पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:दि. ७- नागरिकांचा विकसित भारत संकल्प यात्रेस मिळणारा प्रतिसाद पाहून केंद्र शासनाच्या सुचनेनुसार या यात्रेच्या दुसऱ्या पर्वास पिंपरी चिंचवड शहरात सुरूवात करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहरात विकसित भारत संकल्प यात्रेच्या पहिल्या टप्प्यात सुमारे ३९ हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी विविध महत्वाकांक्षी योजनांचा लाभ या माध्यमातून घेतला असून त्यामध्ये महिलांचा समावेश अधिक होता.
आता दुसऱ्या टप्प्यात सदर वाहन यात्रा महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गंत ४२ ठिकाणी काढण्यात येणार असून या वाहनासह नागरिकांना मार्गदर्शन करणारे विविध कक्ष केंद्र शासनाच्या विविध योजनांचे लाभ देण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याद्वारे लाभ देण्यात येणाऱ्या योजनांमध्ये आधार केद्र,आत्मनिर्भर स्वनिधी योजना,आयुष्मान कार्ड,महिला व बाल- कल्याण योजना,मागासवर्गीय कल्याणकारी योजना,दिव्यांग कल्याणकारी योजना तसेच इतर कल्याणकारी योजनांचा समावेश आहे.
याव्यतिरिक्त आधार केंद्र कक्षाद्वारे नवीन आधार नोंदणी,नाव पत्त्यामध्ये दुरूस्ती,आधार लिंकींग,आयुष्मान कार्ड,आरोग्य विभागामार्फत माहिती आणि वैद्यकीय विभागातर्फे आजारांची तपासणी,तज्ञांचे मार्गदर्शन अशा विविध सुविधाही विकसित भारत संकल्प यात्रा वाहनामार्फत नागरिकांना पुरविण्यात येत आहेत.
मंगळवार दिनांक ६ फेब्रुवारी रोजी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह या ठिकाणी उपआयुक्त मिनीनाथ दंडवते,विशेष अधिकारी किरण गायकवाड,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,कार्यकारी अभियंता नितीन दळवी, आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी लक्ष्मीकांत भालेराव, प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाचे प्रभारी व्यवस्थापक उमेश बांदलकॉम्प्युटर ऑपरेटर दिलीप गुंड तसेच परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत विकसित भारत संकल्प यात्रेस सुरूवात झाली.
दुपारी चिंचवड येथील ब प्रभाग क्षेत्रीय कार्यालय येथे संकल्प यात्रा पार पडली.यावेळी उपआयुक्त मिनिनाथ दंडवते,विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,कॉम्प्युटर ऑपरेटर दिलीप गुंड उपस्थित होते.
बुधवार ७ फेब्रुवारी रोजी निगडी येथील संजय काळे मैदान या ठिकाणी पार पडलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमास माजी खासदार अमर साबळे,माजी महापौर आर. एस. कुमार, माजी उपमहापौर शैलजा मोरे,विशेष अधिकारी किरण गायकवाड,आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी लक्ष्मीकांत भालेराव,माजी नगरसदस्य माऊली थोरात,ऍड.मोरेश्वर शेडगे,सामाजिक कार्यकर्ते सरीता साने,राजेंद्र बाबर,अण्णा गदरे तसेच ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.तर मोरवाडी येथील विरंगुळा केंद्र या ठिकाणी पार पडलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेस आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी लक्ष्मीकांत भालेराव तसेच ज्य़ेष्ठ नागरिक आणि महापालिका कर्मचारी उपस्थित होते. यावेळी परिसरातील नागरिकांनी यात्रेस भेट देऊन विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेतला.
६ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२४ दरम्यान ८ प्रभागांमधील विविध ४२ ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रेचे वाहन भेट देणार आहे. प्रत्येक वॉर्डामध्ये २ ठिकाणी या वाहनासह नागरिकांना मार्गदर्शन करणारे विविध कक्ष केंद्र शासनाच्या विविध योजनांचे लाभ देण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तरी या वाहनामार्फत पुरविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ शहरवासियांनी घ्यावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.