पिंपरी चिंचवड /क्रांतीकुमार कडुलकर : ताथवडे येथील जे. एस. पी. एम. संचलित ब्लॉसम पब्लिक स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागाने ( किड्स विभाग)’ सीनियर केजी’चा पदवीप्रदान समारंभ अतिशय चैतन्यपूर्ण वातावरणात साजरा केला.मुख्याध्यापिका श्रीमती स्वाती आरू यांनी चिमुकल्यांचे कौतुक करून अहवाल वाचन केले.
सिनियर केजीचे विद्यार्थी पदवी पोशाखात व्यासपीठावर येताच उपस्थित पालक भारावून गेले. नर्सरी व ज्युनिअर केजीच्या विद्यार्थ्यांनी सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांची शालेय प्रगतीची कारकीर्द अत्यंत मनमोहक पद्धतीने नृत्याद्वारे सादर केली, तर सिनिअर केजीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांना जेव्हा पदवी प्रदान करण्यात आली तेव्हा जमलेल्या मंडळींनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले, कठोर परिश्रम, आकलन व प्रगती या फलश्रुतीचा जणू तो एक क्षण होता.
शालेय प्रगती साजरी करण्याशिवाय पदवीदान समारंभाचा उद्देश मुलांना लहान वयात शिक्षण व सर्वांगीण विकास होण्यासाठी एक मंच उपलब्ध करून देणे हा होता.
‘ब्लॉसम किड्स’ या संस्थेने शैक्षणिक, सामाजिक आणि मानसिक प्रगतीसाठी असा मंच उपलब्ध करून देऊन त्यांची या कामाप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित केली. ‘ब्लॉसम किड्सने’ विद्यार्थ्यांच्या क्षमतेप्रती अभिमान व आत्मविश्वास दाखवून त्यांना त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी निरोप दिला.शिक्षिका दिपा जाधव यांनी सूत्रसंचालन केले व शाळेच्या वतीने पूर्व प्राथमिक विभागाच्या प्रमुख नलिनी नायर यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे संस्थापक सचिव तसेच आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. संपूर्ण कार्यक्रम अविस्मरणीय व यशस्वी होण्यासाठी शैक्षणिक संकुलाचे संचालक डॉ.पी.पी विटकर, शैक्षणिक संकुलाचे सहसंचालक डॉ सुधीर भिलारे,नियोजन व विकास अधिकारी तसेच जे. एस. पी. एम. विद्यापीठाचे अध्यक्ष रवी जोशी,संस्थेचे परिसर संचालक रवी सावंत,सचिव गिरीराज सावंत, विश्वस्त ऋषिराज सावंत व जे. एस. पी. एम. शाळेच्या सहसंचालिका श्रीमती अमिता कामत यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. उपप्राचार्या श्रीमती दीपा पवार, सर्व विभागाचे पर्यवेक्षक, पर्यवेक्षिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही सहकार्य लाभले.