Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : चिखली घरकुलच्या प्रलंबित प्रश्नांना अखेर मिळाला न्याय! सीमाभिंत, ड्रेनेज, स्ट्रॉमवॉटर...

PCMC : चिखली घरकुलच्या प्रलंबित प्रश्नांना अखेर मिळाला न्याय! सीमाभिंत, ड्रेनेज, स्ट्रॉमवॉटर लाईनचे कामाचा ‘श्रीगणेशा’

आमदार महेश लांडगे यांच्या बैठकीमुळे समस्या निकालात (PCMC)

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – चिखली घरकूल येथील पायाभूत सोयी-सुविधा आणि समस्यांबाबत महानगरपालिका प्रशासन आता खडबडून जागे झाले आहे. घरकूलची सीमाभिंत, ड्रेनेज व स्ट्रॉमवॉटर लाईनचे काम सुरू झाले असून, लवकरच काम पूर्ण करण्यात येईल, असा दावा प्रशासनाने केले आहे. (PCMC)

चिखली घरकुलच्या समस्यांबाबत आमदार महेश लांडगे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीमध्ये घरकुल प्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेतली होती. त्यावेळी नागरीकांच्या समस्या तातडीने मार्गी लावाव्यात, अशी सूचना केली होती. अखेर प्रशासनाने काम सुरू केले आहे. त्यामुळे सर्वसामान्य घरकुलवासीयांना दिलासा मिळाला आहे.


पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, राज्य शासन आणि केंद्र शासनाने आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांना घर मिळावे. या उद्देशाने २००८ मध्ये ‘जेएनएनयुआरएम’ अंतर्गत चिखली से. १७/१९ नेवाळे वस्ती या ठिकाणी ६ हजार ७२० घरांची निर्मिती करण्याची योजना आणली आहे.

२०१४ मध्ये या प्रकल्पातील लाभार्थींना घरांचे वाटप करण्यात आले. मात्र, प्रकल्पाच्या ‘डिझाईन’प्रमाणे सोयी-सुविधा विकसित झालेल्या नाहीत. त्यामुळे घरकुलच्या रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.

दरम्यान, घरकुलमधील समस्यांबाबत अशोक मगर यांनी बुधवारी घरकुलच्या प्रवेशद्वारासमोर उपोषण सुरू केले होते. यानंतर आमदार महेश लांडगे यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली आणि या प्रश्नाबाबत तातडीने बैठक लावण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज आयुक्त कार्यालयात बैठक झाली होती.

महानगरपालिका प्रशासनाने ड्रेनेज लाईन नवीन टाकण्याचे काम सुरू केले आहे. सीमाभिंत बांधणी सुरू झाली आहे. तसेच, आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून भाजी मंडई सुरू करण्यात येईल. सांस्कृतिक भवन निवडणूक कार्यालयाच्या ताब्यात आहे. निवडणुकीनंतर ते घरकुलवासीयांसाठी खुले करण्यात येईल. पुढच्या वर्षी घरकुलमध्ये पावळ्यात पाणी साचणार नाही. याप्रमाणे ‘ॲक्शन प्लॅन’ करण्यात येईल. तसेच, घरकुल वासीयांच्या १० वर्षांच्या टॅक्स माफीबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात येणार आहे.

घरकुलच्या समस्येचे मूळ कारण काय?

चिखली घरकुल प्रकल्पाची निर्मिती करताना तेथील भौगोलिक स्थिती आणि भविष्यात वाढणारी लोकसंख्या आणि परिसराचा विकास याचा विचार करुन प्रकल्प उभारला नाही. त्यामुळे मुख्य रस्त्यापेक्षा सखल भागात प्रकल्प उभारला आहे. परिणामी, पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या, ड्रनेज समस्या यासह पायाभूत सोयी-सुविधा निर्माण करण्यात अनेक अडचणी आहेत.

प्रतिक्रिया

चिखली घरकूल प्रकल्पाला तांत्रिक व भौगोलिक अडचणींमुळे काही समस्या वर्षांनुवर्षे रखडलेल्या आहेत. घरकूल येथील शिष्टमंडळासोबत आयुक्त व प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली होती. त्यानुसार, प्रशासनाने कामाला सुरूवात केली. आगामी काळात घरकुलच्या समस्या कालबद्ध नियोजन करून मार्गी लावण्याबाबत पुढाकार घेणार आहे.

– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

संबंधित लेख

लोकप्रिय