Friday, November 22, 2024
Homeजिल्हापुणे : महिला डॉक्टरच्या बेडरूम आणि बाथरूमच्या बल्बमध्ये आढळले छुपे कॅमेरे, अज्ञाताविरोधात...

पुणे : महिला डॉक्टरच्या बेडरूम आणि बाथरूमच्या बल्बमध्ये आढळले छुपे कॅमेरे, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

पुणे : कॅम्पसमधील स्टाफ क्वॉर्टरमध्ये राहणाऱ्या एका महिला डॉक्टरच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिलेने सायंकाळी घरी परतल्यानंतर बाथरूममधील ‘स्वीच ऑन’ केल्यानंतरही बल्ब लागला नाही. त्यानंतर छुप्या कॅमेऱ्यांचा प्रकार समोर आला. हे छुपे कॅमेरे बल्बमध्ये लावले होते.

या प्रकरणी महिला डॉक्टरने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सहा जुलैला सकाळी पावणेनऊ ते सायंकाळी सात वाजून २० मिनिटे या कालावधीत घडला. फिर्यादी सकाळी ड्युटीला गेल्यानंतर अज्ञाताने बनावट चावीच्या सहाय्याने त्यांच्या घराचे कुलूप उघडून घरात प्रवेश केला. त्यानंतर संबंधिताने छुपे कॅमेरे असलेले बल्ब घरात बसवल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या भारती विद्यापीठ हॉस्पिटलमध्ये नोकरीस असून, विद्यापीठाच्या आवारातील क्वॉर्टरमध्येच राहतात. त्या सहा जुलैला सकाळी पावणेनऊच्या सुमारास घरातून बाहेर पडल्या. त्यानंतर त्या सायंकाळी सव्वासातच्या सुमारास घरी परतल्या. त्यानंतर फ्रेश होण्यासाठी त्या बाथरूममध्ये गेल्या असता, त्यांनी बल्ब लावण्यासाठी ‘स्वीच ऑन’ केला. मात्र, बल्ब लागला नाही.

दरम्यान, तो बल्ब काहीसा वेगळा वाटल्याने त्यांना शंका आली. त्यांनी इलेक्ट्रिशियनला बोलावून बल्ब दाखवला. तेव्हा इलेक्ट्रिशियनने त्या बल्बमध्ये छुपा कॅमेरा असल्याचे सांगितले . त्यानंतर फिर्यादीने घरातील अन्य दिव्यांची पाहणी केली. त्यात बेडरूममध्येही असाच बल्ब लावल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्यासह महिला पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील महिला निरीक्षक या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

संबंधित लेख

लोकप्रिय