कट्टर समर्थक व्हायचेच असेल तर ते शेतकरी लढ्याचे व्हा – डॉ.अजित नवले
घोडेगाव : अखिल भारतीय किसान सभेच्या पुणे जिल्हा समितीचे नववे जिल्हा अधिवेशन नुकतेच घोडेगाव येथे पार पडले. या अधिवेशनाची सुरुवात जिल्हा अध्यक्ष ऍड.नाथा शिंगाडे यांच्या हस्ते संघटनेच्या ध्वजारोहण करून झाली. यानंतर, मान्यवर यांनी शहीद स्मारकाला अभिवादन करून सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
या अधिवेशनाच्या उदघाटनपर भाषणात किसान सभेचे राज्य अध्यक्ष कॉ.किसन गुजर यांनी किसान सभेच्या राज्यभर सुरू असलेल्या शेतकरी संघर्षची माहिती देतानाच पुढील काळात, पुणे जिल्ह्यात आपण सर्वांनी मिळून मजबूत संघटन निर्माण करूयात असा आशावाद व्यक्त केला.
या अधिवेशनाला जेष्ठ कामगार नेते कॉ.अजित अभ्यंकर, माकपा पुणे जिल्हा सचिव गणेश दराडे, जनवादी महिला संघटनेच्या हिराबाई घोंगे, अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या राज्यस्तरीय नेत्या,शुभा शमीम, एस.एफ.आय. संघटनेचे राज्य पदाधिकारी विलास साबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रभाकर बांगर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
यावेळी किसान सभेचे जिल्हा सचिव डॉ.अमोल वाघमारे यांनी मागील सहा वर्षांच्या किसान सभेच्या कार्याचा अहवाल मांडला. उपस्थित प्रतिनिधी यांनी या अहवालावर सविस्तर चर्चा करून हा अहवाल एकमताने मान्य केला. उल्लेखनीय कामाबद्दल घोडेगाव पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने, पत्रकार सीताराम काळे व विद्यार्थी वैभव वाळुंज यांना या अधिवेशनात विशेष सन्मानित करण्यात आले.
अधिवेशनाच्या समारोपात किसान सभेचे राज्य सरचिटणीस व शेतकरी नेते डॉ.अजित नवले यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सडकून टीका करत भावनिक राजकारणापेक्षा मूलभूत प्रश्नावर काम करणाऱ्या संघटनांना व पक्षांना पाठबळ द्या असेही त्यांनी यावेळी नमूद केले. या अधिवेशनाने पुढील तीन वर्षासाठी किसान सभेची नवनिर्वाचित जिल्हा समितीची निवड केली.
जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून डॉ.अमोल वाघमारे यांची निवड करण्यात आली ,तर उपाध्यक्ष म्हणून ऍड.नाथा शिंगाडे, महेंद्र थोरात, राजू घोडे, दत्तोबा बर्डे यांची निवड करण्यात आली. तर सचिव म्हणून विश्वनाथ निगळे यांची तर सहसचिव म्हणून अशोक पेकारी, लक्ष्मण जोशी, अमोद गरुड संतोष कांबळे यांची व खजिनदार म्हणून विकास भाईक यांची निवड करण्यात आली.
जिल्हा समितीचे सदस्य म्हणून रामदास लोहकरे, नंदा मोरमारे, माधुरी कोरडे, मंगेश मांडवे, कृष्णा वडेकर, किसनराव ठाकूर, बाळासाहेब शिंदे, संदीप भांगरे यांची निवड करण्यात आली.
या अधिवेशनात हिरडा खरेदी व रास्त भावाचा प्रश्न, दुधाला एफ.आर.पी.कायदा लागू करा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, वनहक्क-पेसा-मनरेगा कायद्याची अंमलबजावणी, निराधार पेन्शन वाढ करा, आदिवासी ठाकर, कातकरी समाजाचे मूलभूत प्रश्न सोडवा या प्रश्नाचे ठराव मान्य करून या प्रश्नांवर, पुढील काळात व्यापक लढा उभा करण्याचा निर्णय झाला. या अधिवेशनाला पुणे जिल्ह्यातील पाच तालुक्यातील सुमारे पाचशे पेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.
या अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी जनवादी महिला संघटना आंबेगाव तालुका समिती व स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया पुणे जिल्हा या संघटनानी विशेष सहकार्य केले.