Friday, November 22, 2024
Homeजिल्हापिंपरी चिंचवड : उद्यानातील झाडे पाण्याविना तर घरकुल वसाहतीमध्ये गटार गंगा ;...

पिंपरी चिंचवड : उद्यानातील झाडे पाण्याविना तर घरकुल वसाहतीमध्ये गटार गंगा ; प्रशासनाचे दुर्लक्ष

पिंपरी चिंचवड : आशिया खंडातील सुप्रसिद्ध अशा  चिखलीतील घरकुल वसाहतीमध्ये गेले तीन दिवस गटारे रस्त्यावर ओसंडून वाहत आहेत. श्री गुरुकृपा हौसिंग सोसायटी आणि लगतच्या परिसरात चेंबर जाम झाल्यामुळे दुर्गंधीयुक्त पाणी आणि मैला सर्वत्र पसरलेला आहे.

येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते कॉ. किसन शेवते यांनी सांगितले की, आम्ही सारथी हेल्पलाईनला वारंवार तक्रार करूनही आरोग्य विभाग लक्ष देत नाही. सतत तुंबणाऱ्या गटारामुळे प्रत्येक सोसायटीला असे वाटते की आमच्यामुळे लाईन तुंबली आहे. आरोग्य विभागाने नकाशा पाहिल्यास मूळ कारण समजू शकेल.

जनवादी महिला संघटनेच्या कॉ. रंजिता लाटकर म्हणाल्या की, या संपूर्ण दुर्गंधीमुळे मच्छर वाढले आहेत. सुमारे १८ हजार लोकसंख्या असलेल्या या वसाहतीकडे आता लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत. नव्या प्रभाग रचनेत हा परिसर वेगळा प्रभागात समाविष्ट होण्याची शक्यता असल्यामुळे इथे दुर्लक्ष होत आहे.

गेल्या वर्षी घरकुल वसाहत कोरोनामुळे अतिसूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र होते. याचा उल्लेख करून कॉ. निर्मला येवले आणि सुषमा इंगोले म्हणाल्या की, सोसायटीच्या बाहेर असलेले रस्ते स्वछ केले जात नाहीत. अंतर्गत रस्त्यावर डांबर नाही, खडी, मुरूम पसरला आहे. येथील नागरिक आरोग्य आणि उद्यान विभागावर संतापलेले आहेत.

घरकुलमध्ये चार उद्याने आहेत. संविधान चौक, वंदेमातरम चौक, साई चौक आणि प्रवेशद्वारापाशी असलेल्या उद्यानामध्ये स्वच्छता कर्मचारी नाहीत, याबाबत कॉ. अविनाश लाटकर म्हणाले की, पाच वर्षांपूर्वी या उद्यानाची उदघाटने झाली, काही दिवस टँकरने पाणी झाडांना दिले जात होते. मात्र आता उद्यानांची दुर्दशा झाली आहे. झाडे सुकायला लागली आहेत. मनपाच्या पर्यावरण, आरोग्य, उद्यान विभागाचे घरकुल वसाहतीकडे दुर्लक्ष होत आहे.

जनतेला नागरीसुविधा पुरवा अन्यथा आंदोलनाला सामोरे जा, असा इशारा कॉ. अविनाश लाटकर यांनी दिला आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय