मुंबई, दि. २७ : महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने जवळपास ६० कोटींच्या बनावट खरेदी व विक्री देयकांच्या आधारे बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊन व तसेच टॅक्स क्रेडिट पास ऑन करून शासनाची १०.४२ कोटींच्या कर महसुलाची हानी करणाऱ्या पुण्यातील एका व्यापाऱ्यास अटक केली आहे. वस्तू व सेवा कर विभागाकडे उपलब्ध बीफा (BIFA), प्राईम, ई वे बिल पोर्टल अशा विविध विश्लेषण प्रणालीच्या आधारे या करचोरीचा शोध घेण्यात आला, अशी माहिती अपर राज्य कर आयुक्त कार्यालय, पुणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
मे. अयान ट्रेडर्स या व्यापाऱ्याच्या विरोधात शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून करचोरी विरोधी विशेष अन्वेषण कारवाई सुरु करण्यात आली होती. वस्तू व सेवाकर विभागाकडून बोगस देयका संदर्भात सुरु असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत इरफान इस्माईल शेख यांना २५ मे २०२२ रोजी अटक करण्यात आली आहे.
मुख्य न्याय दंडाधिकारी, पुणे यांनी सदर व्यक्तीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही धडक कारवाई पुण्याच्या राज्यकर सहआयुक्त रेश्मा घाणेकर व राज्यकर उपायुक्त सुधीर चेके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक राज्यकर आयुक्त (अन्वेषण) चंदर कांबळे, प्रणाली आवटी पाटील, बाबासाहेब जुंबड, ऋषिकेश अहिवळे व अन्वेषण विभागातील राज्यकर निरीक्षक यांनी राबवली.
संपूर्ण कारवाईदरम्यान पुणे क्षेत्राचे अप्पर राज्यकर आयुक्त धनंजय आखाडे, यांचे मार्गदर्शन मिळाले.
सर्वसमावेशक नेटवर्क विश्लेषण साधनांचा वापर करून आणि इतर विभागांशी समन्वय साधून महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभाग कर चुकवेगिरी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा कसून शोध घेत आहे. या मोहिमेद्वारे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाद्वारे या आर्थिक वर्षात आतापर्यंत १५ अटक कारवाया करण्यात आल्या आहेत व याद्वारे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने करचोरी करणाऱ्या व्यापाऱ्यांना एक प्रकारे इशारा दिलेला आहे.