Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : महापालिकेच्या वतीने पद्मविभूषण रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण

PCMC : महापालिकेच्या वतीने पद्मविभूषण रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – संपूर्ण जगासमोर आदर्श निर्माण करणारे उद्योगविश्वातील समाजभान जपणारे दानशूर प्रेरणादायी व्यक्तिमत्व असलेले टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा पद्मविभूषण रतन टाटा यांनी देशाला अग्रेसर ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली. (PCMC)

पिंपरी चिंचवड नगरीला औद्योगिक नगरी म्हणून ओळख निर्माण करून देत असताना या शहराच्या जडणघडणीत पद्मविभूषण रतन टाटा यांचा सिंहाचा वाटा असून त्यांच्या निधनाने औद्योगिक नगरीच्या विकासाचा महामेरू हरपला आहे, अशा शब्दांत आयुक्त शेखर सिंह यांनी पद्मविभूषण रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण केली. या दु:खात पिंपरी चिंचवड उद्योगनगरी सहभागी आहे, असेदेखील ते म्हणाले.

पद्मविभूषण रतन टाटा यांचे काल बुधवार ९ ऑक्टोबर २०२४ रोजी निधन झाले. त्यांना महापालिकेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पिंपरी येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आयुक्त शेखर सिंह यांनी पद्मविभूषण रतन टाटा यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली, त्यावेळी ते बोलत होते. (PCMC)

या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता बाबासाहेब गलबले, उपआयुक्त अण्णा बोदडे, निलेश भदाणे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.

भारत देशाचा ठसा जागतिक पातळीवर उमटविण्यामध्ये रतन टाटा यांचे मोलाचे योगदान आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहराला औद्योगिक नगरी हे नाव सार्थ ठरविण्यामध्येही टाटा उद्योग समूहाचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. अनेक लघुउद्योग या शहरात सुरू होऊन बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध झाला. अनेकांचे जीवनमान उंचावण्यासाठी यामुळे मदत झाली. या समुहाची धुरा सांभाळताना त्यांनी सेवाव्रती आयुष्य जगत सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी पुढाकार घेऊन आपले जीवन व्यतीत केले.

कोविड संकटकाळात पिंपरी चिंचवड महापालिकेला त्यांनी मदत केली. परोपकारी वृत्ती, सामाजिक बांधिलकी, सचोटी, जिद्द, नैतिकता, उद्यमशीलता, संयम, साधेपणा, नम्रपणा यांचा अपूर्व संगम असलेले तसेच समाजसेवेप्रती समर्पित असलेले हे बहुआयामी अलौकिक व्यक्तिमत्व सर्व समाजासाठी आदर्श होते. यशाच्या शिखरावर असताना देखील एक उत्तम माणूस म्हणून सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे व्यक्तिमत्व तसेच उद्योगविश्वातील लखलखता तारा निखळल्याची खंत सर्व स्तरावरून व्यक्त केली जात आहे. (PCMC)

दरम्यान, पद्मविभूषण दिवंगत रतन टाटा यांच्या निधनामुळे महापालिकेच्या वतीने नियोजित असलेले आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. शिवाय महापालिका वर्धापन दिनाच्या अनुषंगाने घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा देखील रद्द करण्यात आल्या असून शासकीय दुखवटा जाहीर झाल्याने महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनावरील तसेच निगडी येथील भक्ती शक्तीच्या प्रांगणातील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात आला आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय