Sunday, May 19, 2024
Homeविशेष लेखप्रजाहितदक्ष राजर्षी शाहू - डॉ. सुभाष देसाई

प्रजाहितदक्ष राजर्षी शाहू – डॉ. सुभाष देसाई

           “सत्ता ही जनहितार्थ राबवायची असते” हा छत्रपती शाहूंच्या जीवन संदेशाचा विसर आमच्या सर्वच पक्षाच्या राज्यकर्त्यांना पडल्यामुळे रयत नागवली जात आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य पासून ते आमदार-खासदार मंत्र्यांपर्यंत , त्यापासून कमिशनर पर्यंत कोणीही दारिद्र्यरेषेखाली राहिला नाही. हा त्यांचा आर्थिक विकास शोषणावर आधारित आहे. तरीपण छत्रपती शाहूंचे नाव घ्यायला आम्हाला लाज वाटत नाही.

राजा म्हणून त्यांनी  शंभर दीडशे वर्षापूर्वी दाखवलेले धैर्य ,धडाडी, तडफ असामान्य होती. त्यांच्या अंतकरणात जनतेबद्दल जिव्हाळा होता आपली रयत सुजान व्हावी, सुखी व्हावी, जातीपातीच्या कारणांनी निर्माण झालेली असमानता नाहीशी व्हावी. समाज गतिमान व्हावा. प्रगत व्हावा म्हणून त्यांनी जीवनभर प्रयत्न केले. असा महाराजा होणार नाही. छत्रपती शिवरायांचे, ते एकमेव राजकीय सामाजिक आणि आताच्या काळातील शैक्षणिक क्रांतीचे वारस आहेत.

 ते गादीवर येण्यापूर्वीचा कोल्हापूर संस्थानाचा काळ मोठा बिकट होता १८२१ ला एका छत्रपती चा खून झाला. दुसरे यात्रेत वारले. ४ थे छत्रपती  यांचा मृत्यू झाला. चौथे फ्लोरेन्स ला परदेशात वारले .पाचवे अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये त्यावेळचा खाजगी कारभारी महादेव वासुदेव बर्वे यांनी ब्रिटिशा करवी-मारवले. 

आणि यानंतर १८४८ ते १९२२ छत्रपती शाहू महाराजांचा कालावधी आहे त्यांनी २८ वर्षे राज्य केले. २ एप्रिल १८९४ त्यांनी राज्यकारभाराची सूत्रे घेतली. त्यावेळी खाजगी कारभारी महादेव वासुदेव बर्वे  यांनी साठ ब्राह्मण अधिकारी महसूल पासून विविध क्षेत्रांमध्ये नेमले होते. त्यात ४६ ब्राह्मण खाजगीत त्यांनी नेमलेले होते. संस्थानात त्यावेळेला २६ हजार ब्राह्मण लोकसंख्या होती.

या अनेक वर्षांच्या अंधारा नंतर छत्रपती शाहूंचा सूर्योदय १८९४ ला झाला ..त्यांनी शाळा उत्सव रुग्णालय कचेऱ्या राजवाडा पाण्याचे तलाव राजाची पंगत ही सर्व हरिजन गिरिजना खुली केली. कोल्हापूर नाशिक, पुणे, अहमदनगर येथे विद्यार्थी वस्तीगृह बांधली. इतकंच नाही तर भारतभर ते संस्थानिकांची नेते होते. तर दक्षिणेकडे ब्राह्मणेतर चळवळीचे मार्गदर्शक होते आणि तसा पत्रव्यवहार उपलब्ध आहे. त्यांनी तलाठी नेमला नगरपालिकेच्या स्थायी समितीचा अध्यक्ष अस्पृश्य नेमला ,वकील अस्पृश्य महार टपावाला हे दुर्मिळ दृश्य महाराष्ट्राशिवाय इतर कुठेही दिसत नव्हते. हे धैर्य या राजाने दाखवले. ५० % नोकऱ्या मागासवर्गीय जातींना  किंवा मोफत सक्तीचे शिक्षण राबवणे असो ते त्यांनीच करावे.

‌ एकदा त्यांनी आपल्या संस्थानात एक जैन तरुण पदवीधर झाला म्हणून त्याला अधिकार पदावर नेमले त्यावेळेला समर्थ व केसरी सारख्या वृत्तपत्रांनी गदारोळ करावा हे गृहीत धरले तरी कोल्हापूरचे न्यायाधीश गोखले यांनी ही नेमणूक रद्द केली हे आश्चर्य होते. त्यावेळेला छत्रपती  बजावले “आता काळ बदललेला आहे बदललेल्या काळाप्रमाणे पावले टाका नाहीतर मोडीत निघाल”.

‌ यानंतर छत्रपती शाहूंनी छत्रपती शाहू स्पिनिंग अँड विव्हिंग मॅन्युफॅक्चरिंग कंपनी स्थापन करून १९०६ ला ही मिल चालू केली ती कित्येक वर्षे चांगली चालू होती. त्यामुळे व्यापार वाढला पण  ती बंद पडली पुढे एका राजकीय पुढार्‍याने टेक्‍स्टाईल हब करतो अशा पोकळ घोषणा केल्या.

‌छत्रपती शाहू महाराजांचे संस्थानात एकदा दुष्काळ पडला आणि तसा पुन्हा पडू नये म्हणून त्यांनी कोल्हापूरपासून तीस मैलावर एक महाराणी लक्ष्मीबाई तलाव बांधला त्याचं काम पंधरा वर्षे चालू होतं. ते पुढे छत्रपती राजाराम महाराजांनी पूर्ण केलं आणि तिथून हायड्रोइलेक्ट्रिक प्रोजेक्ट सुरू केला. कोल्हापूर जिल्ह्यातील हरितक्रांती आणि सुख-समृद्धी या सगळ्यामध्ये छत्रपती शाहूंनी बांधलेलं हे धरण आहे.

‌धर्म क्षेत्रांमध्ये त्यांनी बजावलं की शंकराचार्य हा ब्राह्मण समाजाचा गुरु आहे तो मराठ्यांच्या गुरु नाही म्हणून त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात पाटगावला मोनी विद्यापीठ मठामध्ये क्षात्र जगतगुरु पिठाची स्थापना केली. हा धार्मिक प्रशासक होता अर्थात ही पीठ वंशपरंपरागत नसून मराठा समाजातील सुशिक्षित तरुणाची नेमणूक त्यावर व्हावी असा संकेत होता पण कालांतराने मराठ्यांचे नाहीतर ब्राह्मणांचे मठ असो यांनी समाजाच्या उत्कर्षासाठी कोणतेही उपक्रम  राबवले नाहीत त्यामुळे आता यांची गरज संपलेली आहे. यांचे राष्ट्रीयीकरण व्हायला हवे. त्याला असणाऱ्या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना देण्याची गरज निर्माण झाली आहे .

‌छत्रपती शाहू महाराजांनी मिरजकर संस्थांनच्या मांडलिकना सुद्धा धडा शिकवला. मिरजेच्या अधिपती बाळासाहेबांनी एक कायदा केला की ते ज्या रस्त्याने जातील त्या रस्त्याने ब्राह्मणेतरांनी यायचं नाही गाडी चालवायची नाही. छत्रपती शाहू महाराजांच्या कानावर ही गोष्ट आल्यानंतर त्यानी यात बदल घडवायचे ठरवले शेवटी ते छत्रपती होते. ते मिरजेला गेले एका बैलगाडी मध्ये बसले घोंगडे पांघरून आणि गाडीवानाला आपला एक अधिकारी बसवला. समोरून मिरजकरांची गाडी आली त्यावेळेस त्यांना भयंकर राग आला. त्यांनी आपल्या गाडीवाणाला सांगितलं तिथे बैलगाडीच्या शेतकऱ्याला चाबकाने  फोडा. ज्यावेळेला तो येऊन शिव्या द्यायला लागला आणि चाबूक उगारला त्यावेळी शाहू महाराजांनी स्वतःच्या अंगावरची घोंगडी काढली आणि जोरात आरोळी ठोकली काय बाळासाहेब काय चाललंय?  याबरोबर बाळासाहेब उतरले छत्रपतीना वंदन केले आणि नरमले. असे कायदे बदलायला लावण्याची धमक त्यांच्यामध्ये होती.

‌छत्रपती शाहू महाराजांनी करवीर संस्थानचे कलानगरी मध्ये रूपांतर केलं रंगभूमीवरचे अण्णासाहेब किर्लोस्कर, कल्याणकर, कोल्हटकर, जोशी, भोसले, शांताराम, बाबुराव पेंटर, बाबुराव पेंढारकर या सगळ्यांना त्यांनी राजाश्रय दिला. कला वाढवली चित्रकार क्षेत्रांमध्ये आबालाल रहमान, माधवराव बागल, आनंदराव पेंटर यांनाही शास्त्रशुद्ध शिक्षण दिले. गायना मध्ये साहेब जान सकवारबाई आनंद मेस्त्री, तबलजी दादा लाड, बळवंतराव रुकडीकर, गोविंदराव टेंबे, शाहीर हैदर

असेच पैलवानांना अनेक तालमी काढून त्यांनी घडवले. कुस्ती मैदान बांधले. ते उत्तम कुस्तीगीर होते. नाट्यग्रह पॅलेस थिएटर बांधलं. कागलकर पावर हाउस बांधलं.

 छत्रपती शाहू महाराज सोनतळीला राहत असताना एकदा ते घोंगडी पांघरून बसलेले होते ते पाहून एक जहागीरदार म्हणाले, हे छत्रपतीना काही शोभत नाही. त्यावर छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना सुनावले आमचे थोरले शतकर्ते महाराज ज्या वेळेला या गडावरून त्या गडावर जात होते. रानोमाळ भटकत होते. त्यावेळी काय कोण गाद्या गिरदया घेऊन त्यांच्या पाठोपाठ पळत होतं? एखाद्या खाटल्यावर घोंगडे टाकलं की झालं त्यांचे सिंहासन आणि आम्ही त्यांच्या पुढे कोण लागून गेलो होतो. पण रयते सारखे राहायला शिकले पाहिजे. या राजाचा संदेश रयतेवरचं प्रेम दाखवतो आणि त्याच प्रमाणे साधी राहणी उच्च विचारसरणी काय असते, याचा नमुनाही दर्शवतो. त्यांनी आदर्श घालून दिला.

आज सार्‍या देशभर महाराष्ट्राची पुरोगामी म्हणून प्रतिमा उंचावलेली आहे. त्याला कारण महात्मा फुलेंच्या नंतर छत्रपती शाहू महाराजांनी तो सामाजिक क्रांतीचा ध्वज उंच उंच नेला. अशा ह्या सामाजिक क्रांतीच्या अग्रदूताला आमचं नम्रतापूर्वक वंदन!

डॉ. सुभाष देसाई 

ज्येष्ठ विचारवंत, कोल्हापूर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय