Monday, May 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडनेताजी सुभाषचंद्र बोस : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे कट्टर समर्थक!

नेताजी सुभाषचंद्र बोस : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे कट्टर समर्थक!

Maharashtra janbhumi विशेष लेख : सावरकर आणि जिना या दोघांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना निराश केले होते. 1940 स्वातंत्र्यलढ्याच्या काळात धार्मिक कट्टरता पसरवणाऱ्या मुस्लिम लीग आणि हिंदू महासभेबद्दल ते म्हणतात – “मिस्टर जिना इंग्रजांच्या मदतीने फक्त पाकिस्तानची आपली कल्पना कशी प्रत्यक्षात आणायची याचाच विचार करत होते. भारतीय स्वातंत्र्यासाठी काँग्रेससोबत संयुक्त लढा उभारण्याची कल्पना त्यांना आवडली नाही… श्री सावरकर… हिंदुस्थानातील ब्रिटनच्या सैन्यात प्रवेश करून फक्त लष्करी प्रशिक्षण कसे मिळवता येईल याचा विचार करत होते. या मुलाखतींवरून मी असा निष्कर्ष काढला की मुस्लिम लीग किंवा हिंदू महासभेकडून काहीही अपेक्षा केली जाऊ शकत नाही.” (“The Indian Struggle” by Netaji Subhas Chandra Bose)


त्या काळात देखील मुस्लिमांची परिस्थिती मागासलेली होती. जेव्हा नेताजी कलकत्ता म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी होतात तेव्हा ते लोकसंख्येच्यातुलनेत हिंदूंपेक्षा जास्त मुसलमानांची नेमणूक कॉर्पोरेशनमध्ये करतात. केवळ आणि केवळ हिंदूंची एकाधिकारशाही संपविण्याच्या दृष्टीनेच हे पाऊल उचलले जाते. तेव्हा एकीकडे हिंदुत्ववादी त्यांच्यावर खूप चिडले होते, तर दुसरीकडे महात्मा गांधी आणि सीआर दास सारख्या नेत्यांनी त्यांची स्तुती केली होती. अशा वेळी त्रस्त झालेले सावरकर त्यांची टीका करतात – “बोस काही गांधींपेक्षा फार वेगळे नव्हते, त्यांनी मुस्लिमांना आकर्षित करण्यासाठी आणखीन पुढचे पाऊल टाकले.” पुढे पुन्हा एका ठिकाणच्या चर्चेनंतर सावरकर म्हणतात – “(नेताजींना) हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या या मृगजळाने वेड लावले आहे.” वेड? सावरकरांना नेताजी सुभाषचंद्र बोस सारखे नेते वेड लागल्यासारखे का वाटतात?


नेताजी सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधींना कित्येकदा एकमेकांचे जाने दुष्मन असल्यासारखे दाखवण्यात येते. त्याच्याविरोधातले ज्वलंत उदाहरण – नेताजी सुभाषचंद्र बोस यांना महात्मा गांधी, पंडित नेहरू आणि चंद्रशेखर आझाद यांबाबत प्रचंड आदर होता. म्हणूनच आझाद हिंद फौजेमध्ये गांधी, नेहरू आणि आझाद यांच्या नावाच्या तुकड्या देखील होत्या. (सावरकर किंवा तत्सम कोणत्याही नेत्यांच्या नावाने तुकड्या नव्हत्या.) इंग्रजांनी लिहिलेल्या धार्मिक द्वेष निर्माण करणाऱ्या इतिहासाला फाट्यावर मारून सुभाषचंद्र बोस म्हणतात – “इंग्रजांच्या आगमनापूर्वीच्या भारतातील राजकीय व्यवस्थेचे वर्णन करताना ती संपूर्णतः मुस्लिम राजवट होती असे म्हणणे चुकीचे ठरेल. दिल्लीतील मुघल सम्राटांचीच गोष्ट घ्या… आपल्याला आढळून येईल की प्रशासन हिंदू आणि मुस्लिम एकत्रितपणे मिळून चालवत होते, अनेक प्रमुख कॅबिनेट मंत्री आणि सेनापती हिंदू होते.”


1857 च्या स्वातंत्र्यलढ्यातील शहीद बहादूर शाह जफर यांना वंदन करण्यासाठी ते स्मारकाला भेट देतात. आज टिपू सुलतानचा द्वेष करणाऱ्यांना माहित असणे गरजेचे आहे कि, टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात दिलेल्या लढ्याचा आदर राखत त्यांच्या राजवटीतील वाघाच्या निशाण्याचा वापर आझाद हिंद सेनेच्या गणवेशात करतात. पुढे फॉरवर्ड ब्लॉकच्या झेंड्यावरही तोच वाघ ते सजगपणे वापरतात.


All-Party Nehru Report (1928) दरम्यान लोकांना संबोधित करताना सुभाषचंद्र बोस म्हणतात – “आर्थिक जाणीवेची पहाट धर्मांधतेचा विनाश दर्शवते. मुस्लिम शेतकरी आणि मुस्लिम जमीनदार यांच्यापेक्षा हिंदू शेतकरी आणि मुस्लिम शेतकरी यांच्यात जास्त साम्य आहे.” यांसारख्या विचारांवरून हे देखील स्पष्ट होते कि ते केवळ हिंदू-मुस्लिम ऐक्यच नाही तर समाजवादी – समतावादी विचाराने प्रेरित होते. पुढे अनेक घडामोडींमध्ये ते काँग्रेसमध्ये डाव्या विचारसरणीच्या लोकांची एकजूट करण्याचे प्रयत्न करतात, त्यातूनच फॉरवर्ड ब्लॉकची देखील स्थापना होते. आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आपल्या खेम्यात ओढण्याचा कावेबाजपणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि तत्सम मंडळी करीत आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा खरा इतिहास पुन्हा पुन्हा सांगण्याची आज नितांत गरज आहे.

शुभम हाले
लोकायत

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय