सोलापूर : आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा एक रिक्षा चालक होते,ज्ञत्यांना रिक्षा चालकांच्या समस्या माहिती आहेत. मी स्वतः 1996 साली रिक्षा चालकांच्या समस्या घेऊन साडेतीन तास मांडणी केली त्यानंतर 2004 ते 2009 दरम्यान अनेक वेळा विधानसभेत आवाज उठवला, कल्याणकारी मंडळाची स्थापना केली पाहिजे याची मागणी केली. याची सविस्तर चर्चा मुख्यमंत्री यांच्या सोबत झाली असून रिक्षा चालकांच्या न्याय हक्काच्या मागण्या संदर्भात शिष्टमंडळाद्वारे चर्चा करू अन्यथा जिल्ह्यातील 25 हजार रिक्षा चालकांना घेऊन रस्त्यावर उतरू असा वज्रनिर्धार ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी केला.
रविवार 19 मार्च रोजी सांयकाळी 6 वाजता दत्त नगर लाल बावटा कार्यालय येथे लाल बावटा रिक्षा चालक संघटनेच्या वतीने ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली रिक्षा चालकांचा मेळावा पार पडला.
ते बोलताना पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात 20 लाख रिक्षाचालक आहेत. या वीस लाख रिक्षाचालकांसाठी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या कल्याणकारी मंडळात फक्त 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या 50 कोटी रुपयांची विभागणी वीस लाख रिक्षा चालकांमध्ये केल्यानंतर त्यांच्या वाट्याला बिस्किटे सुद्धा येतील की नाही अशी शंका माझ्या मनात आहे, त्यामुळे महाराष्ट्र शासनाने रिक्षा चालकांसाठी दरवर्षी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करावी.
यावेळी युनियचे जनरल सेक्रेटरी कॉ. सलीम मुल्ला यांनी प्रास्ताविक करताना म्हणाले की, स्वयंरोजगार म्हणून रिक्षा चालविण्याचा व्यवसाय आपण स्विकारला, अनेक अडचणीवर मात करत विविध समस्याना तोंड देत आपण आपल्या कुटूंबियांचा उदरनिर्वाह करत असताना ऑनलाईन चलनच्या नावाखाली दंडाची आकारणी शहर वाहतुक शाखेकडून सुरु झाली आहे. आपल्या कळत न कळत रिक्षाचा फोटो काढला जातो व आपल्याला आपला गुन्हा काय आहे, कोणत्या नियमाचे उल्लंघन केले याची माहिती न देता आपल्या नावावर दंड केला जात आहे.
नविन मुफ्त परवाना धोरणामुळे रिक्षांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली, व्यवसाय निम्म्यावर आला पोटाची खळगी भरायची का दंड भरायचा, नविन मोटार वाहन कायद्यानुसार आर. टी. ओ. च्या दंडामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली २० ते ३० हजार रुपया पर्यंत दंडाची जात आहे. आपण रस्त्यावर दिवस रात्र भटकून कमाविलेली कमाई एका झटक्यात दंड भरण्यामध्ये निघून जात आहे.
रिक्षा चालक कल्याणकारी मंडळाची घोषणा झाली, या मंडळाकडून कोणते लाभ मिळणार कोणाला मिळणार या बाबत कसलाच खुलासा सरकारने केला नाही. सध्या घोषित केलेला निधी हा अत्यंत अपुरा असून त्यामध्ये वाढ करुन घेण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. १५ वर्षानंतर रिक्षा स्क्रॅप, ८ वर्षानंतर पर्यावरण पंधरा वर्षावरील रिक्षा फिटनेस करीता दररोज ५० रु. दंड विमा (ईन्शुरन्स) च्या प्रिमियम मध्ये मोठी वाढ, नुतनीकरणा करिता वाढलेले शुल्क ई समस्याबाबत एकजुट होऊन संघर्ष करण्याची वेळ आली आहे. रिक्षा चालकाच्या न्याय मागण्याबाबत चर्चा करुन पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली.
यावेळी विचारमंचावर सिटू चे राज्य महासचिव अँड.एम.एच.शेख, रे नगर फेडरेशन चेअरमन नलिनी कलबुर्गी, युसूफ शेख मेजर, महिबूब कादरी,हमीद दौलताबाद, आरिफ मणियार अकबर लालक्कोट चांदसाब मुजावर, रफिक पिर्जादे, शैलेश सोनवणे अँड.अनिल वासम आदींची उपस्थिती होती. या मेळाव्याचे सूत्रसंचालन इलियास सिद्धीकी तर आभार प्रदर्शन अँड.अनिल वासम यांनी केले.
यावेळी कॉ. आरीफ मनियार, कॉ. अप्पाशा चांगले, कॉ. नरेश दुगाणे, कॉ. अमित मंचले, कॉ. आलीम, कॉ. श्रीकांत कांबळे, कॉ. बापू साबळे, कॉ. मोहन कोक्कुल, कॉ. हसन शेख, कॉ. अमीन शेख, कॉ. अशोक बल्ला कॉ. दाऊद शेख, कॉ. अकिल शेख, कॉ. अकबल लालकोट, कॉ. रफिक काझी, कॉ. वसीम मुल्ला, कॉ. विल्यम ससाणे, कॉ. मुन्ना कलबुर्गी, कॉ. बजरंग गायकवाड, कॉ. धनराज गायकवाड, कॉ. रफिक जमादार, कॉ. कासीम हकिम आदींनी परिश्रम घेतले.