Sunday, May 19, 2024
HomeNewsPCMC:स्वयंशिस्तीने अभ्यास केल्यास भरघोस यश - डॉ.नेहा बेलसरे

PCMC:स्वयंशिस्तीने अभ्यास केल्यास भरघोस यश – डॉ.नेहा बेलसरे

‘युथ एम्पॉवरमेंट’ उपक्रमांतर्गत विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रम संपन्न.


पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: दि.५ – सकारात्मक दृष्टिकोन,वेळेचे काटेकोर नियोजन आणि स्वयंशिस्तीने अभ्यास केल्यास निश्चितच भरघोस यश प्राप्त होते,असा कानमंत्र पुणे येथील डिस्ट्रिक्ट एज्युकेशन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या प्राचार्या डॉ.नेहा बेलसरे यांनी आकुर्डी प्राधिकरणातील ग. दि.माडगूळकर नाट्यगृह येथे रविवार,दिनांक ०४ फेब्रुवारी २०२४ रोजी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना दिला. लायन्स क्लब इंटरनॅशनल (डिस्ट्रिक्ट ३२३४ डी-२) आणि पिंपरी – चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युथ एम्पॉवरमेंट’ उपक्रमांतर्गत ‘परीक्षेला सामोरे जाताना…’ या विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमात डॉ. नेहा बेलसरे बोलत होत्या. लायन्स क्लब इंटरनॅशनल (डिस्ट्रिक्ट ३२३४ डी-२) यूथ एम्पॉवरमेंट  चेअरपर्सन ला प्रदीप कुलकर्णी,माजी प्रांतपाल ओमप्रकाश पेठे,ऍडिशनल डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन उज्ज्वला कुलकर्णी,रिजनल चेअरपर्सन धनराज मंगनानी,समन्वयक अनुजा करवडे,सुनील चेकर,अशोक मिस्त्री,फिनिक्स क्लबच्या अध्यक्ष रजनी देशपांडे,पिंपरी – चिंचवड महापालिका मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण आदी मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.


डॉ.नेहा बेलसरे पुढे म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी पुरेशी झोप,व्यायाम अथवा खेळ,चौरस आहार आणि अभ्यास यांचे वेळापत्रक तयार करावे म्हणजे परीक्षेचा ताण जाणवणार नाही.‌विविध क्षेत्रांतील अनेक मोठ्या व्यक्तींनी वेळेचे काटेकोर नियोजन केल्यामुळे ते जीवनात यशस्वी झाले.ओमप्रकाश पेठे यांनी विद्यार्थ्यांनी आपल्यातील सुप्त क्षमतेचा पुरेपूर वापर करावा,असा सल्ला दिला.निळकंठ पोमण यांनी समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना साहाय्य करण्यासाठी पिंपरी – चिंचवड महानगरपालिका कटिबद्ध आहे, अशी ग्वाही दिली. प्रदीप कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात जिंकणे म्हणजे कायम प्रथम क्रमांक मिळविणे नव्हे तर शर्यतीचा प्रवास सुलभ करण्यासाठी केलेले प्रयत्नसुद्धा यशाकडे घेऊन जातात, अशा शब्दांतून ‘युथ एम्पॉवरमेंट’ उपक्रमाच्या माध्यमातून सुमारे ५००० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा मानस व्यक्त केला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते मोफत सराव प्रश्नसंचाचे प्रकाशन करण्यात आले.

‘परीक्षेला सामोरे जाताना…’ या मार्गदर्शनपर कार्यक्रमात इयत्ता दहावीच्या मराठी,इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या एस एस सी बोर्ड पाठ्यपुस्तक मंडळ सदस्यांकडून विशेष मार्गदर्शन लाभले.त्यामध्ये डॉ.सुलभा विधाते यांनी गणित आणि डॉ.जयश्री अत्रे यांनी शास्त्र विषयांवर अतिशय उपयुक्त सूचना आणि अभ्यासविषयक सुलभ क्लृप्त्या सांगत विद्यार्थ्यांशी हितगुज केले. अर्चिता मडके यांनी आपल्या निवेदनातून तज्ज्ञ मार्गदर्शक आणि विद्यार्थी यांच्यात समन्वय साधताना संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे १८ लाख विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला सामोरे जाणार असल्याची माहिती दिली.

दीपप्रज्वलन आणि सरस्वतीपूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.परिसरातील बारा शाळांमधील सुमारे ११५० विद्यार्थ्यांनी उपक्रमाचा लाभ घेतला.लायन्स क्लब इंटरनॅशनल (डिस्ट्रिक्ट ३२३४ डी-२)च्या सुमारे १९ क्लबच्या सभासदांनी उपक्रमासाठी सहकार्य केले. उज्ज्वला कुलकर्णी आणि अनुजा करवडे यांनी सूत्रसंचालन केले.राजेंद्र काळे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय