Monday, May 6, 2024
Homeग्रामीणउषाताई दातार : हाडाच्या शिक्षिका ते सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यातील सैनिक

उषाताई दातार : हाडाच्या शिक्षिका ते सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यातील सैनिक

पुण्यातील डाव्या पुरोगामी चळवळीतील लोकांना माहित असलेले एक नाव म्हणजे उषाताई दातार. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या व अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या पुणे येथील ज्येष्ठ कार्यकर्त्या, पुणे जिल्हा घरकामगार संघटना (सीटू) च्या एक संस्थापक पदाधिकारी कॉम्रेड उषाताई दातार.  वयाची ८७ वर्षे पूर्ण केल्यानंतर अल्पशा आजाराने कालच पहाटे वृद्धापकाळाने त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या मागे त्यांच्या तीन मुली, वृंदा देव, रेवती भागवत, स्वाती प्रियोळकर, जावई व नातवंडे, पणती, भाऊ, वहिनी व त्यांचा परिवार, अनेक भाचे, भाच्या असा परिवार आहे. त्या आपल्यातून गेल्या आणि गेल्या काही वर्षातील त्यांचे कार्य झर्रकन डोळ्यासमोरून गेले, आणि काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. त्यांचे व्यक्तिमत्व म्हणजे लोण्याहून मऊ पण पोलादाहून खंबीर. त्यांची सामाजिक बांधिलकी, अन्यायाविरूद्ध लढण्याची चिकाटी आणि शांतपणे कोणत्याही प्रसंगातून मार्ग काढण्याची हातोटी. 

त्यांचा जन्म ११ एप्रिल १९३३ रोजी विदर्भातील अकोला येथे झाला. शिक्षण पदवीपर्यंत म्हणजे त्या काळातील मुलींच्या मानाने खूप चांगले झाले. लग्न जवळच्याच नात्यात झाले. त्यामुळे त्यांच्यासाठी सासर, माहेर असे काही वेगळे नव्हतेच. आयुष्यातला बराच काळ त्यांनी मुंबईमध्ये पती, तीन मुलींचा जन्म, संसार आणि शिक्षिका म्हणून खाजगी शाळेत केलेली नोकरी यात सुखाने व्यतित केला. एक सर्वसाधारण मध्यमवर्गीय जीवन पण घरची पार्श्वभूमी सर्वसाधारण नक्कीच नव्हती. विशेषतः धाकट्या बहिणीचे, कालिंदीचे लग्न सुप्रसिद्ध नाटककार व विचारवंत गो, पु देशपांडे यांच्याशी होणे, कालिंदीचे डाव्या आणि महिला चळवळीत येणे, त्यांचे मोठे मामा व दुसरीकडून दीर श्री बी एन दातार यांचे एका मोठ्या प्रशासकीय पदावरून कार्य व सामाजिक अभ्यासातील योगदान यामुळे त्यांची घराबाहेरच्या एका मोठ्या जगाशी ओळख होतीच. पण सांताक्रूझ, मुंबई येथील रोझ मॅनॉर गार्डन या शाळेतून काहिशा लवकर निवृत्त होऊन पुण्याला रहायला आल्यावर त्यांच्या जीवनामध्ये एक खूप मोठा बदल घडून आला.

संवेदनशील तर त्या होत्याच पण कोथरूडमध्ये नवीनच निर्माण होणाऱ्या वस्त्यांमधले भयाण वास्तव आणि रोज घडणारे बलात्कार, हुंडाबळी, गुंडगिरी यामुळे त्या अस्वस्थ झाल्या. आपण खूप वर्षे वैयक्तिक जीवन जगलो आता उरलेल्या आयुष्यात सामाजिक समता, अन्यायाविरुद्ध लढा यासाठी जमेल तितके योगदान दिले पाहिजे याची त्यांना आतून जाणीव झाली, त्यांना कार्यकर्त्यांची साथ देखील मिळाली आणि त्यांनी अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि नंतर त्यांच्या महत्वाच्या योगदानातून उभी राहिलेली पुणे जिल्हा घरकामगार संघटना या कामात झोकून दिले. त्या दरम्यान बाल हक्क कृती समिती, आर्क, स्त्री मुक्ती आंदोलन संपर्क समिती, दारुमुक्ती आंदोलन कृती समिती यांच्या कामातही फार मोठे योगदान दिले.  कोथरूडमध्ये उभे राहिलेले जनवादी महिला संघटनेचे कौटुंबिक सल्ला केंद्र हे त्यांच्याच प्रयत्नाचे फळ होते असे म्हणायला काही हरकत नाही. एका नातवाचा दुर्धर आजार, पतीचे दीर्घ काळ परावलंबित्व व या दोघांचे मृत्यू या गोष्टींमुळे त्या दुःखी झाल्या पण त्या आपल्या सामाजिक कर्तव्यापासून कधी ढळल्या नाहीत. गेल्या काही वर्षात त्या वय आणि शारिरिक व्याधी यामुळे फारशा बाहेर जाऊ शकल्या नाहीत पण कार्यकर्त्यांना सतत मार्गदर्शन करत राहिल्या. या काळात गेली १५ वर्षे त्यांना शांतम्मा या त्यांच्या सोबतिणीची खूप खंबीर साथ मिळाली. त्या सामाजिक कामात जमेल तसा आर्थिक सहयोगही शेवटपर्यंत देत राहिल्या.   

पुण्यातील तसेच पूर्ण महाराष्ट्रातील पुरोगामी, डाव्या चळवळीतील आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सामील आहोत. कॉम्रेड उषाताई दातार यांना भावपूर्ण आदरांजली, अखेरचा लाल सलाम. विनम्र क्रांतिकारी अभिवादन.

– शुभा शमीम, महासचिव 

अंगणवाडी कर्मचारी संघटना (सिटू), महाराष्ट्र

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय