Saturday, May 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडमहापालिकेतील ६८ सफाई कर्मचाऱ्यांना दिलासा

महापालिकेतील ६८ सफाई कर्मचाऱ्यांना दिलासा

आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश

पिंपरी चिंचवड
: महापलिका आरोग्य विभागांतर्गत काम करणाऱ्या ६८ कर्मचाऱ्यांची बदली एका क्षेत्रीय कार्यालयातून दुसऱ्या क्षेत्रीय कार्यालयात करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांची गैरसोय होत असून, प्रशासनाने प्रभागांतर्गत बदली करण्याबाबत सकारात्मक विचार करावा,अशा सूचना भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिल्या आहेत.

आरोग्य विभागात काम करणाऱ्या ६८ कर्मचाऱ्यांची प्रशासनाने अन्य क्षेत्रीय कार्यालयामध्ये बदली केली. यामध्ये आरोग्य मुकादम आणि सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांचा बदलीला विरोध नाही. मात्र, प्रभागांतर्गत बदली व्हावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी संघाच्या प्रतिनिधींनी आमदार महेश लांडगे यांची भेट घेतली.

यावेळी महासंघाचे उपाध्यक्ष अभिमान भोसले, लाला गाडे, दिलीप गुंजाळ,नितीन समगीर, आदी प्रतिनिधींनी आमदार लांडगे यांना मागणीचे निवेदन दिले.

अन्य क्षेत्रीय कार्यालयात बदली केल्यामुळे कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. कामगारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. काही कामगारांची सेवानिवृत्ती जवळ आली आहे. वयोमानानुसार काहीजणांना अन्य ठिकाणी कर्तव्य बजावण्यात आव्हानात्मक होत आहे. काही अंशत: अपंग कर्मचारी आहेत. निवासाजवळ काम असल्यामुळे वेळेवर कामावर येणे शक्य होणार आहे. त्यामुळे बदलीला विरोध नाही. मात्र, आहे त्याच प्रभागामध्ये बदली व्हावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली. दरम्यान, आमदार लांडगे यांनी महापालिका प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांच्याशी तात्काळ फोनवर संपर्क साधला आणि कर्मचाऱ्यांच्या समस्येबाबत चर्चा केली. आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे संबंधित ६८ कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

‘पीएमपीएमएल’ कर्मचाऱ्यांसाठी दोन दिवसांत बैठक

‘पीएमपीएमएल’ कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती व सातवा वेतन आयोग लागू करण्यासह अन्य मागण्यांसाठी ‘पीएमपीएमएल’ कर्मचारी महासंघाच्या प्रतिनिधींनी आमदार महेश लांडगे यांची भेट घेतली. यावेळी महासंघाचे सचिव दिपक गळीतकर यांनी मागणीचे निवेदन दिले. यावर आमदार लांडगे यांनी ‘पीएमपीएमएल’च्या व्यवस्थापकांशी संपर्क केला. पीएमपीएमएल संस्थेला पुणे महापालिका ६० टक्के आणि पिंपरी-चिंचवड महापालिका ४० टक्के अर्थसहाय्य करते. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील पूर्व ‘पीसीएमटी’चे ४७० कर्मचारी अद्याप कार्यरत आहेत. त्यांच्यावर अन्याय होता कामा नये, अशी भूमिका आमदार लांडगे यांनी घेतली. यावर संबंधित कर्मचाऱ्यांशी संबंधित प्रश्नांबाबत दोन दिवसांत बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन व्यवस्थापनाने दिले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

– क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय