Thursday, May 2, 2024
Homeविशेष लेखरविवार विशेषविशेष लेख : आता आम्ही ‘विकेल तेच पिकवू’!

विशेष लेख : आता आम्ही ‘विकेल तेच पिकवू’!

 

शेती व्यवसाय हा भारतीय अर्थ व्यवस्थेचा कणा आहे. हे पुन्हा कोरोना सारख्या महामारीच्या काळात सिद्ध झाले… सगळा देश लॉकडाऊन होता… रस्ते थांबले होते… सगळी चाकं जाम होती, पण शेत आणि शेतकरी पोशिंद्याच्या भूमिकेत होता. महाराष्ट्रा सारख्या प्रगत राज्याने या कोरोना काळात उत्तम नियोजन करुन प्रत्येकाच्या घरात भाजी जाईल हे पाहिले. त्याला सातारा जिल्हाही अपवाद नव्हता.

सातारा जिल्ह्यातील भाजीपाला अगदी मुंबई, पुणे, कोकणातही जातो… लोकांच्या जेवणात हिरवा भाजीपाला देऊन शरीराला आवश्यक असलेल्या मिनरलचा पुरवठा होता…. आता तर राज्य शासनाच्या ‘विकेल ते पिकेल’ या योजनेंतर्गत शेतकरी आणि ग्राहक एकत्र आले आहेत. 26 जानेवारी रोजी साताऱ्यात संत शिरोमणी सावता माळी रयत बाजाराचे उद्घाटन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील भाजीपाला ग्राहकांपर्यंत पोहविणाऱ्या शेतकऱ्याची कथा.

रमेश बळवंत ससाणे भुईंज ता. वाई येथील विविध प्रयोग करणारे शेतकरी त्यांच्या संयुक्त कुटुंबाची एकूण 30 एकर शेती आहे. त्यांना नुकतेच शेडनेट उभारणीकरिता शासनामार्फत 50 टक्के अनुदान मिळाले आहे. आता त्यांनी या शेडनेटमध्ये ढोबळी मिर्चीची  लागवड केलेली असून स्वत:चा माल ते स्वत:च ग्राहकांपर्यंत पोहोचवतात. थेट माल ग्राहकांपर्यंत जात असल्याने थेट नफा त्यांना मिळत आहे. त्यांनी केलेले काम इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन होईल असेच आहे.

रमेश बळवंत ससाणे हे भुईंजचे राहणारे शेतकरी आहेत. शिक्षण 9वी पर्यंत झालेलं. या शेडनेटमध्ये ‘पसरेला’ जातीच्या ढोबळी मिरचीची लागवड केली.  सगळा देश लॉकडाऊनमध्ये असताना सप्टेंबरमध्ये हे उभं केलं. याचा खर्च जवळ जवळ 13 लाख रुपये आहे. या शेडनेटसाठी शासनाच्या कृषी विभागाने जवळजवळ 6 लाख रुपयांचं याला अनुदान दिले आहे. यांना यातून जे अपेक्षीत उत्पादन मिळणार आहे ते २० टन असणार आहे. जवळजवळ १० लाख रुपये यांना यामार्फत मिळणार आहेत.  याच्यातला निव्वळ नफा साडेसात लाख पर्यंत जातो. या २० गुंठ्यात शेडनेट मिरची पिकवणे सुरु आहे. प्रत्येकी ४ दिवसाला या मिरचीची तोडणी करतात आणि ठाणे, मुंबई येथील मार्केट आणि स्थानिक मार्केटमध्ये उत्पादित माल विकतात.  एवढ्या 20 गुंठ्याची जागा म्हणजे जवळ जवळ ½ एकरच्या क्षेत्रामध्ये ते कोरडवाहू मधल्या 10 एकर जमिनीतपण निघणार नाही एवढा माल ते एकट्या 20 गुंठ्यात करतात. त्यांना कृषी विभागाचं  मोठं सहकार्य असून वेळोवेळी मागदर्शनही त्यांना मिळतं, 4 ते 5 दिवसाला याच्यावर फवारणी होते. अशा या आगळ्या वेगळ्या आर्थिक कृषी शास्त्रामुळे प्रचंड नफ्यामध्ये आहे. याचा जो खर्च झालेला आहे तो येत्या 1-2 वर्षामध्ये निघून जाईल आणि उरलेला जो नफा आहे तो नफा शेतकरी आर्थिक उन्नत कसा होतो हे दाखवण्यासाठी खूप बोलकं उदाहरण आहे.

 

रमेश ससाणे यांचं संयुक्त कुटुंब आहे. त्यांच्या घरात एक ॲग्रीकल्चर पदवीधर असल्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे. अगदी कुठली जात वापरायची, मातीचा पोत कुठला आहे. या मातीत कोणत्या प्रकारचे पिक येऊ शकते. हे दुसऱ्या क्रमांकाचे शेडनेट आहे.  याच्या अगोदरपण यांनी शेडनेट घेतलेलं आहे आणि कृषी विभागाची साथ आहे. आणि रात्रंदिवस  फक्त शेती हा यांचा ध्यास आहे. या ध्यासातून त्यांनी आज हे सगळं उभं कलेलं आहे. आणि अक्षरश: सोनं ते उगवतात असं एकूण चित्र आहे. सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगणं आहे की, जर शेती मन लावून केली शास्त्र शुद्ध पद्धतीने केली, बाजार मागणी बघून जर केली तर शेती ही परवडू शकते हे याचं बोलकं उदाहरण म्हणजे रमेश सासणेंची शेती आहे.

शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती केली तर निश्चितपणे त्यांना शेतीमध्ये चांगलं उत्पन्न मिळून चांगली आर्थिक उन्नती होवू शकते हे या जिल्ह्यातील रमेश ससाणे यांचे उदाहरण आहे.

 

– युवराज पाटील,

–   जिल्हा माहिती अधिकारी, सातारा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय