अमरावती : महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते, पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी अमरावतीतील कार्यक्रमात केले आहे.
शिवप्रतिष्ठान नावाची संघटना चालविणाऱ्या संभाजी भिडे हे जाणिवपूर्वक धार्मिक, जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्य सार्वजनिक रित्या करत असतात. ते वादग्रस्त वक्तव्य करून नेहमी चर्चेत असल्याचे पहायला मिळते.
बडनेरा मार्गावरील जय भारत मंगलम येथे गुरुवारी रात्री संभाजी भिडे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना भिडे म्हणाले, मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले, त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले असल्याचे सबळ पुरावे उपलब्ध असल्याचा दावाही यावेळी संभाजी भिडे यांनी केला.
दरम्यान, या वादग्रस्त वक्तव्यानंतर संभाजी भिडे यांचा सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे. तर राज्याच्या पावसाळी अधिवेशनात देखील भिडेचा मुद्दा गाजला. भिडेंना अटक करण्याचे मागणी देखील जोर धरत आहे. परंतु आरएसएस व भाजपाचे जवळीक असलेल्या भिडेंवर सरकार कारवाई करण्यास का ? हे सवाल आता उपस्थित होते आहे.