पिंपरी चिंचवड : महापालिकेची मिळकत हस्तांतर फी कमी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲड. सचिन गोडांबे यांनी महापालिका आयुक्त व सहाय्यक आयुक्त (कर आकारणी) यांच्याकडे केली आहे.
याबाबत त्यांनी पाठविलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेने दि. 01 एप्रिल 22 पासून मिळकत हस्तांतर फी खूप जास्त वाढविली आहे. खरेदी, विक्री, हक्कसोडपत्र, वाटणीपत्र इ. विविध मार्गाने मिळकती हस्तांतर होत असतात ज्यावर पूर्वी खूपच कमी असणारी फी दि. 01 एप्रिल 22 पासून बाजारमुल्याच्या 0.5 टक्के इतकी प्रचंड जास्त वाढविली आहे जी जनतेची लूट आहे.
आधीच मिळकत खरेदी करताना राज्य सरकारला 7 टक्के स्टॅम्प ड्युटी अधिक 1 टक्के नोंदणी फी द्यावी लागते. शिवाय पुनःविक्री होणाऱ्या मिळकतीवर ही पुन्हा 7 टक्के स्टॅम्प ड्युटी व 1 टक्के नोंदणी फी द्यावी लागत आहे, जी मोठी लूट आहे. त्यात भर म्हणून पिंपरी चिंचवड कर आकारणी विभागाने 01 एप्रिल 22 पासून हस्तांतर होणाऱ्या मिळकती वर 0.5 टक्के इतकी जास्त फी ठेवली आहे. उदा. एखादी मिळकत 50 लाखाला खरेदी झाली असेल तर त्याच्या 0.5 टक्के म्हणजेच 25 हजार रुपये पालिका आकारणार आहे जी जनतेची मोठी लूट आहे. दरवर्षी पालिकेला कोट्यवधी रुपये मिळकत करातून मिळत असतातच त्यामुळे पालिका आयुक्त व सहाय्यक आयुक्त (कर आकारणी) यांनी ही जुलमी हस्तांतर फी वाढ तातडीने मागे घेण्यात यावी व जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी गोडांबे यांनी आयुक्तांकडे केली आहे.