Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : प्रश्न सोडविण्यासाठी चिंचवड मध्ये बदल घडवायचा आहे - भाऊसाहेब भोईर

PCMC : प्रश्न सोडविण्यासाठी चिंचवड मध्ये बदल घडवायचा आहे – भाऊसाहेब भोईर

भाऊसाहेब भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न (PCMC)

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड शहरामध्ये पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, वाहतूक कोंडी, अनाधिकृत बांधकामे नियमितकरण, नदी प्रदूषण, दिवसाआढ पाणी अशा विविध समस्या आहेत. मात्र, त्याकडे कोणाचेही लक्ष नाही. (PCMC)

हे प्रश्न सोडविण्यासाठी चिंचवड मध्ये बदल घडवायचा आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषेदेच्या मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष व माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त भाऊसाहेब भोईर मित्र परिवाराच्या वतीने शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये भाऊसाहेब भोईर यांची प्रकट मुलाखत ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर यांनी घेतली.



त्यावेळी भोईर यांनी शहराला मिळालेला सांस्कृतिक चेहरा, औद्योगिक नगरीची सांस्कृतिक नगरी म्हणून झालेली ओळख या वाटचालीबद्दल मत व्यक्त केले. तसेच सुरू असलेली प्रशासकीय राजवट, पिंपरी चिंचवड शहराचा रखडलेला विकास, विकासात दिले जाणारे दुय्यम स्थान, शहरातील वाहतूक, रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्य आणि पर्यावरण यावर परखड भाष्य केले.

भाऊसाहेब भोईर म्हणाले, आजपर्यंत शहराच्या विकासाकडे येथील नेत्यांनी तितकेसे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रश्न निर्माण झालेले आहे. शहराच्या प्रश्नांना आजवरचे येथील आमदार जबाबदार आहेत.

शहराचा विकास होत असताना, लोकसंख्या वाढत असताना त्यानुसार सार्वजनिक सुविधांचे सक्षमीकरण होणे गरजेचे होते. मात्र, ते झालेले नाही. नद्यांची गटारगंगा झाली आहे. तर विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर ठेकेदारी फोफावली आहे. ठेकेदारांचे भले केले जात आहे. (PCMC)

येथील राजकारण्यांनी शहराची दोन भागात वाटणी केली आहे. ती केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी. शहराची विविध प्रश्नातून सोडवणूक करण्याबरोबरच परिसराचा सर्वांगीण विकास साधायचा आहे. वास्तविक जनतेच्या विकासासाठी प्रयत्न व्हायला हवेत. मात्र, येथील राजकारण्यांनी आजवर केवळ स्वतःचा विकास साधण्यात धन्यता मानली आहे असेही भाऊसाहेब भोईर म्हणाले.

असे झाले विविध कार्यक्रम

मराठी भाषेतील सांस्कृतिक कार्यक्रमांच्या बरोबरीने पहिल्यांदाच शहरात खान्देशी, अहिराणी, राजस्थानी, बंगाली आणि दाक्षिणात्य भाषांधले सांस्कृतिक कार्यक्रम झाले.

संतोष पाटील, हरेश शेट्टी, सुदाम परब, हर्षवर्धन भोईर, गौरी लोंढे, विश्वास जोशी, राहुल भोईर, किरण येवलेकर, संतोष रासने, हिम्मत भाटी, विशाल रामावत, रमेश गेहलोत, श्याम सुवर्णा, बंडू सावंत, राजू बंग, आसाराम कसबे, अमित मंडल, अलोक सेन गुप्ता, बि. के. चॅटर्जी, विवेक क्षीरसागर, जितेंद्र पाटील, योगेश पाटील यांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या संयोजनात सहभाग घेतला.

शनिवारी ३ ऑगस्टला चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘बाघमाऱ्या’ या खान्देशी ऐरणी या नाटकाचा प्रयोग झाला. रात्री ९ वाजता ‘एक शाम भोलेनाथ के नाम’ हा राजस्थानी भजन संध्येचा कार्यक्रम झाला.

रविवारी प्रख्यात बंगाली गायिका लोपामुद्रा यांचा बंगाली गाण्यांचा ऑर्केस्ट्रा तर संध्याकाळी ५.३० वाजता ‘ए रात्रेग पगेल्गु यानु’ हा दक्षिण भारतीय ‘तुल्लू’ भाषिक नाटकाचा प्रयोग झाला.

सोमवारी रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह मध्ये खास महिलांसाठी ‘अहो नादच खुळा’ हा लावणीचा कार्यक्रम झाला. संध्याकाळी ६ वाजता वाकड, काळा खडक येथील चंद्र माऊली मंगल कार्यालयात महिलांसाठी मधुसूदन ओझा यांचा ‘खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम झाला.

मंगळवारी सांगवी येथील निळू फुले नाट्यगृहात ‘शिवतांडव’ या मराठी नाटकाचा प्रयोग, मंगळवारी प्रशांत साळवी यांचा ‘द एवर ग्रीन किशोर कुमार’ हा हिंदी गाण्यांचा ऑर्केस्ट्रा झाला.

या प्रसंगी सादर झालेल्या कार्यक्रमांचा नागरिकांनी मनमुराद आनंद लुटला. विविध भाषिकांसाठी शहरात पहिल्यांदा अशा प्रकरच्या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

संबंधित लेख

लोकप्रिय