आंबेगाव (प्रतिनिधी) :- मनरेगा अंंतर्गत लोकांच्या हाताला काम मिळवून देण्याच्या अखिल भारतीय किसान सभेच्या प्रयत्नांना यश आले आहे.
किसान सभेने म्हटले आहे की, कमी प्रमात का होईना पण काम मिळाले आहे. पुणे जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन मनरेगा विशेष रोजगार अभियान सुरु केले त्याबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व सदस्य आणि पदाधिकारी यांचे आम्ही अभिनंदन करतो.”
या अभियानाअंतर्गत हजारो श्रमिकांनी कामाची मागणी केलेली आहे, यातूनच लोकांची कामाची गरज स्पष्टपणे प्रतिबिंबित झालेली आहे.
किसान सभा मागील ४ ते ५ वर्ष मनरेगाची अमंलबजावणी व्हावी, यासाठी पुणे जिल्ह्यात काम करत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात, शहरातून आलेल्या लोकांना व स्थानिक हि लोकांना तातडीची कामाची गरज आहे. या सर्व लोकांना तातडीने काम उपलब्ध करून देण्यासाठी संघटनेने वारंवार पाठपुरावा करूनही ही अनेक गावांत कामे सुरू झालेली नसल्याचे किसान सभेने म्हटले आहे.
परंतु सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे आंबेगाव तालुक्यातील शिनोली येथील ठाकरवस्ती, राजपूर, तळेघर, बोरघर याठिकाणी काम सुरू करण्यात यश आले आहे. यासाठी अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा सचिव अमोल वाघमारे, राजू घोडे आदीसह कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.
अनेक गावांत लोकांना कामाची गरज असूनही काम उपलब्ध झाले नाही, या मजुरांना बेरोजगार भत्ता मिळावा यासाठी संघटना प्रयत्न करणार असल्याचे किसान सभेने म्हटले आहे.