Sunday, May 19, 2024
Homeराष्ट्रीयसाहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर; ‘उद्या’ कादंबरीस साहित्य अकादमी पुरस्कार

साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर; ‘उद्या’ कादंबरीस साहित्य अकादमी पुरस्कार

नवी दिल्ली : प्रसिद्ध लेखक नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या  कांदबरीस वर्ष 2020 साठीचा सर्वोत्कृष्ट मराठी कलाकृतीचा साहित्य अकादमी पुरस्कार आज जाहीर झाला. तसेच प्रसिद्ध बाल साहित्यिक आबा महाजन लिखित ‘आबाची गोष्ट’ या लघुकथा संग्रहास ‘बाल साहित्य पुरस्कार’ जाहीर झाला आहे.

साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठित ‘साहित्य अकादमी पुरस्कार २०२०’ ची  आज घोषणा झाली. अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील २० भाषांकरिता ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ तसेच २१ लेखकांना ‘बाल साहित्य पुरस्कार’ तर १८ भाषांकरिता ‘युवा पुरस्कार’ विजेत्यांची घोषणा करण्यात आली.

साहित्य अकादमीने आज २० प्रादेशिक भाषांतील सात कविता संग्रह, चार कादंबऱ्या, पाच कथासंग्रह ,दोन नाटके, एक संस्मरण आणि एक महाकाव्य या सर्वोत्कृष्ट कलाकृतींना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर केला. यात मराठी भाषेसाठी प्रसिद्ध लेखक नंदा खरे यांच्या ‘उद्या’ कादंबरीस हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

या पुरस्काराचे स्वरूप 1 लाख रूपये, ताम्रपत्र आणि शाल असे असून यावर्षी विशेष समारंभात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मराठी साहित्यातील पुस्तक निवड समितीमध्ये प्रसिद्ध साहित्यिक वसंत आबाजी डहाके, सतीश काळसेकर आणि डॉ. निशिकांत मिराजकर यांचा समावेश होता. मल्याळम, नेपाळी, उडिया आणि राजस्थानी भाषेसाठीचे पुरस्कार येत्या काळात घोषित करण्यात येणार आहेत.

‘उद्या’ विषयी…

‘उद्या’ हा मागील तीनशे वर्षांपासूनचा लेखकाच्या मनातील सल आहे. लेखकाने कमालीच्या अस्वस्थतेतून वर्तमानाचा वेध घेत या कादंबरीत भविष्याचा बहुआयामी पट सादर केला आहे. या कादंबरीत  सुदीप जोशी, अरुण सन्मार्गी, सच्चिदानंद भाकरे, सानिका धुरू या प्रमुख पात्रांच्या आयुष्यावर सहजगत्या प्रकाश टाकला आहे. सायबर क्राइम आयुक्त झालेला अरुण सन्मार्गी हा अभिव्यक्ती व वर्तन विश्लेषक आहे. सुदीप जोशी हा महिकादळ या मुंबईतील एका प्रमुख पक्षाच्या संघटनेच्या  प्रमुख नेत्याचा लेखनिक आहे.अशा प्रकारे कादंबरीतील सर्व पात्रांना या कादंबरीत उत्तमरित्या न्याय देण्यात आला आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय