पीसीयुच्या विद्यार्थ्यांना चित्रपट निर्मिती तंत्रज्ञान आत्मसात करण्याची संधी
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : चित्रपट क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. पूर्वी चित्रपट निर्मितीचे प्रत्यक्ष कार्यानुभव घेण्यासाठी विद्यार्थ्यांना मुंबईला जावे लागत होते. परंतु, आता प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आटपाट’ ही चित्रपट निर्मिती संस्था पुण्यात स्थापन झाली आहे. (PCMC)
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते वडगाव मावळ येथीलपिंपरी चिंचवड विद्यापीठ आणि आटपाट यांच्यातील सामंजस्य करारामुळे पीसीयुच्या विद्यार्थ्यांना चित्रपट निर्मितीचे प्रत्यक्ष काम, तंत्रज्ञान आत्मसात करण्याची संधी उपलब्ध झाली आहे, असे मत ‘आटपाट’ च्या सहसंस्थापक गार्गी कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (पीसीईटी) पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयु) आणि आटपाट चित्रपट निर्मिती संस्था यांच्या मध्ये नुकताच शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला.
पीसीयुच्या प्रभारी कुलगुरू डॉ. मणीमाला पुरी आणि गार्गी कुलकर्णी यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी मीडिया आणि कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख नरेंद्र बंडबे, सहाय्यक प्रा. पुजा डोळस, प्रा. निधी वैरागडे, प्रा. अभिषेक चौधरी आणि विद्यापीठाच्या अन्य विभागाचे प्रमुख आणि प्राध्यापक उपस्थित होते. (PCMC)
सिने क्षेत्रात राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे नाव आदराने घेतले जाते. मंजुळे यांच्या ‘आटपाट’ या चित्रपट निर्मिती संस्थेसोबत पीसीयूने सामजस्य करार केला आहे. आटपाट फिल्म कंपनीच्या सिनेमा निर्मितीच्या प्रक्रियेत पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या मीडिया आणि कम्युनिकेशन विभागाच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. तसेच आटपाटचे तज्ज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. अलिकडच्या काळात सिनेमा निर्मितीच्या क्षेत्रात नवनवीन बदल होत आहेत. यामुळे सिनेमा क्षेत्राचे शास्त्रशुध्द शिक्षण घेण्यावर भर दिला जातो. (PCMC)
पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या मीडिया आणि कम्युनिकेशन विभागातर्फे बीबीए डिजीटल फिल्ममेकींग हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. याबरोबरच जर्नालिझम आणि मीडिया स्टडीज या अभ्यासक्रमात सिनेमाक्षेत्राच्या सैद्धांतिक अभ्यासक्रमावर भर देण्यात आला आहे.
पीसीयुच्या विद्यार्थ्यांना सिनेमा नक्की कसा तयार होतो, त्यात नक्की कुठले विभाग असतात. प्रत्येक विभागाचे नक्की काम काय याची माहिती व्हावी यासाठी आटपाट या कंपनीसोबत करार केला असल्याचे कुलगुरू मणीमाला पुरी यांनी सांगितले. (PCMC)
विद्यार्थ्यांना सिनेमाचे तंत्र अवगत करता येईल. सिनेमा निर्मितीशी संबंधीत सर्व विभागाचं काम पाहता येईल. ही एक चांगली संधी असेल या सामजस्याच्या करारानुसार आटपाट पीसीयुच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशीप उपलब्ध करुन देईल.
विद्यार्थ्यांना सिनेमाचे चित्रिकरण आणि पोस्ट प्रोडक्शन नक्की कसे चालते याची तोंडओळख करुन देण्यात येईल. आटपाटचे तज्ज्ञ पिंपरी चिंचवड विद्यापीठात सेमिनार आणि वेबीनारमध्ये सहभागी होतील. तसेच फॅकल्टी डेव्हलप्मेंट प्रोग्रामसारख्या उपक्रमांमध्ये ही भाग घेतील, कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या मीडिया आणि कम्युनिकेशन विभागातर्फे बीए जर्नलिजम, मीडिया आणि कम्युनिकेशन स्टडीज, बीबीए एडव्हर्टायजिंग, इव्हेंट आणि पब्लिक रीलेशन्स, बीबीए डिजिटल फिल्ममेकींग आणि बीएस्सी एनिमेशन व्हिएफएक्स आणि मल्टीमीडिया सायन्सेस हे चार अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना या करारामुळे फायदा होणार आहे. (PCMC)
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा करार करण्यात आला.