Thursday, November 21, 2024
Homeविशेष लेखविशेष लेख : ताक - पृथ्वीवरचे अमृत

विशेष लेख : ताक – पृथ्वीवरचे अमृत

आयुर्वेदात ताकाला पृथ्वीवरचे अमृत म्हटले आहे. आयुर्वेदानुसार ताक हे आंबट, तुरट, रसात्मक असून भूक वाढवणारे आहे. ताकाचा महत्त्वाचा गुण म्हणजे अजीर्णामुळे पोटात साठलेला आम्लदोष कमी होतो. ताक बनविण्यासाठी वापरलेल्या विरजणात लॅक्टोबॅसिलस, स्ट्रेप्टोकोकस जीवाणू असतात, त्यामुळे ताक शरीरासाठी जास्त फायदेमंद असते. Buttermilk

दही घुसळून लोणी काढून घेतल्यावर राहिलेल्या भागाला ताक म्हणतात. ते लोण्याच्या उत्पादनात उपपदार्थ म्हणून मिळते. लोण्याच्या उत्पादनासाठी गोडी मलई वापरली असेल, तर त्यातील ताकाचे संघटन मलईरहित दुधासारखे असते, मात्र आंबट मलई वापरली असेल, तर ताकात लॅक्टिक अम्ल जास्त असते. ताकात स्निग्ध पदार्थाचे प्रमाण कमी असून पाणी जास्त असते कारण दही घुसळताना त्यात थोडेफार पाणी घालावे लागते. ताजे ताक चवीला आंबटसर असून त्याला विशिष्ट स्वाद असतो, पण शिळे झाल्यास ते जास्त आंबट होते व पुढे पुढे ते कळकून त्याला कडवट चव येते व वासही येतो.

ताकाची कढी, मठ्ठा, पीयुष वगैरे पदार्थ करतात किंवा ते थंड करून पितात. ताकाच्या प्रत्येक १०० ग्रॅम मध्ये जलांश ९७·५%, प्रथिने ०·८%, मेद १·१%, इतर कार्बोहायड्रेटे ०·५%, कॅल्शियम ३० मिग्रॅ, फॉस्फरस ३० मिग्रॅ, व लोह ०·८ मिग्रॅ . असून त्यांपासून १५ कॅलरी ऊर्जा मिळते.

उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता भरुन काढण्यासाठी किंवा अशक्तपणा दूर करण्यासाठी ताकाचे सेवन हे शरिरासाठी उत्तम असते. कोल्डड्रिंक किंवा अन्य शीतपेय पिण्यापेक्षा ताक हा चांगला पर्याय आहेत. फक्त उन्हाळ्यातच ताक प्यावे, असेही काही नाही. कारण पावसाळा आणि हिवाळय़ामध्ये आपल्याला भूक जास्त लागते मात्र पाणी पिण्याचे प्रमाण आपसूकचं कमी होत. अशा वेळी दिवसातून एकदा किंवा दोन ते तीन दिवसांतून एकदा ताक पिणे उपयुक्त ठरू शकत.

ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान होते. ताकाच्या नियमित सेवनाने शरीरातील चरबी देखील कमी होते. इतकेच नव्हे तर, ताक त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. वारंवार लघवीचा त्रास होत असेल, तर ताकात मीठ टाकून प्यावे. यामुळे त्रास कमी होतो. जायफळ पूड ताकात मिसळून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते. Buttermilk


ताक बाजारात सहज उपलब्ध आहे. पण, घरी दही तयार करून बनवलेले ताक अधिक पौष्टिक आणि चविष्ट असते. तुम्ही ते तुमच्या रोजच्या जेवणासोबत किंवा नंतर ताक पिऊन तुमचे आरोग्य निरामय ठेवा. Buttermilk

संबंधित लेख

लोकप्रिय