Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडSolapur:कॉम्रेड आडम मास्तर यांच्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या घरकुल प्रकल्पाचे पंतप्रधान मोदी...

Solapur:कॉम्रेड आडम मास्तर यांच्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या घरकुल प्रकल्पाचे पंतप्रधान मोदी यांचे हस्ते 19 जानेवारी रोजी लोकार्पण,15 हजार माता भगिनींना देणार चाव्या

कॉम्रेड आडम मास्तर यांची स्वप्नपूर्ती अभूतपूर्व स्वप्न साकार,गोरगरीब कामगारांच्या 30 हजार घरांचा प्रकल्प पूर्णत्वाकडे

लोकप्रिय असंघटीत कामगारांचे नेते कॉम्रेड आडम मास्तर यांनी केला 14 वर्षे घरासाठी संघर्ष


सोलापूर:सर्व घरांची मालकी महिलांकडे असणाऱ्या रे नगर येथील 30 हजार असंघटित कामगारांच्या घरांपैकी पहिल्या टप्प्यातील 15 हजार घरांचे वाटप शुक्रवार 19 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान आवास योजना शहरी भाग अंतर्गत रे नगर च्या माध्यमातून सोलापूर मधील 30 हजार असंघटित कामगारांना परवडणाऱ्या दरात सहकारी तत्वावर महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प कुंभारी येथे सोलापूरचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कामगार नेते व माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नातून साकार केला आहे.
गोरगरीब बिडी कामगार,अंगमेहनती,यंत्रमाग कामगार सह हजारो लोकांना स्वतःच्या मालकीच्या घरकुलाचे स्वप्न साकार व्हावे,यासाठी कॉम्रेड आडम मास्तर गेली 20 वर्षे सरकार दरबारी संघर्ष करत होते.


संपूर्ण आयुष्य त्यांनी कामगार कष्टकऱ्याना सामाजिक व आर्थिक न्याय देण्यासाठी अर्पण केले आहे.ऐन तारुण्यात लाल ब
बावटा हाती घेऊन सोलापूर शहरातील कामगार वस्तीमध्ये श्रमिक लढा सुरू केला.
कामगारांसाठीच्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या 10 हजार घरांचे गोदूताई परुळेकर वसाहतीचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि जेष्ठ कामगार नेते तसेच या गृहप्रकल्पाचे प्रवर्तक नरसय्या आडम मास्तर यांच्या स्वप्नातील दुसरा 350 एकरावरील देशातील पहिलाच असंघटित कामगारांसाठीचा गृहप्रकल्प अर्थात “रे नगर” चा पथदर्शी प्रकल्प तयार झाला आहे.

सोलापुरात आधी सूतगिरणीमध्ये काम करणारे आता वस्त्रोद्योग, विडी उद्योग,बांधकाम अशा विविध क्षेत्रात हजारो कामगार सोलापुरात काम करत असतात. गरिबी पाचवीला पूजलेली असताना या कामगारांना मोडक्या तोडक्या घरांमध्ये राहण्याशिवाय पर्याय नसतो. मात्र संपूर्ण आयुष्य झोपडपट्टीत घालवणाऱ्या या कामगारांचे स्वतःच्या हक्काचं घर स्वप्न साकार करण्यासाठी कॉम्रेड आडम मास्तरांनी उर्वरित 30 हजार घरकुले पंतप्रधान आवास योजने अंतर्गत पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान,नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री फडणवीस,खासदार शरद पवार यांच्यासह सर्वांना या प्रकल्पाच्या पूर्तीसाठी गाठी भेटी घेतल्या,केंद्र राज्यसरकारच्या विविध प्रशासकीय विभागातील आवास योजनेसंबंधीत विविध मंजुऱ्या मिळवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले.
देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत असलेल्या सोलापुरातल्या रे नगर येथे हा आशियाखंडातील सर्वात मोठा परवडणाऱ्या घरकुलांचा प्रकल्प पूर्ण होत आहे.
रेनगर च्या लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यातील 15 घरे हस्तांतरण करण्यासाठी दस्तुरखुद्द पंतप्रधान येणार असल्याची माहिती गृहनिर्माण विभागाचे सहसचिव कुलदीप नारायण यांनी दिली आहे.

अशी आहे रे नगरची पंतप्रधान आवास योजना


एकूण 350 एकर परिसर,एकूण 834 इमारत,प्रत्येक इमारतीत 36 फ्लॅट्स,एकूण 30 हजार कुटुंबासाठी घर,एकूण 60 मेगावॅट विजेचे प्रकल्प काम सुरु, 20 मेगावॅटचे काम पूर्ण,परिसरात 7 मोठ्या पाणी टाकी, ज्याची क्षमता 29 mld आहे,यामुळे 24 तास पाणी पुरवठा शक्य,परिसरात मलशुद्धीकरण केंद्र,स्वतंत्र घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा,विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदतर्फे शाळा, अंगणवाडी सोय,खेळण्यासाठी क्रीडा मैदान,आरोग्यासाठी हॉस्पिटल आदी सर्व नागरीसुविधा सह परिपूर्ण 15 हजार घरांच्या चाव्या लाभार्थ्यांना सुपूर्द करण्याचा मोठा कार्यक्रम 19 जानेवारी 2023 रोजी सोलापूर येथे संपन्न होत आहे.


कोण आहेत कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर

कामगारांसाठी दिवसातील बारा-चौदा तास काम करणारा व दरवाजा कोणासाठीही केव्हाही उघडा ठेवणारा नेता म्हणून माकप नेते नरसय्या आडम यांची ओळख आहे.कामगारांचे लढे ते रस्त्यावर तर लढलेच; पण त्याचबरोबर अगदी न्यायालयातही कामगारांच्या बाजूने स्वतंत्रपणे खटले त्यांनी लढवले.महाराष्ट्रातील कामगार चळवळीत गेली 60 वर्षे ते काम करत आहेत.सोलापूर शहरामध्ये मोठे मोर्चे काढणारा अलीकडच्या काळातील एकमेव नेता आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा संघर्ष योद्धा म्हणजे आडम मास्तर….
सोलापूरसारख्या मोठया शहरात असंघटित कामगारांच्या हितासाठी अखंड संघर्ष करणारा लढवय्या नेता म्हणून त्यांना महाराष्ट्रात ओळखले जाते. विधानसभेत विरोधाची खिंड एकतर्फी लढवणारी, सत्ताधार्‍यांच्या विरोधात आग ओकणारी बुलंद आवाजात विधानसभेत त्यांनी कामगारांच्या आर्थिक,सामाजिक मागण्यासाठी अभ्यासपूर्ण तोफ म्हणून आडम यांची ख्याती आहे.


ध्वनिक्षेपकाची गरज न भासता खणखणीत आवाजात सभागृह दणाणून सोडणारा, सरकारला मुद्दय़ावर रोखून धरणारा नेता म्हणून आडम यांना सगळीच नेते – पत्रकार मंडळी ओळखतात. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये मूलत: अतिशय खालच्या केडरमध्ये काम केलेला हा कार्यकर्तासोलापूर मनपा मध्ये नगरसेवक,आमदार तसेच पक्षपातळीवर विविध जबाबदार्‍या पार पाडत अविरत संघर्ष केला आहे.
आणीबाणीनंतर 1978 च्या विधानसभा निवडणुकीत मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आडम आमदार विधानसभेत गेले,आडम मास्तर यांची वाटचाल अतिशय खडतर आहे.मॅट्रिक झाल्यानंतर तंबू थिएटरमधील चित्रपटांची पोस्टर्स भिंतीवर डकवत ते सोलापुरातून भटकायचे.त्यांचे वडील कॉम्रेड नारायणराव आडम यांनी त्यांना विणकरांच्या मुलांच्या शिकवण्या घेण्यास सांगितले.आडम हे तेव्हापासून मास्तर झाले ते आजही सारा महाराष्ट्र त्यांना मास्तर म्हणूनच ओळखतो. सोलापुरात काँग्रेसचे प्राबल्य असताना तीन वेळा ते विधानसभेवर निवडून गेले. त्याअगोदर तीन वेळा ते नगरसेवक होते.
कामगारांसाठी दिवसातील बारा-चौदा तास काम करणारा व दरवाजा कोणासाठीही केव्हाही उघडा ठेवणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. कामगारांचे लढे ते रस्त्यावर तर लढलेच; पण त्याचबरोबर अगदी न्यायालयातही कामगारांच्या बाजूने स्वतंत्रपणे खटले त्यांनी लढवले. सोलापूर शहरामध्ये मोठे मोर्चे काढणारा अलीकडच्या काळातील एकमेव नेता म्हणजे आडम मास्तर, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही. कामगारांसाठी सहकारी तत्त्वावर मास्तरांनी उभारलेली गोदुताई परुळेकर गृहनिर्माण संस्था या विशेष कामामुळे त्यांना पक्षात राष्ट्रीय स्तरावरून वाहवा मिळाली.दहा हजार घरकुले त्यांनी उभारली असून आणखी 30 हजार घरकुले उभारण्याची योजना त्यांनी हाती घेतली.


विशेष म्हणजे मुंबईत किंवा दिल्लीत पक्षाची सत्ता नसताना सत्ताधार्‍यांकडून सहकार्य मिळवत घरकुलांसाठी त्यांनी यशस्वी खटपट केली आहे. विधानसभेत काम करीत असताना उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार त्यांना मिळाला हे विशेष.
कष्टकरी जनतेसाठी सातत्याने आवाज उठवितानाच त्यांच्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कृतिशील असणारे नरसय्या आडम यांच्यासारखा राजकारणी विरळाच. प्रत्येक समाजघटकाकडे फक्त मतदार म्हणून पाहत राजकारण करणाऱ्या नेत्यांची संख्या वाढत असताना, त्यांचे कार्य अधिक ठळकपणे अधोरेखित होते. सोलापूरसारख्या बहुभाषिक गिरणगावातील कामगारांचे आणि श्रमिकांचे प्रश्न,त्यांच्या अडचणी यांसाठी तब्बल सहा दशके ते रस्त्यावर उतरून लढत आहेत.आज देशात असंघटित कामगारांचे प्रमाण 38 कोटींच्या आसपास आहे,त्यांच्या आयुष्यातील अनेक स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागणार आहे,अशा काळात कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांचे कार्य दीपस्तंभा सारखे आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय