Friday, May 17, 2024
Homeसंपादकीयकव्हर स्टोरीसाकेत गोखले यांनी निवडणूक आयोगावर केले धक्कादायक आरोप; नंतर घराबाहेर "जय श्रीराम"...

साकेत गोखले यांनी निवडणूक आयोगावर केले धक्कादायक आरोप; नंतर घराबाहेर “जय श्रीराम” च्या घोषणा देत दिल्या धमक्या: वाचा सविस्तर

(ठाणे) : माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांनी गेल्या दोन दिवसापासून अनेक धक्कादायक आरोप केले आहे. त्यावरून सध्या राज्यासह देशभरात गोंधळ उडाला आहे. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्य निवडणूक आयोगाने सोशल मीडियाचे काम भाजप नेत्याच्या कंपनीला आणि आयटी सेलला दिला असल्याचा धक्कादायक आरोप साकेत यांनी केला होता, यावरून साकेत यांना अनेक धमक्या आल्या असून त्यांच्या आईला सुद्धा धमकवण्यात आले आहे.

कोण आहे साकेत गोखले?

      

साकेत गोखले हे ठाण्यात राहत असून ते पत्रकार आहेत. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांचे प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. तसेच ते आरटीआय कार्यकर्ते देखील आहेत. या माध्यमांतून त्यांनी अनेक प्रकरणे बाहेर काढले आहेत.

नेमकं प्रकरण काय आहे?

साकेत गोखले यांनी महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकी वेळेस राज्य निवडणूक आयोगाने सोशल मीडियाचे काम भाजपाच्या आयटी सेलचे काम पाहणाऱ्या व्यक्तीला आणि त्याच्या कंपनीला दिले होते. तसेच निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षासाठी काम करत असल्याचा आरोप गोखले यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. हे आरोप केल्या नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही कार्यकर्त्यांनी साकेत गोखले यांच्या घरा समोर जाऊन “जय श्रीराम” च्या घोषणा दिल्या. तसेच संघाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या आईला धमकी दिल्याचे त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हंटले आहे.

राज्याच्या निवडणूक आयोगाकडे मागितला अहवाल.

राज्य निवडणूक आयोगाने सोशल मीडियाचे काम भाजपाच्या आयटी सेलचे काम पाहणाऱ्या व्यक्तीला आणि त्याच्या कंपनीला दिले असल्याचा आरोप झाल्यानंतर भारतीय निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्या शेफाली शरण यांनी साकेत गोखले यांच्या आरोपाची गंभीर दखल घेत याप्रकरणी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयोग अधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागविण्यात आला आहे.

१० मिनिटात १३८ धमकीचे फोन

या प्रकरणानंतर त्यांना १० मिनिटात १३८ वेळा संघ समर्थकांकडून धमकीचे फोन असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच बरोबर त्यांचा नंबर भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना कसा मिळाला? असा प्रश्न ही उपस्थित होताना त्यांनी झी न्यूजने बातमी प्रसार करताना त्यांचा नंबर जनतेपुढे प्रसारित केल्याचे त्यांनी ट्विटरवर सांगितले.

देशाच्या सर्वधर्म समभाव आणि लोकशाहीसाठी लढायला आणि मरायला पण तयार

साकेत गोखले यांनी “भाजपाने किती ही राजकिय खेळी केली. माझ्या विरूद्ध किती ही प्रचार, मोदींंच्या चूकीच्या गोष्टीवर पाठिंबा देणाऱ्या न्यूज चॅनलनी केला किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून किती ही धमक्या आल्या. तरीही मी संघाच्या हिंदूत्वाला बळी पडणार नाही. भारताच्या सर्वधर्म समभाव आणि लोकशाहीसाठी लढायला आणि मरायला पण तयार आहे. मी अशा प्रकारे माझे काम चालूच ठेवेल” असे हि ते म्हणाले. 

गृहमंत्र्यांचे कारवाईचे आदेश

या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी साकेत गोखले यांना तातडीने संरक्षण देत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. तसेच ठाणे पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत.

आयोगाचे काम करणारी कंपनी भाजप नेत्याची

२०१९ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने सोशल मीडिया चालवण्यासाठी ज्या कंपनीला काम दिले. त्याच कंपनीला भाजपने सुद्धा नियुक्त केल्याचा धक्कादायक आरोप साकेत यांनी केला आहे. विशेष म्हणजे ही कंपनी भाजपा नेत्याच्या मालकीची असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या कंपनीचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध असल्याचा त्यांचा दावा आहे.

ही कंपनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या आयटी आणि सोशल मीडियाचे राष्ट्रीय संयोजक देवांग दवे यांच्या मालकीची आहे. साकेत गोखले यांनी भाजपा आयटी सेलच्या सदस्याला महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याचं सोशल मीडिया हाताळण्याची जबाबदारी का देण्यात आली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

राजकीय आणि सामाजिक पडसाद

साकेत गोखले यांच्या मदतीच्या ट्विटनंतर ट्विटर वर मोठे वादळ उठले होते. अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी साकेत यांची बाजू घेत त्यांना संरक्षण देण्याची मागणी केली.

दरम्यान, काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी म्हटले आहे, की हे प्रकरण गंभीर वळण घेत आहे. आम्ही आरएसएसच्या या गुंडांना आपण लोकशाहीत आहोत याची आठवण करून दिली पाहिजे. याशिवाय हे एमव्हीए सरकार आहे आणि येथे गुंडवाद सहन केला जाणार नाही. हे उत्तर प्रदेश सरकार नाही, असेही त्यांनी म्हंटले होते.

दरम्यान, यावर अद्याप भाजपाने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच, देवांग दवे यांनी सर्व आरोप फेटाळले असून निराधार असल्याचं म्हटलं आहे. आपली प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय