Saturday, May 18, 2024
Homeराज्य"संत तुकाराम महाराजांच्या नावे बीडी" उत्पादना वरील "संत तुकाराम" हे नाव तातडीने...

“संत तुकाराम महाराजांच्या नावे बीडी” उत्पादना वरील “संत तुकाराम” हे नाव तातडीने काढून टाकण्याची राष्ट्रीय भागवत धर्म रक्षा परिषदेची मागणी

हिंगोली  : संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबाराय आणि यांच्या पवित्र नावाने सुरू केलेले “संत तुकाराम बीडी” या उत्पादना वरील “संत तुकाराम” हे नाव तातडीने काढून टाकावे या करिता राष्ट्रीय भागवत धर्म रक्षा परिषद हिंगोली यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. गेल्या कित्येक दिवसांपासून वारकरी संप्रदायाची अस्मिता, कळसस्थान, किंबहूना महाराष्ट्राचे आराध्य स्थान असणारे जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबाराय यांच्या नावाने बीडी उत्पादन करण्याचे दुष्कृत्य चालू आहे. त्यामुळे देशातील समस्त देशवासीयांच्या भावना दुखावलेल्या आहेत असे संघटनेने म्हंटले आहे.

समाजातील अपप्रवृत्ती व व्यसन यांना आळा बसावा म्हणून संपूर्ण आयुष्य ज्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी जगाला उपदेश केला…

“सेवी भांग आफू तंबाखू ऊदंड !

परी तो भ्रांतीमाजी अखंड !!

तुका म्हणे ऐसा सर्वस्व बुडाला !

त्यासी अंतरला पांडुरंग !!”

अशा परखड शब्दात व्यसन प्रवृत्तींचा निषेध करणाऱ्या संत तुकाराम महाराजांच्या नावाने “संत तुकाराम बीडी”हे उत्पादन चालू केले आहे त्यामुळे वारकरी संप्रदायातील सर्व वारकरी संताप व्यक्त करीत आहेत. सदर उत्पादकाने संपूर्ण वारकरीच नाही तर देशातील व विशेषत: महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांच्या भावनांचा घोर अपमान केला आहे असे “राष्ट्रीय भागवत धर्म रक्षा परिषदे”ने म्हंटले आहे.

तातडीने प्रशासकीय पातळीवर या उत्पादन निर्मितीवरील “संत तुकाराम बीडी” हे नाव काढून टाकण्यासाठी उत्पादक मालकास व उत्पादक कंपनी यांना आदेश द्यावेत व आतापर्यंत विक्री केलेला माल ताब्यात घ्यावा अशी मागणी राष्ट्रीय भागवत धर्म रक्षा परिषद जिल्हाध्यक्ष हभप बाळकृष्ण महाराज गडदे, तालुकाध्यक्ष हभप गणेश महाराज कुबडे, तालुका उपाध्यक्ष हभप ओम महाराज निळकंठे, तालुका संघटक परमानंद महाराज काळे, हभप विजय महाराज चव्हाण, हभप उद्धव महाराज वाघमोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय