पिंपरी-चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : शहरातील नाट्यगृह, प्रेक्षागृहांच्या खासगीकरणाचा घाट घातला आहे. ठेकेदारांच्या तुंबड्या भरण्यासाठी नागरिकांच्या करातून उभारलेले नाट्यगृहे खासगी केली जात आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. त्यामुळे नाट्यगृह, प्रेक्षागृहांच्या खासगीकरणाचा विचार करू नये, अन्यथा हा डाव हाणून पाडू, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतिश काळे यांनी दिला. पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात नमूद केले आहे की, पिंपरी चिंचवड मधील नागरिकांच्या कष्टाच्या कररूपी पैशातून महापालिकेने शहर उभा केले. शहरातील नागरिक, कलावंतांना कार्यक्रम करता यावे यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून सुसज्ज नाट्यगृहे, प्रेक्षागृहे उभारले आहेत. यामध्ये संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे सभागृह, चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, नवी सांगवी येथील निळू फुले नाट्यगृह, भोसरीतील कै. अंकुशराव नाट्यगृह निर्माण केली होती. या मध्ये आता निगडी प्राधिकरण येथील गदिमा नाट्यगृहाची भर पडली आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून ही नाट्यगृहे उभारली आहेत. या मध्ये सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात कार्यक्रमासाठी नाट्यगृह उपलब्ध करून दिले जात आहेत.
मात्र सध्या ही नाट्यगृह चालत नसल्याचे कारण सांगून खासगी तत्त्वावर देण्याचा विचार महापालिका प्रशासन करत आहे. खासगीकरणाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लूट करण्याचा डाव महापालिकेचा आहे. या मधून ठेकेदाराचे हित जोपासले जाणार आहे. शहरातील सामाजिक, सांस्कृतिक संघटनांना कार्यक्रम घेणे मुश्कील होणार आहे. एका बाजूला करातून सुविधा देणे जबाबदारी असताना दुसरीकडे होणारी आर्थिक लूट ही सर्वसामान्य नागरिकांचा संताप वाढवणारी आहे.
त्यामुळे शहरातील नाट्यगृह, प्रेक्षागृहांच्या खासगीकरणाचा विचार सोडावा. अन्यथा महापालिकेवर तीव्र आंदोलन करू,असा इशारा काळे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. सदर निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश दहिभाते, जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर लोभे, शहर अध्यक्ष सतीश काळे, शहर कार्याध्यक्ष संजय जाधव, उपाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सचिव निरंजन सोखी, संघटक अभिषेक गायकवाड यांच्या सह्या आहेत.