Monday, May 6, 2024
HomeNewsराहुल गांधींची भारत जोडो यात्रा 14 दिवस महाराष्ट्रातून जाणार !

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा 14 दिवस महाराष्ट्रातून जाणार !

मुंबई : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली भारत जोडो पदयात्रा महाराष्ट्रात नियोजित कार्यक्रमानुसार १७ दिवसांऐवजी आता १४ दिवसांची होणार आहे. या कालावधीत यात्रेचा जिथे मुक्काम असेल तिथे विविध सामाजिक गटांशी राहुल गांधी यांची संवाद साधणार आहे.
नांदेड व शेगाव येथे त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. या दोन्ही सभांमधून काँग्रेसने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचे ठरविले आहे.

भाजपच्या हिंदूत्ववादी राजकारणाला आव्हान देत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ७ सप्टेंबरपासून कन्याकुमारीपासून भारत जोडो पदयात्रेला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात ७ नोव्हेंबरला यात्रेचे आगमन होत आहे. तेलंगनातून नांदेड जिल्ह्यातील देगलुर येथून यात्रेचा महाराष्ट्रात प्रवेश होईल. भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी यांचा महाराष्ट्रात १७ दिवसांचा दौऱ्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु त्यात आता थोडा बदल करण्यात आला असून राज्यात १४ दिवस पदयात्रा चालेल, असे सांगण्यात आले.

राज्यात ही पदयात्रा प्रामुख्याने मराठवाडय़ातील दोन व विदर्भातील तीन जिल्ह्यांमध्ये फिरणार आहे. राज्यातील पदयात्रा यशस्वी करण्यासाठी काँग्रेसचे झाडून सारे नेते, प्रमुख पदाधिकारी सध्या तयारीला लागले आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, भारत जोडो पदयात्रेचे महाराष्ट्राचे समन्वयक बाळासाहेब थोरात, माजी मंत्री अ‍ॅड यशोमती ठाकूर, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी आदी नेत्यांनी महाराष्ट्रात पदयात्रेचे जेथून आगमन होणार आहे, त्या मार्गाची पाहणी केली. राहुल गांधी यांचा राज्यातील दौरा यशस्वी करण्याची जोरदार तयारी सुरू आहे. राहुल गांधी यांची पहिली जाहीर सभा नांदेड येथे होणार आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय