Friday, May 17, 2024
Homeबॉलिवूडऑन स्क्रीन : सर : शिक्षणाच्या बाजारावरचा खणखणीत प्रहार

ऑन स्क्रीन : सर : शिक्षणाच्या बाजारावरचा खणखणीत प्रहार

धनुष या स्टारचा आणि शिक्षणातील खासगीकरणाविरुद्ध लढत गरिबांना शिक्षण मिळण्यासाठी जिवाची बाजी लावणाऱ्या तरुणाचा ‘सर’ हा चित्रपट अनेक बाबतींत वेगळा आहे.शिक्षण, जातीभेद, गरीब-श्रीमंत दरी अशा अनेक गोष्टींबद्दल कथा भाष्य करते व त्यावरील उपाय सोप्या शब्दांत सांगण्याची प्रयत्नही करते. मात्र, प्रसंगांची निवड आणि पटकथा याबाबतीत चित्रपट कमी पडतो. धनुषचा अभिनय आणि वेगळी कथा यासाठी चित्रपट एकदा पाहण्यासारखा नक्कीच आहे.

‘सर’ची कथा आहे तमिळनाडू-आंध्र प्रदेश सीमेवरील एका गावातील. काही विद्यार्थ्यांना एका व्हिडिओ पार्लरमध्ये कॅसेट सापडतात व तथा १९९०च्या दशकात जाते. या कॅसेटमध्ये एक शिक्षक फळ्यावर गणितं सोडवून दाखवत असतो आणि त्याच व्हिडिओचा संदर्भ घेऊन हे विद्यार्थी एका वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत जाऊन पोचतात. आता बाला (धनुष) या शिक्षकाची गोष्ट सुरू होते. श्रीनिवास हा खासगी शिक्षण संस्थांचा मालक सरकारी शिक्षणाचं खच्चीकरण करण्याच्या प्रयत्नात असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून तो आपल्या खासगी संस्थेतील कमी दर्जाच्या शिक्षकांना आपलं वजन वापरून सरकारी संस्थांत शिकवण्यासाठी पाठवत असतो.

बाला आणखी दोन मित्रांबरोबर सरकारी शिक्षण संस्थेत दाखल होतो. बाला प्रथम विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी प्रोत्साहित करतो, जातिभेदाच्या जोखडातून त्यांना बाहेर काढतो आणि मग श्रीनिवासशी लढण्याचं बळही मिळवून देतो. मीनाक्षी (संयुक्ता मेनन) ही शिक्षिका त्याला या कामात मदत करते. मुलांना दर्जेदार शिक्षण मिळवून देण्यात बाला यशस्वी होतो का, श्रीनिवासनं बालाविरोधात रचलेला कट यशस्वी होतो का, बालाला या कामात गावाची साथ मिळते का अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरं चित्रपटाच्या शेवटी मिळतात.

खासगी शिक्षणामुळं शिक्षणव्यवस्थेचं झालेलं नुकसान हा वेगळा विषय लेखक-दिग्दर्शक व्यंकी अलुरी मांडू पाहतो. सरकारी शिक्षण संस्था मोडीत निघून खासगीचं पेव फुटण्यासाठीचं राजकारणही दिग्दर्शक अधोरेखित करतो. ‘राजकारणापेक्षा शिक्षणसंस्थांत जास्त पैसा आहे,’ हे वाक्यही सध्याची परिस्थिती अधोरेखित करतं. कथेचा नायक या व्यवस्थेविरोधात लढू पाहतो. मात्र, त्यासाठी निवडलेले अगदी थोडेच प्रसंग प्रभावी ठरतात.

जातीभेद मिटवण्यासाठीचा प्रसंग जमून आला असला, तरी इतर प्रसंग एकांगी किंवा भडक झाले आहेत. यात पटकथा लेखकाचा दोष दिसतो. कथेचा नायक शिक्षक असला, तरी एकावेळी दहा गुंडांना उचलून आपटण्याचं बळ (तेही धनुषच्या किरकोळ शरीरयष्टीमध्ये) दाखवणं आणि नायिकेवर प्रभाव टाकण्यासाठी त्याचं गाणी म्हणणं या गोष्टी ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ म्हणून सहन करायच्या. चित्रपटाचा शेवट मात्र विचार करायला लावणारा, लक्षात राहणारा झाला आहे.

धनुष आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपट तोलून धरतो. विद्यार्थ्यांसाठी झटणारा, आपलं ध्येय साध्य करण्यासाठी लढणारा नायक त्यानं छान उभा केला आहे. प्रेम, गाणी आणि हाणामारीच्या प्रसंगांतही तो भाव खाऊन जातो.

संयुक्ताच्या वाट्याला मोजकेच आणि छोटे-छोटे प्रसंग आले आहेत. दुर्दैवानं धनुषच्या पुढं इतर कोणत्याही कलाकाराला अभिनयाची फारशी संधी नाही. एकंदरीतच, शिक्षणाच्या बाजारावरचा हा खणखणीत प्रहार अनेकांच्या डोळ्यात अंजन घालण्यात यशस्वी ठरतो.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय