ऊसतोड कामगारांच्या संपाचा प्रश्न शरद पवारांच्या कोर्टात
बीड : उसतोड़ व वाहतूक मुकादम कामगारांच्या मजूरी, वाहतूक खर्च आणि कमिशन वाढीच्या मुद्यावरून चौदा दिवसापासून सुरु असलेल्या उसतोड़ वाहतूक मुकादम कामगारांचा संप चिघळला असून कामगार संघटना आणि साखर कारखानदार यांच्यात तीन बैठका निष्फळ ठरल्या आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणी मध्यस्थी करावी अशी गळ घालण्यात आली आहे.
गेल्या सहा वर्षातील चलन दरवाढ पाहता आमची मागणी न्याय्य आहे. शेजारी प्रत्येक राज्यात महाराष्ट्र पेक्षा अधिक दर आहेत. साखर संघाने वाढीव दरांचा प्रस्ताव ठेवावा, आम्ही सर्व संघटनांना आपसात चर्चा करून निर्णय घेऊ. संघाने सुचविल्यास पवारांसोबत बैठकीस तयार आहोत, असे उसतोडणी व वाहतूक कामगार संघटना (सिटू) चे राज्याध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी म्हटले आहे.
लवाद नको पण दरवाढ आणि सुरक्षा हवी ही भूमिका सर्व संघटनांनी मांडली आहे. याबाबतचा प्रस्ताव साखर संघाने द्यावा, अशी मागणी सिटू उसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेचे राज्यध्यक्ष डॉ. डी.एल कराड यांनी आहे. तसेच याबाबत संघ सकारत्मक असल्याची भूमिका अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी घेतली. मात्र प्रस्ताव सादर करण्याचा चेंडू संघटनाच्याच अंगनात टोलवला. त्यामुळे तीन बैठकामध्ये तोड़गा निघाला नाही. तसेच कामगारांना दरवाढ देणारा नवीन त्रिपक्षीय करार ८ दिवसात करण्यात यावे, अन्यथा जिल्हाभर आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ. दत्ता डाके, सय्यद रज्जाक, मोहन जाधव, सुदाम शिंदे, सखाराम शिंदे, बंडू राठोड, जगनाथ जाधव, आबा राठोड यांनी दिला आहे.