Friday, April 26, 2024
Homeविशेष लेखविशेष लेख : तीन गर्भगृहाचे प्राचीन स्थापत्य: जगदंबामाता टाहाकरी

विशेष लेख : तीन गर्भगृहाचे प्राचीन स्थापत्य: जगदंबामाता टाहाकरी

टाहाकरी : अकोले तालुक्यातील आढळा नदीच्या तीरावरील चोहोबाजूंनी शीळाखंडांनी बांधलेल्या उंच भिंतींच्या आवारातील प्राचीन बंदिस्त मंदिर. भव्यदिव्य दिसणाऱ्या या मंदिराचे जिर्नोद्धारात केलेले आकाशी निळ्या रंगाचे पाच कळस दुरुनच दिसतात. उत्तर-दक्षिण बांधकाम असलेले संपूर्ण घडीव कातळातील प्राचीन जगदंबा मातेचे दुरून आधुनिक काळातले वाटणारे हे मंदिर संरक्षक भिंतीच्या आत प्रवेश केल्यावर मात्र मंदिराच्या प्राचीन स्थापत्य कलेने आपण आवक् होऊन जातो. या मंदिराच्या रचनेत मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह असे चार भाग आहेत. या मंदिराचे वेगळेपण म्हणजे या मंदिरात तीन गर्भगृह आहेत. यातील दक्षिणेकडे मुख्य गर्भगृहात जगदंबा मातेची उत्तराभिमुख स्थापना केलेली आहे. या मुख्य गर्भगृहात देवीचा तांदळा ठेवलेला आहे. यामागे अष्टभुजा जगदंबा मातेची काष्टक मूर्ती दोनशे ते अडीचशे वर्षापूर्वी धामणगाव चे सुतार शिरसाठ यांनी स्वतः तयार करून स्थापना केलेली आहे.

पूर्व व पश्‍चिम गर्भगृहातील मूर्तींना १९९० च्या दरम्यान जिर्नोद्धाराच्यावेळी रंगकाम केलेले आहे. या मंदिराचे दुसरे खास आकर्षण म्हणजे मंदिराच्या छताला कोरलेले दगडी झुंबर. प्राचीन स्थापन किती वैभवशाली होते याची प्रचिती करून देते. या मंदिराची रचना एकूण ७२ कोरीव काम केलेल्या खांबांवर केलेली केलेली आहे. अतिशय भव्यदिव्य व डोळ्यांचे पारणे फेडणारे नक्षीकाम बघत बाहेर यावे. बाहेरील बाजूलाही आपल्याला हे  प्राचीन स्थापत्य वैभव मोहित करते.

मंदिराच्या कोणात दुमडलेल्या बाह्यभागात अंतर्भागाइतकाच सुरेख आहे. पुर्वेकडुन मंदिर प्रदक्षिणेला सुरूवात केल्यास अनेक सुंदर मूर्तींचे कोरीव काम आपले लक्ष वेधून घेते. एक सारख्या आकाराच्या मात्र वेगवेगळी नृत्य, वादन व शस्त्र धारण केलेल्या एकूण २२ सुरसुंदरी यांचे कोरीव काम लक्षवेधी आहे.  पुर्वेकडील कोनाड्यात चामुंडेश्वरीची अक्राळ-विक्राळ मूर्ती व देवकोष्टकाखाली गर्भगृहातील पाणी जाण्यासाठी असलेले मकर मुख हे या स्थापत्याचे आणखी एक वेगळेपण आहे. मंदिराचा अंतर्भाग व बाह्यभाग अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण व नाविन्यपूर्ण कलांनी सजलेला आहे.

अंतर्भाग व बाह्यभाग बघत उत्तरेकडील आढळा नदीच्या घाटावरील कोरीव खांब व त्यावरील अप्रतिम नक्षीकाम आपल्या नजरेस येते येते. घाटावर अनेक कोरीव दगड ठेवलेले आहेत, हे सर्व बघत घाटाच्या उजवीकडे एक सुंदर कोरीवकाम केलेले प्रवेश द्वार दिसते. प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर उंच कळस असलेले श्री शेष विष्णू मंदिर व मुख्य गर्भगृहातील शेनसडा मनाला शांती देऊन जातो. अतिशय निसर्ग संपन्न आढळा नदी तीरावरील हे प्राचीन मंदिर १९५८ च्या २४ व्या प्राचीन स्मारके आणि पुरातत्त्वीय स्थळे व अवशेष अधिनियमाद्वारे राष्ट्रीय महत्त्वाचे म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

नवरात्रीत येथे सलग अकरा दिवस सप्ताह असतो. यावेळी संपूर्ण गावाला तसेच येणाऱ्या भाविकांना भोजन व्यवस्था असते. दसऱ्याच्या आदल्या दिवशी येथे मोठा होम केला जातो. मंदिर जीर्णोद्धार व भक्तांसाठी स्थानिक कमिटीने अनेक कामे केलेली दिसून येतात. असे हे प्राचीन वैभवाची साक्ष देणारे व अनेक वैशिष्ट्यांनी युक्त असे जगदंबा मातेचे टाहाकरी या गावातील वैभवशाली प्राचीन मंदिर.

– अरविंद सगभोर

  8055333936

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय