Sunday, May 19, 2024
HomeNewsPCMC: महापालिकेच्या वतीने थेरगाव येथील धोकादायक इमारत पाडण्याची कार्यवाही पूर्ण

PCMC: महापालिकेच्या वतीने थेरगाव येथील धोकादायक इमारत पाडण्याची कार्यवाही पूर्ण

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:दि. १४ –  मंगळवारी रात्री १०.१७ वाजता गणेशनगर,थेरगाव येथील बांधकाम सुरू असलेली तीन मजली इमारत धोकादायकरित्या एका बाजूला झुकली असल्याची वर्दी थेरगाव अग्निशमन केंद्रास मिळाली.वर्दी मिळताच कार्यकारी अभियंता सुनिल बागवाणी,आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल,अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे,उप अग्निशमन अधिकारी चंद्रशेखर घुले तसेच थेरगाव व पिंपरी अग्निशमन पथकाचे जवान घटनेवर नियंत्रण ठेवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले.

सदर इमारतीच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षिततेच्या कारणास्तव स्थलांतरित करण्यात आले.त्यानंतर अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उप आयुक्त मनोज लोणकर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन जागेची पाहणी केली. पाहणी केल्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची खातरजमा करून संबंधित अधिकारी,कर्मचाऱ्यांना इमारत पाडण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील म्हणाले,आज दुपारी महापालिकेच्या वतीने सर्व बाबींची पुर्तता केल्यानंतर धोकादायक इमारत पाडण्यात आली.सदर इमारतीचे बांधकाम सुरू होते परंतु इमारतीच्या आरसीसी डिझाइनमध्ये काही त्रुटी होत्या.योग्यरित्या बांधकाम न केल्यामुळे इमारत एका बाजूला झुकली होती.या इमारतीमुळे आजूबाजूच्या इमारतींना आणि रहिवाशांना धोका निर्माण झाला होता.

झुकलेल्या इमारतीमुळे आजूबाजूच्या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.सार्वजनिक सुरक्षा विचारात घेऊन महापालिकेच्या वतीने योग्य ती खबरदारी घेऊन इमारत पाडण्यात आली.सदर जागेवर बांधकाम करण्यासाठी ग क्षेत्रिय कार्यालयाकडून ३ नोव्हेंबर २०२२ रोजी बांधकाम चालू करण्यासाठी दाखला देण्यात आला होता. तसेच याबाबत पुढील तपास करण्यात येत असल्याची माहिती शहर अभियंता मकरंद निकम यांनी दिली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय