Thursday, May 9, 2024
Homeराज्यमोठी बातमी : दहावी, बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, ‘या’ महिन्यात होणार...

मोठी बातमी : दहावी, बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, ‘या’ महिन्यात होणार परिक्षा

मुंबई : दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांसंदर्भात एक मोठी अपडेट समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षम मंडळाच्या वतीने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मंडळाच्या वतीने ९ विभागीय मंडळांच्यावतीने लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जातात.

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, लातूर आणि कोकण या ९ मंडळातील लाखो विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षात इयत्ता बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत होणार आहे. तर इयत्ता दहावीच्या परीक्षा १ मार्चपासून सुरू होतील आणि त्या २२ मार्च पर्यंत पूर्ण होतील. परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना आता अभ्यासाचे नियोजन करता येणार आहे. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी म्हटले आहे की, मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर दहावी-बारावीच्या परीक्षेचे संभाव्य सविस्तर वेळापत्रक देण्यात आले आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्याच्या हेतूने लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ते ग्राह्य धरु नये हे वेळापत्रक जाहीर करताना मंडळाने आवाहन केले आहे की, मंडळाच्या वेबसाईटवरील संभाव्य वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे.

तसेच, परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार आहे. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी, असेही म्हटले आहे.

वेळापत्रकाबाबत काही हरकती-सूचना असल्यास त्या १५ दिवसांत विभागीय मंडळ, राज्य मंडळाकडे लेखी स्वरुपात सादर करता येणार आहे. त्यानंतर आलेल्या सूचनांवर विचार केला जाणार नाही, असे ओक यांनी सांगितले आहे.

अधिक माहितीसाठी मंडळाची वेबसाईट :
https://www.mahahsscboard.in/

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय