Monday, September 16, 2024
Homeविशेष लेखरविवार विशेषविशेष लेख : गांधीजींना किती वेळा मारणार ? - विशाल आडे

विशेष लेख : गांधीजींना किती वेळा मारणार ? – विशाल आडे

Photo : Aman Pandey/Twitter

गांधीजींचे विचार आपल्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगांवर छाप पाडणारे आहेत. ते विचार आजही जिवंत आहेत आणि राहतील. संपूर्ण जग ज्या व्यक्तीला मानतो त्याच्या स्वत:च्या देशात आज पुन्हा त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गांधीजींची हत्या म्हणजे त्यांच्या विचारांची हत्या आहे. आज, ३० जानेवारी राष्ट्रपिता महात्मा गांधींजींची पुण्यतिथी; त्यानिमित्ताने…

‘कट्टरपंथी सोच तो, चर्चा से घबराय।

लढ पाये ना विचारोंसे व्यक्ती को मरवाय।।

हे एक वैश्विक सत्य आहे. अगदी सॉक्रेटिसपासून तर डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेशपर्यंत अशी या मालिकेतील नावे सांगता येतील. जे लोक आपल्या विरोधी तत्त्वांचा वैचारिक पातळीवर पाडाव करू शकत नाहीत ते शस्त्र हाती घेत विचार देणाऱ्या व्यक्तींना मारत सुटतात. संघटना स्थापन करून लोकांच्या मनात विष पेरतात. तरुणांची डोकी भडकवली जातात आणि विरोधी विचार असणाऱ्यांच्या हत्या घडवून आणल्या जातात. हिटलरच्या ‘नाझी संघटने’पासून तर ओसामा बीन लादेनच्या ‘अल कायदा पर्यंतच्या तमाम संघटना हेच करतात. 

मोहनदास करमचंद गांधी अर्थात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसेने बिरला हाऊसमध्ये गोळ्या घालून ठार केले. गोडसेने त्याआधी २० जानेवारी १९४८ रोजी हॅण्डग्रेनेड फेकून गांधीजींना मारण्याचा प्रयत्न केला होता, पण तो फसला. त्यावेळस त्यांचा एक साथीदार मदनलाल पहावा पकडला गेला. 

या घटनेमागील तत्कालीन कारणांचा विचार केल्यास किंवा जे कारण सांगितले गेले, ते होते पाकिस्तानच्या वाट्याला आलेली ५५ कोटी रुपयांची रक्कम देण्याबद्दल गांधीजींचा असलेला आग्रह. तत्कालीन परिस्थितीत दुसऱ्या कारणाची शक्यता म्हणजे, दिल्ली आणि एकूणच भारतात होत असलेला हिंसाचार थांबावा म्हणून महात्मा गांधींनी सुरू केलेला उपवास. हा उपवास सुरू करण्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच १२ जानेवारी १९४८ रोजी त्यांना हा उपवास का करावा लागला, हे त्यांनी मोठ्या दुःखद अंत:करणाने संध्याकाळच्या प्रार्थना सभेत सांगितले होते. आजही रोज कुठे ना कुठे गांधी मारल्या जात आहेत कधी शब्दातून तर कधी कृतीतून. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना गांधीजींच्या १५०व्या जयंतीनिमित्त ‘लिडरशिप मॅटर्स रिलेव्हन्स ऑफ गांधी इन कंटेपररी वर्ल्ड’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस गट्रेस यांनी सांगितले की, ‘गांधीजींची दृष्टी व तत्त्वज्ञान हे संयुक्त राष्ट्राचे मूळ आधारस्तंभ आहे. त्यांनी भारतातल्या वसाहतवादाच्या जोखडातून मुक्त केले. त्यांचा विचार हा राजकारणापलीकडे मानवी हक्क व शाश्वत विकासाला प्रेरणा देणारा होता. समाजातील कुठलाही घटक मागे राहता कामा नये, त्यांच्याबाबत भेदभाव होता कामा नये, हीच त्यांची शिकवण होती.’ याच शिकवणुकीचा पाठपुरावा करीत असताना गांधीजींना आपले बलिदान द्यावे लागले. 

गांधीजींना एकदा मारून टाकल्यानंतरही काही अत्यंतिक टोकाचा विचार मनात बाळगणाऱ्यांत आजही शत्रू रूपात ‘गांधी’ जिवंत असल्याचेच अनेकदा आपल्या निदर्शनास येते. याचे अलीकडचेच अतिशय हिणकस उदाहरण म्हणजे उत्तर प्रदेशमधील अलीगढ येथील देता येईल. ३० जानेवारी २०१९ रोजी जेव्हा संपूर्ण देश राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या ७१व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतींत नतमस्तक होता असताना अलीगढ येथील हिंदू महासभेच्या स्थानिक शाखेने गांधीहत्येच्या दृश्य उभे केले. गांधीजींना असे कितीवेळा मारणार? गांधीजी हे एक असे रसायन आहे की त्यांना समजणे अतिशय कठीण आहे. कुठल्याही ठोकताळ्यात त्यांना बसवता येत नाही. कवीवर्य कलिम खान यांचा एक दोहा आहे – 

गांधी के व्यक्तीत्व से, बडे-बडे चकराय।

गांधी भी खुद को कभी, शायद समझ न पाय।। 

गांधीजींपासून देशाला धोका होता का? ज्या देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून गांधीजींनी आपले संपूर्ण आयुष्य पणास लावले. ते स्वत:च देशाला नुकसान पोहोचवणार का? त्यांचे ध्येय फक्त एकच होते, ते म्हणजे स्वराज्य! आणि तेही कोणतीही हिंसा न करता, कोणालाही नुकसान न पाहोचवता. मग ते आपल्या देशाला नुकसानदायी कसे? 

डॉ. मार्टिन ल्युथर यांनी गांधीजींबद्दल लिहिताना म्हटले, ‘गांधीजींना भारतीयांनी समजूनच घेतले नाही. हिंदू लोकांना वाटते की, ते मुस्लिमांना सहकार्य करतात. मुस्लिमांना वाटते की ते हिंदूंना सहकार्य करतात. मागासवर्गीय समाजातील लोकांना वाटते की ते वर्णभेद करतात.’ त्यांचे हे लिखाण वाचून वर्तमानातील संदर्भ त्यात दडले असल्याचे जाणवते. ‘गांधीजींनी जर प्रयत्न केले असते तर भगतसिंग वाचू शकले असते’ असे बोलून युवकांना, ‘गांधीजींनीच पाकिस्तान वेगळे केले’ असे सांगून कट्टर हिंदूंना, ‘गांधीजी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विरोध करायचे’ असे बोलून मागासवर्गीयांत गांधींबद्दल असूयेची भावनाच पोहोचविण्याचे प्रयत्न आजही केले जात आहेत. गांधी ही एक व्यक्ती नसून विचार आहे आणि त्या विचाराची भीती त्यांना आजही आहे. गांधीजींचे विचार आपल्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगांवर छाप पाडणारे आहेत. ते विचार आजही जिवंत आहेत आणि राहतील.

– विशाल आडे 

– MPSC अभ्यासक व मार्गदर्शक

– मो. नं 8888480392

– जिल्हा – नांदेड

संबंधित लेख

लोकप्रिय