ते म्हणतात;

चेन्नय्यांच्या (मातंग) घरचा दासपुत्र,

कक्कय्यांच्या (डोहर) घरची दासीकन्या,

दोघेही शेतात गोवऱ्या वेचण्यास गेले नि संग केला;

या दोघांच्या पोटी जन्माला आलेला पुत्र मी;

कुडलसंगमदेव यास साक्षी !

असे अभिमानाने सांगत जन्माधिष्ठीत खोट्या प्रतिष्ठेचा ते धिक्कार करतात. स्वतः जातीमुक्त (decast) झाल्याची ते घोषणा करतात. पुढे, एका वचनामध्ये ते म्हणतात;

वडील आमचे मादार(मातंग) चेन्नय्या,

आजोबा आमचे डोहर कक्कय्या,

चुलते आमचे चिकय्या पहा,

दादा आमचे किन्नरी(सोनार) बोमय्या.

अशाप्रकारे, त्याकाळातील उपेक्षित पददलितांना आपले वडील, आजोबा मानून एक वेगळा आदर्श समाजासमोर निर्माण करतात. जातिव्यवस्थेच्या बंधनांमध्ये हा उपेक्षित समाज इतका जखडला गेला होता की यातून बाहेर पडून आपला आत्मोद्धार आणि समाजोद्धार करणे शक्यच नाही असा न्यूनगंड त्यांच्यामध्ये निर्माण झाला होता. अशा या बहुजन समाजाला एकत्र करून त्यांना माणूस म्हणून जगता यावे यासाठी धर्मावर अधिष्ठित मार्ग बसवण्णांनी निर्माण केला. तत्कालीन समाजामध्ये उतरंडीसम असणाऱ्या जातीव्यवस्थे विरोधात केलेला हा विद्रोह होता.

जातीव्यवस्थेबरोबरच त्याकाळच्या चातुर्वर्ण व्यवस्थेला बसवण्णांनी विरोध केला होता. कपोलकल्पित, अवैज्ञानिक अशा जननाचा स्थानापासून विभागलेली ही व्यवस्था, की ज्यामुळेच सर्व वर्चस्व एका ठराविक समाजाघटकाला बहाल झाले होते, हे सर्व त्यांनी झिडकारले. लोखंड तापवणारा लोहार, कपडे धुणारा परीट,

कापड विनणार विणकर, वेद पठण करणारा विप्र झाला कानातून जन्मले का कोणी या जगतामध्ये  असा प्रश्न विचारत जाती कशा निर्माण झाल्या याचे नेमके स्वरूप स्पष्ट करतात. ‘कोणत्याही जातीचा असो श्री महादेवास स्मरणाऱ्याच्या तोंडचे तांबूल खाईन, त्याची पारोशी वस्त्रे नेसीन, त्याची पादत्राणे राखून जीवन जगेन’ असे सांगताना ‘उत्तम कुळात जन्मलो म्हणून नामुशकीचे ओझे मजवर लादू नका हो !’ अशी नम्र विनंतीही ते करतात.

ग्रंथप्रामाण्यवादास विरोध :

स्पृश्य-अस्पृश्य भेद, कर्मविपाकाचा सिद्धांत नाकारून आपल्या कृतीतून बसवण्णांनी जाती-वर्ण व्यवस्थेचे एक मूळ असणाऱ्या धर्म ग्रंथांच्या प्रमाणास प्रश्न करत ग्रंथप्रामाण्यवादास विरोध केला. शोषणकर्त्यांनी वेद, शास्त्र, पुराणांचे प्रमाण हे अनिवार्य ठरवून बहुजनांना कोंडवाड्यात कोंडले होते. वेदात सांगितलेले अंतिम, शास्त्रांनी सांगितलेले सर्व सत्य आणि स्मृतींनी सांगितले तेच नियम यामुळे इथे प्रश्न विचारण्याला, चिकित्सेला वाव नव्हता. असा हा कोंडवाडा बसवण्णांनी मोडून काढला.

वेदांना बासनात गुंडाळून टाकेन,

शास्त्रांना साखळदंड लावेन,

तर्काच्या पाठीवर आसूड ओढेन,

आगमांचे नाक कापेन,

पहा हो महादानी कुडलसंगमदेवा,

मातंग चेन्नय्यांचा घरचा पुत्र असे मी !

बसवण्णा पुढे म्हणतात,वेदांना भरे हो कापरे, वाटेतून हटली शास्त्रे; चालविता चालेना तर्क, तर्कशास्त्र होई अवाक्;आगमही गेले पळोनि, रे काढता पाय घेवोनी.

मातंग चेन्नय्यांघरी, आवडीने चाखील्यापरी,

आगा कुडलसंगय्याने प्रसाद सेविल्याकारणे.

ग्रंथप्रामाण्यवाद विरोधी संघर्ष करत स्वतःच्या बुद्धी-विचाराला जे पटेल, स्वतःच्या विवेकाला जे रुचेल तेच स्वीकारावे असा विवेकप्रामाण्यवाद, अनुभावप्रामाण्यवाद बसवण्णांनी रुजविला. पुरोहितशाही व देवालय संस्कृती विरोधातील बंड

बसवण्णांनी देव आणि भक्त यांच्यामधील दलाल दूर करून, शोषणाचे केंद्र बनलेल्या मंदिर संस्कृतीस व पुरोहितशाहीस विरोध केला. बाराव्या शतकामध्ये देवळात गेल्यावर तेथील भेदाभेदाची परिस्थिती पाहून, पुरोहितांनी सुरू केलेली शोषणाची बाजारपेठ पाहून बसवण्णा म्हणाले;

सधन बांधती शिवालय,

देवा गरीब मी करू काय ?

देहच माझे देवालय,

देवळाचे खांब माझे पाय,

मस्तक हे सुवर्णकलश,

स्थावर पावे नाश, जंगम हे अविनाश.

धार्मिकदृष्ट्या कर्मनिष्ठ आणि सामाजिकदृष्ट्या वर्ण-वर्गभेदनिष्ठ आशा स्थावर बनलेल्या देवालय संस्कृतीचा त्याग करून, चैतन्यशील आशा परिवर्तनीय जंगम संस्कृतीचा बसवण्णा स्वीकार करतात. केवळ देवालय संस्कृतीला विरोध न करता ‘देह हेच देवालय’, ‘जीव हाच शिव’ आहे असा सकारात्मक पर्याय त्यांनी दिला होता. बसवण्णांनी जीव आणि जगतामध्ये ठायीठायी वसणाऱ्या जगदिशाचे विश्वव्यापक, विश्वाकार असे समतेचे चिन्ह अर्थात इष्टलिंग शरणांच्या करस्थळी दिले. याद्वारे वैदिकांच्या तेहतीस कोटी देव-देवतां पासून लिंगायतांची सुटका केली. तत्कालीन समाजाच्या अमानुष ओझ्याखाली आपले  स्वत्व हरपून बसलेल्या मानवसमूहास इष्टलिंगसाधनेद्वारे आत्मोद्धाराचा पथ बसवण्णांनी दाखविला.

यज्ञ-यागास विरोध :

पशुपालक व्यवसायातून विकसित झालेल्या त्या काळच्या वैदिक संस्कृतीस शेतीचे व जनावरांचे परस्पर महत्त्व माहीत असणे हे संभव नव्हते. त्यामुळे, या जनावरांचा केवळ उदरभरणासाठी उपयोग करावा या हेतून होम-हवन, यज्ञामध्ये पशूंचे बळी देण्याचे स्तोम त्याकाळी माजले होते. या यज्ञास विरोध करताना बसवण्णा अत्यंत साधा प्रश्न विचारतात;

अग्निदेव म्हणून हवी देणाऱ्या विप्राच्या घरास आग लागता,

बोंबा मारत मोरीचे घाण पाणी ओतता,

अग्नीची पूजा करायचे सोडून तिची अवहेलना करता ? या यज्ञयागाचा कृषिसंस्कृतीवरती विपरीत परिणाम होत असे. शेतकऱ्यांच्या आणि श्रमाचे काम करणाऱ्या इतर कष्टकऱ्यांच्या नजरेत जनावरे ही त्यांचे भाग्यविधाते दैवत असतात. त्या दृष्टीने त्यांना पूजतात. त्यांचे कोडकौतुक करतात. परंतु तत्कालीन धर्मव्यवस्थेमध्ये यज्ञाच्या नावाखाली या जनावरांचा अमानुष बळी दिला जात होता. हे पाहून अतिशय उद्विग्न मनाने बसवण्णा म्हणतात;

शब्द प्रमाण मानून मारून टाकतील, रड रे बोकडा रड,

वेद वाचणार्‍या पुढे रड, शास्त्र वाचणार्‍या पुढे रड,

आमचा कुडलसंगमदेव तुझ्या अश्रूंचा योग्य बदला घेईल.

इतकेच काय आजही बारशापासून ते अंत्यविधीपर्यंत आणि गृहशांतीपासून ते थेट विश्वशांती साठीच्या सर्व कर्मकांडात या व्यवस्थेने होम-हवनादी विधींना स्थान मिळवून येथील वैदिक मूर्खतेला बळकट केले आहे. बहुजनांच्या मानवतावादी, पर्यावरणाचे महत्त्व जपणाऱ्या, निसर्गाशी समतोल राखणाऱ्या आचारांना नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न या व्यवस्थेने चालवला आहे. ‘जीवो जीवस्य जीवनम् ‘ हा अहिंसेचा मंत्र खऱ्या अर्थाने जपणाऱ्या बहुजन संस्कृतीतील आचारांना सनातन्यांच्या यज्ञात ‘स्वाहाs!’ होण्यापासून वाचवण्याकरिता बसवण्णांचा ‘तो’ प्रश्न विचारण्याचे धाडस आजही करायला हवे!

पुरुषप्रधानतेचा धिक्कार :

पुरुषप्रधान संस्कृती हे वैदिक व्यवस्थेचे आणखी एक वैशिष्ट्य! स्त्री वर्गाची अवस्था त्यामुळे अत्यंतिक हीन अशी झाली होती. स्त्रीचे सर्व मानव अधिकार काढून घेऊन तिला पशूपेक्षाही खालच्या दर्जाने वागविले जात होते. स्त्रीला तिच्या निसर्गधर्मामुळेच(मासिक पाळी) शूद्र, अपवित्र ठरवून स्त्रियांना व पुरुषांना वेगळे धर्मसंस्कार नेमले होते. जे आजही आहेत. बसवण्णांनी वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी त्यांच्या उपनयन(मौजीबंधन) संस्कारला विरोध करत, स्त्रि-पुरुष समानतेसाठी विद्रोह करून गृहत्याग केला होता. रजःसुतकाद्वारे स्त्रीला अपवित्र ठरवणाऱ्या पावित्र्याच्या ठेकेदारांना शरण बिनतोड सवाल उपस्थित करतात की; ‘मनातील सुतक निघून गेल्यानंतर तनाच्या सुतकला कोठून अस्तित्व?’ ,  ‘स्त्री विटाळशी झाली तरी, तिने लिंगहस्ते केलेला स्वयंपाक केवळ शुद्धच नव्हे, तर अतिपवित्र पाक होय. तो नाकारल्यास द्रोह पहा.’ असे चेन्नबसवण्णा निक्षून सांगतात. शरणांनी स्त्री-पुरुषातील निसर्गदत्त भेदही गौण मानून तिचा अपूर्व, अद्वितीय असा सन्मान केला आहे. म्हणूनच शरणी गोग्गव्वे प्रश्न विचारते;

येता स्तनांना उभारी म्हणता नारी ?

फुटता मिसरूड म्हणताना नर ?

ज्ञान या दोहोंच्या ठायीचे नारी असे की नर ?

निसर्गतः असणारे शरीरभेद वगळता दोघेही समान आहेत. स्त्री आणि पुरुषांना समान धार्मिक-सामाजिक इतकेच काय आर्थिक-राजकीय देखील अधिकार आहेत.  परंपरागत चालत आलेल्या पुरुषप्रधानतेचा धिक्कार करत परस्परांना गौरव देणारी, आत्मीयता, प्रेम, विश्वास वृद्धिंगत करणारी उभयप्रधान संस्कृती बसवण्णांनी निर्माण केली. स्त्री शूद्र आहे, राक्षसी आहे, अपवित्र आहे, मोक्ष मार्गातील धोंड आहे अशा सर्व पुरातन विचारांना नाकारून सर्व क्षेत्रांमध्ये तिला मुक्त स्वातंत्र्य दिले. यामुळेच बसवण्णांनी निर्माण केलेल्या अनुभव मंटपातील ७७० सदस्यांपैकी ७० सभासद या स्त्रिया होत्या. त्यापैकी ३४ स्त्रिया वचनकार होत्या. बसवभगिनी अक्कनागाई, बसवपत्नी नीलांबिका, वीर दान्नम्मा, स्वच्छतेचा कायक करणारी शरणी सत्यक्का, गणिका(वेश्या) संकव्वे इत्यादी शरणी अनुभव मंटपाच्या सदस्या होत्या. या सर्वांमध्ये विरवैराग्यानिधी अक्कमहादेवी ही श्रेष्ठ वचनकार असून कन्नड साहित्यातील ‘आद्य कवयित्री’ म्हणून तिचा गौरव केला जातो. ही सर्व बसवक्रांतीचीच फलश्रुती. आवश्यकतेपेक्षा अधिक सांडलेले तांदुळ वेचून घरी घेऊन आलेल्या आपल्या पतीला ‘इतक्या तांदळाची तुम्हाला अशा का बरे ? आशा राजाला असते शरणांना असावी का ?’ असा प्रश्न करून पतीला अक्कल शिकवणारी लक्कम्मा ही तांदूळ निवडण्याचे काम करणारी सामान्य स्त्री होती. तिने हे धाडस बसवक्रांतीतून कमाविले होते.

सन्यास स्तोमाचे खंडन :

संसार माया आहे, असे सांगत संसराविषयीची घृणा भिनवण्याचा प्रयत्न शतकानुशतके चालत आला आहे. मुक्तीसाठी वैवाहिक विरक्तीची अपरिहार्यता सांगणाऱ्या सिद्धांताचे, ब्रम्हचार्याच्या माजविण्यात आलेल्या अवास्तव स्तोमाचे खंडन करून शरणांनी उभयप्रधान संस्कृतीची उभारणी केली. आध्यात्मिक उन्नतीकरिता ‘संन्यास श्रेष्ठ, गृहस्थ कनिष्ठ’ असा भेद करणाऱ्यांना बसवण्णा प्रश्न विचारतात; ‘देह ब्रह्मचारी झाला तरी काय उपयोग ? आशा ब्रह्मचारी होईपर्यंत.’

भगवी वस्त्रे, जटा, कमंडलू यासारख्या केवळ बाह्यअवडंबराने सन्यासी होता येत नाही तर त्यासाठी मनाचे विकार दूर करायला हवेत असा संदेश देतात. पती-पत्नीमधील जिव्हाळ्याचे व आत्मीय सहसंबंध हे कर्म-धर्मास हानिकारक नसून पुरकच आहेत असे सांगून, दाम्पत्य धर्माची श्रेष्ठता शरण प्रतिपादित करतात. ‘भक्ताचे मन स्त्रीमध्ये गुंतल्यास लग्न करून संसार करावा’ असा सल्लाही ते देतात. सती-पतीचे जीवन हे जणू ‘उभय नेत्रांनी एकाच दृष्टीने पाहिल्यापरी, उभय पाऊलांनी एकाच चालीने चालल्यापरी’ असते असे सांगून, समरस दाम्पत्यजीवनाचे यथार्थ समर्थन स्वतः वैराग्यशिरोमणी असणारे अल्लमप्रभुदेव करतात, हे विशेष! शरणांनी दाविलेल्या आदर्श जीवनशैलीमध्ये सन्यास जीवनाचा उदो-उदो नव्हे तर दांपत्य जीवनाचा गौरवच होता.  शरण संकुलातील बसवण्णा-गंगांबिका-नीलांबिका, मोळीगे मारय्या-महादेवी, आय्दक्की मारय्या-लक्कम्मा, इत्यादी उभयत्यांनी आपल्या आदर्श दाम्पत्य जीवनाद्वारे सामाजिक-आध्यात्मिक विकास साधत संन्यास स्तोमाचे खंडन केले आहे.

 

ज्ञानसंपदेच्या मक्तेदारी विरोधातील बंड :

तत्कालीन भेदमूलक व्यवस्थेमुळे बहुजन समाज हा अज्ञानाच्या अंधःकारामध्ये लोटला गेला होता. वैदिक संस्कृती ही शोषकांची भाषा बनली होती. अशा या बौद्धिक संपदेच्या मक्तेदारी विरुद्ध बसवण्णांनी बंड केले. बाराव्या शतकात ज्यांच्यासाठी ज्ञानाची कवाडे खुली नव्हती त्यांना कंठ असूनही बोलता येत नव्हते, अशा लोकांसाठी त्यांच्याच सहकार्याने अनुभव मंटप साकारले. ज्ञानप्रसाराद्वारे त्यांच्या मुक्या देहास ध्वनी देऊन त्यांच्या अन्याय अत्याचारा विरुद्ध विचारांना बोलतं केले. ‘अनुभव मंटप’ ही केवळ चार भिंतींनी बांधलेली वास्तू नव्हती तर लोकशाही तत्त्वांचा पुरस्कार करणारी जगातील पहिली समाजोधार्मीक संसद होती. या अनुभव मंटपामध्ये सकळजनांना मुक्त प्रवेश व समान दर्जा दिला होता. या अनुभव मंटपाचे पहिले अध्यक्ष  ‘अल्लमप्रभु’ या शूद्र जातीत जन्मलेली व्यक्ती होती.

अनुभव मंटपात धार्मिक, सामाजिक, नैतिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक अशा सर्व विषयांवर खुल्या चर्च्या होत. या विचारमंथनातून प्रकटलेले आमृत म्हणजेच वचन साहित्य होय. अल्पकाळातच अनुभव मंटपाची कीर्ती सर्वदूर पसरली. ज्ञान जिज्ञासेपोटी काश्मीरहून महादेव भूपाल, अफगाणिस्तानहून मरुळशंकरदेव, गुजरातहून आदय्या, ओरिसाहून सुज्ञानिदेव, मध्यप्रदेशातून कक्कय्या, महाराष्ट्रातून सिद्धरामेश्वर, तामिळनाडूहून चेन्नय्या, आंध्रातून ब्रम्हय्या आदी लोक देशाच्या कानाकोपऱ्यातून कल्याण नगरीत दाखल झाले. शूद्र, दलित, शेतकरी, कष्टकरी, व्यसनी, वेश्या अशा सर्वांना एकत्रित करून, त्यांना व्यक्तीपासून समष्टीपर्यंतच्या विकासाच्या कल्याणकारी शिक्षण पद्धतीद्वारे शिक्षित करणारे अनुभवमंटप हे खऱ्या अर्थाने तत्कालीन विश्वविद्यालयच नव्हे का ? बसवण्णा येथील कुलगुरू तर अनुभवमंटपाचे अध्यक्ष अल्लमप्रभूदेव येथील कुलपती होते. या सर्व शरणांनी शिक्षित होऊन आपले जीवन-विचार शब्दांमधून मांडले, वैदिकांच्या संस्कृत भाषेला नाकारून सर्वसामान्यांच्या मातृभाषेतून(कन्नड) वचन साहित्याची निर्मिती केली. यामुळे शोषकांच्या डबक्यामध्ये साचलेली ज्ञानगंगा प्रवाहित होऊन, लोकभाषेमधून बहुजनांपर्यंत गेली!

अंधश्रद्धेचा विरोध :

अंधश्रद्धेचे निर्मूलन करण्यासाठी बसवण्णांनी ज्ञानाचा, विज्ञानाचा आणि विवेकाचा मार्ग आपल्या वचनांमधून उद्बोधीत केला आहे. एका वचनामध्ये अल्लमप्रभु म्हणतात;

जपमाळेचे मणी मोजून काळ घालवू नको रे,

दगड-धोंडे पुजुनी दिवस घालवू नको रे,

क्षणभरासाठी देखील सत्याचे स्मरण पुरे…

असे हे अंधश्रद्धा विरोधी शरणांचे विचार आज एकविसाव्या शतकातील विज्ञान युगातही आपणाला मार्गदर्शक आहेत. पंचसुतक, स्वर्ग-नरक, कर्मसिद्धांत, पुनर्जन्म, ज्योतिष, मुहूर्त, शकुन-अपशकुन, वार, तिथी, नक्षत्र, पंचांग, बहुदेवोपासना, उपवास या सर्वांविषयी बसवण्णा वैज्ञानिक मांडणी करून त्याची चिकित्सा करत आपणाला विवेकाचा मार्ग दाखवितात.

त्याकाळात समाजातील तर्कबुद्धिच्या गैरहजेरीचा केवळ आपल्या स्वार्थासाठी फायदा घेत ज्योतिष-पंचांगकर्त्यांनी आपल्या अवैज्ञानिक कल्पनाशक्तीचा बाजार मांडला; आजही या बाजारामध्ये ग्रह-गोल, नक्षत्रे त्यांना नेमून दिलेल्याच जागी आपले दुकान थाटून दारात येणाऱ्या प्रत्येक अज्ञानी ग्राहकांची पिळवणूक करण्याचे काम जोमाने करत आहेत. यासर्वांविषयी शरणांनी केलेली तर्कशुद्ध जागृती आजही प्रस्तुत ठरते. ‘पंचांग या शब्दाचा अर्थ सांगता न आल्याने ज्योतिष बरबाद झाले’ असा दावा करत पुढे शरण विचारतात;

पंचांग ऐकलेल्या दक्षब्रम्हाचे मुंडके का उडाले ?

पंचांग ऐकलेले पांडव देशोधडीला का लागले ?

पंचांग ऐकलेल्या श्रीरामाची पत्नी रावणाने का पळविली ?

पंचांग ऐकलेल्या इंद्राचे शरीर जखमांनी का भरले ?

आशा पुराणप्रसिद्ध नायकांची उदाहरणे देऊन पंचांग पाहणाऱ्यांची ते खिल्ली उडवितात.

बसवण्णांनी स्वर्ग-नरकाच्या तर कल्पनाच बदलल्या ‘सदाचार हाच स्वर्ग, दुराचार हाच नरक,

सत्य बोलणेच देवलोक, असत्यची मृत्यूलोक’ असे सांगून स्वर्ग-नरकाच्या नावाखाली होणाऱ्या शोषणाला, अंधश्रद्धेला त्यांनी मूठमाती दिली. तत्कालीन समाज आणि काही प्रमाणात आजचाही समाज हा आपले इहलोकीचे जीवन जणूकाही परलोकीच्या जीवनाची पूर्वअट आहे आणि म्हणून हे क्षुल्लक आहे, असे मानून येथील जीवनाला महत्त्व देत नाही. मेल्यानंतर काही तरी आपल्याला मिळणार आहे, त्यासाठी आत्ता चांगलं वागलं पाहिजे किंवा मेल्यानंतर आपल्याला काहीतरी मिळू नये म्हणून इथे वाईट वागलं नाही पाहिजे, असा व्यवहार करत आहे. आशा सर्व समाजाला आज बसवण्णांचे ‘सदाचार हाच स्वर्ग, दुराचार हाच नरक’ असे सांगणारे विचार निश्चितच मार्गदर्शक आहेत.

‘दगडाच्या नागास दुध वाहता,

जिवंत नाग दिसताच ठेचून मारता,

भुकेला जंगम(व्यक्ती) आल्यास पुढे जा म्हणता,

न खाणाऱ्या देवास मात्र नैवेद्य दाखविता…’

‘पाणी दिसताच डुबक्या मारती,

झाड दिसताच फेऱ्या घालती,आटणारे पाणी, वाळणारे झाड याला पूजणारे,

तुम्हास कसे जाणती, कुडलसंगय्या. ‘

अशा आपल्या दैनंदिन जीवनातील अज्ञानाने भरलेल्या दांभिक वर्तनाकडे बोट दाखवून आपल्या अविवेकावरती त्यांनी ठपका ठेवला आहे.

‘जमीन एकच : महारवाडा आणि शिवालयाची, पाणी एकच : शौच आणि आचमनाचे’

असे सांगत पवित्र-अपवित्र असे काही नसून केवळ स्वच्छ व अस्वच्छ हेच भेद विज्ञानाने मान्य केले आहेत असे सोदाहरण स्पष्ट करतात. ‘आज, उद्या नका म्हणू, आजचा दिवसच सर्वश्रेष्ठ कुडलसंगमास न चुकता स्मरणाऱ्यास.’ आशा श्रद्धापूर्ण भाषेतून शरणांनी अंधश्रद्धांचा कडाडून विरोध केला आहे. अनुभवरूपी ज्ञानप्रकाशाच्या तेजाने अंधश्रद्धेच्या अंधःकाराचा समूळ नाश करता येतो, हे बसवण्णांनी दाखवून दिले आहे!

आर्थिक विषमतेचे उच्चाटन :

समाज परिवर्तन करायचे झाले तर आर्थिक विषमता दूर करणे अगत्याचे आहे हा आधुनिक विचार बसवण्णांनी जाणला होता. म्हणूनच आर्थिक समानतेसाठी कायक व दासोह या तत्त्वांची मांडणी त्यांनी केली. कोणतेही श्रम असो, मग ते बौद्धिक असो वा शारीरिक, श्रेष्ठ-कनिष्ठ असे नसून दोन्हीही तीतक्याच पात्रतेचे, तितक्याच आवश्यकतेचे आहेत. सत्य,शुद्ध,नित्य असे श्रम/काम म्हणजे ‘कायक’ होय. वर्णव्यवस्थेमुळे जातीधर्मामध्ये बंधिस्त झालेला उद्योग बसवण्णांनी मुक्त केला. कायक म्हणजे कलेचा आविष्कार आणि कायक करणारी व्यक्ती म्हणजे कलाकार अशी मांडणी करून कायकाद्वारे श्रमप्रतिष्ठा मिळवून दिली. कायकातून मिळालेल्या मोबदल्यापैकी आवश्यक तेवढेच आपल्याजवळ ठेवून इतर सर्वाचा समाजाच्या उपयोगासाठी विनियोग करावा हे ‘दासोह’ तत्त्व बसवण्णांनी सांगितले. कायकाशिवाय दासोह करता येत नाही आणि दासोहाखेरीज कायक अपूर्ण, म्हणूनच कायक-दासोह या एकमेकांपासून कधीही अलग न करता येणाऱ्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बसवण्णांना केवळ नवीन धर्म स्थापन करायचा नव्हता तर नवसमाज निर्माण करायचा होता, त्यामुळेच नित्य लिंगार्रचनेसोबत नित्य कायक-दासोह करणे ही देखील अनुभव मंटपाच्या सदस्यत्वाची पूर्वअट ठेवली होती.

कायकातून व्यक्तीस्वातंत्र्य आणि दासोहाद्वारे सामाजिक बांधिलकीची जपणूक करत व्यक्तीहितापासून समाजहित साधणारी अर्थनीती ही बसवण्णांची अखिल मानवसमाजाला दिलेली अमूल्य भेट होय. बसवकाळात कल्याणमध्ये मागणारे(याचक) कोणीही नव्हते या बहुश्रुत उक्तीस प्रमाण असणारा, ‘श्रम माझे, श्रमाचे फळ आपणा सर्वांचे’ हा आदर्श अर्थसिद्धांत तत्कालीन समाजामध्ये बसवण्णांनी रुजविला होता.

अशा रीतीने बसवण्णांनी धर्म, समाज, अर्थ अशी आमूलाग्र क्रांती घडवून आणली. दरवेळी प्रचलित व्यवस्था नाकारून पर्यायी व्यवस्था उपलब्ध केली. नव्या दिशेची नवी वाट त्यांनी दाखविली. या सर्व परिवर्तनासाठी समाजातील प्रत्येक घटकाविषयी आदराची व आपुलकीची भावना असणे आवश्यक आहे, हे बसवण्णांनी जाणले होते आणि म्हणूनच विश्वबंधुत्वाची व्याख्या करताना बसवण्णा म्हणतात;

हा कोणाचा ? हा कोणाचा ? हा कोणाचा ? 

असे न वदावे

हा अमुचा, हा अमुचा, ऐसेची वदवावे !

बाराव्या शतकातील बसवण्णांच्या या हाकेला आजच्या एकविसाव्या शतकामध्ये प्रतिसाद देण्याकरिता त्यांचे विचार आपण आचरणात आणून त्यांना अभिप्रेत असणारी ‘कल्याण’ राज्यनिर्मिती आपण साकार करू शकतो.

शरणू शरणार्थी !

– यश आंबोळे, कोल्हापूर

[email protected]

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय