ठाणे : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) चे चौथे ठाणे-पालघर जिल्हा अधिवेशन संपन्न झाले. वाडा येथील एसएफआय संघटनेच्या सभागृहात झालेल्या अधिवेशनाची सुरुवात संघटनेचे ध्वज फडकावून आणि शहीदांना अभिवादन करून झाली.
या अधिवेशनास अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राज्य सरचिटणीस प्राची हातीविलेकर, एसएफआयचे केंद्रीय कमिटी सदस्य व राज्य उपाध्यक्ष सोमनाथ निर्मळ, केंद्रीय कमिटी सदस्या डॉ.कविता वरे, किसान सभेचे नेते किरण गहला, प्रकाश चौधरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
अधिवेशनात मागील कार्याचा तसेच शैक्षणिक परिस्थितीचा आढावा घेणारा अहवाल मांडण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक मागण्यांचे ठराव संमत करण्यात आले. या अधिवेशनाने २१ सदस्यांची नवीन जिल्हा कमिटी निवडली. नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष म्हणून नितीन कानल आणि जिल्हा सचिव म्हणून भास्कर म्हसे यांची एकमताने निवड करण्यात आली.