Friday, November 22, 2024
Homeजिल्हापुणे विद्यापीठातील शुल्कवाढी विरोधात विद्यार्थ्यांचा उद्या विद्यापीठ बंदचा इशारा

पुणे विद्यापीठातील शुल्कवाढी विरोधात विद्यार्थ्यांचा उद्या विद्यापीठ बंदचा इशारा

भर पावसात दुसऱ्या दिवशीही विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच

पुणे, दि. १२ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भरमसाठ वाढलेल्या शुल्कासह अन्य मागण्यांसंदर्भात सलग दुसऱ्या दिवशीही भर पावसात विद्यार्थ्यांचे बेमुदत घंटानाद आंदोलन सुरूच आहे. या सर्व आंदोलक विद्यार्थ्यांनी आज संपूर्ण विद्यापीठ परिसरात शुल्कवाढ जनजागृती वारी काढत (दि. १३) विद्यापीठ बंदचा इशारा दिलेला आहे.

कुलगुरू, प्र-कुलगुरू आणि कुलसचिव यांनी आंदोलकांना भेट देऊन शुल्कवाढीसंदर्भात समिती नेऊन योग्य तो निर्णय घेऊ, असे तोंडी सांगितले. परंतु या सर्व गोष्टी लेखी स्वरूपात हव्यात असे आंदोलक विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.

आंदोलकांनी आज (दि. १२) विद्यापीठ आवारात शुल्कवाढ जनजागृती वारी काढली. यात सर्व विभाग, ग्रंथालय, भोजनालय, मुलांचे-मुलींचे वसतिगृह आदींना भेटी देऊन आज विद्यापीठ बंद ठेवण्याचा इशारा दिला. वारीदरम्यान भीम आर्मी तथा आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. चंद्रशेखर आजाद यांनी विद्यार्थ्यांची भेट घेत संवाद साधला. ही लढाई योग्य असून या आंदोलनास माझा पूर्ण पाठिंबा आहे. तसेच कुलगुरूंची भेट घेऊन यावर लवकरच तोडगा काढायला सांगू आणि यावर मार्ग काढला नाही तर माझ्यासह संपूर्ण आझाद समाज पार्टी या आंदोलनात सहभागी होईल, असे ते यावेळी म्हणाले.

आम आदमी पक्ष, SPPU टीचर्स असोसिएशन, विद्यार्थी दलित पँथर, युवक क्रांती दल, एस.एफ.आय., लोकायत, नेट-सेट-पीएच.डी.धारक संघर्ष समिती आदि संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून सदर आंदोलनास पाठिंबा दिला.

संबंधित लेख

लोकप्रिय