पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – प्रसिद्ध उद्योगपती, टाटा समूहाचे सर्वेसर्वा पद्मविभूषण आदरणीय रतन टाटा यांचे काल रात्री उशिरा दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्यामुळे एका पर्वाचा अंत झाला आहे, असे म्हणावे लागेल. (Ratan Tata)
रतन टाटा यांचे उद्योग क्षेत्रातील योगदान हे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर तर वाखाणण्यासारखे होतेच, परंतु पिंपरी चिंचवड शहराच्या जडणघडणीमध्ये आणि पिंपरी चिंचवड शहराला ‘औद्योगिक शहर’ म्हणून मान्यता मिळण्यामध्ये सर्वात मोठे योगदान रतन टाटा यांचे आहे, हे निर्विवादपणे मान्य करावे लागेल.
पिंपरी चिंचवड मध्ये टाटा कंपनीच्या निर्मितीमुळे हजारो लघू उद्योजकांना व्यवसायाची संधी मिळाली, त्याचबरोबर शहरातीलच नव्हे तर देशभरातील कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो कामगारांना या ठिकाणी रोजगार मिळण्याची संधी त्यांच्यामुळे उपलब्ध झाली. (Ratan Tata)
रतन टाटा यांनी आपल्या उत्पन्नाच्या जवळपास 65 टक्के रक्कम ही दानधर्म करण्यासाठी वापरली. त्यांनी आपल्या उद्योगांमध्ये कामगार कल्याणच्या अनेक योजना मानवतेच्या दृष्टिकोनातून अमलात आणल्या. एक मानवतावादी भांडवलदार म्हणून त्यांची नक्कीच वेगळी ओळख संपूर्ण जगामध्ये आहे.
ज्या ज्या वेळेला देश संकटामध्ये आला त्या त्या वेळी त्यांनी सढळ हाताने आणि उदार अंतःकरणाने हजारो कोटी रुपयांची आर्थिक मदत अदा केली. मग ते किल्लारी भूकंप असू द्या, डोंगराच्या दरडी कोसळून निस्तनाबूत झालेल्या गावांचे पुनर्वसन असू द्या, दहशतवादी हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या व जखमी झालेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबीयांना सर्व प्रकारची मदत करणे असो, कोविड सारख्या महामारीच्या काळात हजारो कोटी रुपयांची मदत त्यांनी केलेली होती हे विसरता येणार नाही.
जगभरामध्ये शंभर पेक्षा अधिक उद्योगांमध्ये त्यांची मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होती. अगदी घरातील मिठापासून ते आकाशात उडणाऱ्या विमानांपर्यंत सर्व उद्योगांमध्ये त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे. रतन टाटा यांचे जगातून जाणे हे देशासाठी अतिशय मोठे नुकसान असून, हे नुकसान कधीही भरून निघणार नाही. (Ratan Tata)
पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी त्यांनी दिलेले योगदान हे अनमोल आणि अविस्मरणीय आहे. दिवंगत रतन टाटा यांना नागरी हक्क सुरक्षा समितीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली..
मानव कांबळे, अध्यक्ष नागरिक सुरक्षा समिती