Monday, May 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडअमोल भालेकर यांच्या पुढाकाराने रुपीनगरची बससेवा पूर्ववत

अमोल भालेकर यांच्या पुढाकाराने रुपीनगरची बससेवा पूर्ववत

पिंपरी चिंचवड (क्रांतिकुमार कडुलकर) : गेल्या अनेक दिवसांपासून रुपीनगरवासीयांना भेडसावणाऱ्या पीएमपीएल बससेवेच्या प्रश्नांवर येथील शिव योद्धा प्रतिष्ठान अध्यक्ष अमोल तुकाराम भालेकर यांनी आगार व्यवस्थापक शांताराम वाघेरे यांच्यासोबत चर्चा करून प्रश्न निकाली काढला आहे.

बस वळण्यास लागणाऱ्या जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी मूळ जागा मालक आणि प्रशासन यांच्यासोबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. जागेमध्ये मुरूम टाकून जागा वापरावी अशी जागा मालकांची मागणी होती, परंतु ही जबाबदारी महानगरपालिकेची आहे असे पीएमपीएल प्रशासनाचे म्हणणे होते. परंतु पालिकेतर्फे यावर लोकप्रतिनिधींना कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता आणि प्रश्न सुटत नव्हता. हा तिढा सोडवण्यासाठी अमोल भालेकर यांनी स्वखर्चाने मुरूम आणि जेसीबीची सोय करून तसेच जागा मालकांना राजी करून हा प्रश्न सोडवला. प्रवाशांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

गोसावी हॉस्पिटलपर्यंतच मर्यादित केलेल्या बससेवेमुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि सर्वच प्रवाशांना पायपीट करावी लागत होती. सर्व गोष्टी प्रशासनाच्या लक्षात आणून देऊन, प्रशासनास येणाऱ्या अडचणी सोडवण्याचे आश्वासन देऊन बससेवा शेवटच्या बस स्टॉपपर्यंत पूर्ववत सुरू करण्यात येत आहे. फक्त भाजीमंडई आणि तेथील वर्दळीचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. तरीसुद्धा आग्रह करून ही बससेवा सुरू करण्यात येत आहे. काही समाजकंटकांनी आणि विरोधकांनी या प्रश्नावरून मुद्दाम माझी बदनामी करण्याचा कट आखला. प्रश्न सोडवण्याचा आव आणून त्यामागून दुसऱ्याची बदनामी करायची ही वृत्ती समाजाच्या दृष्टीने घातक आहे. शेवटी या प्रकाराला कंटाळून मीच पुढाकार घेऊन हा प्रश्न सोडवायचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्यात यश आले, असे अमोल भालेकर म्हणाले.

यावेळी रामभाऊ भालेकर, उत्तम कांबळे, भिकुलाल सोनटक्के, रामचंद्र भालेकर, प्रभाकर पाटील, मोटे, दर्पण येवले, सागर गावडे, अनिकेत बनसोडे आदी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय