Friday, May 17, 2024
Homeराज्यदिल्लीमध्ये आशा व गटप्रवर्तकांचे देशव्यापी आंदोलन; "या" आहेत मागण्या

दिल्लीमध्ये आशा व गटप्रवर्तकांचे देशव्यापी आंदोलन; “या” आहेत मागण्या

नाशिक : गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना शासकीय सेवेत कायम करण्याबाबत येत्या पुरवणी अर्थसंकल्पीय बजेट मध्ये तरतूद करा. किमान वेतन लागू करा या प्रमुख मागण्यांसाठी 28 मार्च 2023 रोजी आयटक च्या नेतृत्वाखाली देशव्यापी भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य  आरोग्य खाते गटप्रवर्तक व आशा फेडरेशन (आयटक) चे राज्य अध्यक्ष कॉ.राजू देसले व राज्य सरचिटणीस कॉ. सुमन पुजारी सरचिटणीस यांनी दिली.

गरीब, दुर्लक्षीत, गरजू जनतेला सहज साध्य परवडण्याजोगी कार्यक्षम, उत्तरदायी व विश्वासार्ह आरोग्य सेवा पुरविण्यासाठी २००५ साली राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू केले. सध्या देशामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये सुमारे ८ लक्ष आशा स्वयंसेविका व सुमारे ४० हजार गटप्रवर्तक कार्यरत आहेत. सध्या देशस्तरावर आशा स्वयंसेविकांना माहिती व अहवालाचे अचूक संकलन व्होएचएनएससी ची मासिक सभा, व्हीएचएनडी व प्राथमिक आरोग्य स्तरावरील मासिक सभा या मंजूर कामाकरीता दरमहा २००० रुपये मोबदला देण्यात येतो. या व्यतिरिक्त आशा स्वयंसेविकांना विविध कामांसाठी कामावर आधारीत मोबदला दिला जातो. याप्रकारे आशांना दरमहा सुमारे ६००० रुपये एकूण मोबदला मिळतो.

सुमारे २० आशा स्वयंसेविकांच्या कामाचे पर्यवेक्षण करण्यासाठी गटप्रवर्तकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांचे काम पूर्णवेळ काम असून पदवीधर महिलांची या कामासाठी नेमणूक केली आहे. त्यांना प्रवासखर्च, टीएडीए मिळून केंद्र शासनाकडून दरमहा ८४७५ रूपये मोबदला मिळतो. यातील बहुतेक रक्कम टीएडीए साठी खर्च होते, त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी काहीच रक्कम शिल्लक राहत नाही.  त्यांना प्रवास भत्ता बरोबर कामाचा मोबदला किमान वेतन दिले पाहिजे. मोफत काम करून घेणे बंद करा. गटप्रवर्तकांना व आशा स्वयंसेविकांना मिळणारा मोबदला दारिद्रय रेषेखाली आहे. त्यांना वेठबिगारासारखे राबविले जात आहे, असे देसले म्हणाले.

गटप्रवर्तकांचे व आशा स्वयंसेविकांचे काम हे कायमस्वरूपी व आवश्यक काम आहे. त्यांच्यामुळे देशातील माता व बालमृत्यूचा दर कमी झाला आहे. त्या सर्वसाधारण जनतेपर्यंत सर्वसमावेशक आरोग्य सेवा पोहोचविण्या मध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. त्या संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोगांचा प्रतिबंध करण्यास महत्वपूर्ण योगदान देतात. गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना कोविड १९ च्या काळांत केलेल्या कामाची दखल जागतिक आरोग्य संस्थेने घेतली. ग्लोबल लिडर अॅवॉर्ड २०२२ साठी भारतातल्या आशा स्वयंसेविकांची निवड केली होती. कोविड १९ च्या काळामध्ये गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून ध्येयवादीपणाने केलेल्या कामाची आघाडीचे सैनिक म्हणून देशभर व जगभर प्रशंसा झाली. अशा परिस्थितीत गटप्रवर्तकांना तृतीय श्रेणी देऊन व आशा स्वयंसेविकांना चतुर्थ श्रेणी देऊन कायम कर्मचा- याचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी आहे. 

आशा व गटप्रवर्तकांना कायम करण्याचा निर्णय घ्यावा. २०१८ पासून गट प्रवर्तक व आशा च्या मोबदल्यात वाढ झाली नाही. कोरोना योध्याना किमान वेतन देऊन सन्मान करावा. गटप्रवर्तकांना दरमहा रुपये २४००० किमान वेतन व प्रवास भत्ता द्या. व आशा स्वयंसेविकांना दरमहा रू. २४००० देण्याची तरतूद येत्या पुरवणी अर्थसंकल्पीय बजेट मध्ये करण्यात यावी आदी मागण्यांसाठी २८ मार्च २०२३ रोजी देशव्यापी मोर्चा दिल्ली येथे जंतर मंतर वरती देशभरातील आशा व गट प्रवर्तक चा भव्य मोर्चा आयटक च्या अखिल भारतीय आशा व गट प्रवर्तक फेडरेशन वतीने आयोजित करण्यात आले आहे. 

महाराष्ट्रातील आयटक सलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक फेडरेशन वतीने मोठ्या संख्येने दिल्ली आंदोलनामध्ये सहभागी व्हावे असे आवाहनही राजू देसले, सुमन पुजारी यांनी केले आहे. या आंदोलनाच्या अगोदर देशभरातील सर्व खासदारांना आयटक च्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे.

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय