Friday, May 17, 2024
Homeराजकारणमहाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी

अमरावती : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत मोठी फुट पडली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर झाले आहे. शिवसेनेच्या अनेक बंडखोर आमदारांसोबत अपक्ष आमदार आसाम मधील गुवाहाटीतील हॉटेल मध्ये आहेत. अशात आता अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली आहे.

खासदार नवनीत राणा यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या सुरू असलेल्या राजकीय घटनेवर बोलताना राणा यांनी दावा केला की, शिवसेनेचे नेते संजय राऊत हे विधानसभेतील बंडखोर सदस्यांच्या कुटुंबीयांना धमकावत आहेत. बंडखोर आमदारांच्या नातेवाईकांना कोणीही संरक्षण देऊ शकणार नाही, असा इशारा दिल्याचा आरोप त्यांनी केला. उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून राऊत धमक्या देत असल्याचंही राणा म्हणाल्या आहेत.

शिवसेनेचे अनेक आमदार उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्याने त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेनेशी बंडखोरी करणाऱ्या खऱ्या शिवसैनिकांच्या घरावर, कार्यालयावर हल्ले करण्याचा प्रकार महाराष्ट्रात सुरू असून या कुटुंबांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुरक्षा पुरवून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावावी, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे. यापूर्वी देखील अनेकदा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावावी, अशी मागणी खासदार राणा यांनी केली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय